एक छोटसं, पण प्रभावशाली नाणं. साध्या कागदाच्या तुकड्याला देवाचं स्वरूप देणारा हा पैसा प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्त्वाचा बनला आहे. केवळ वस्त्र, निवारा आणि अन्नाचं समाधान देणाऱ्या आवश्यकतेपुरता तो थांबत नाही,उलट मनुष्याच्या महत्त्वाकांक्षा, प्रतिष्ठा आणि अहंकारालाही बढावा देतो.
पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. काही जण मेहनतीने धनसंपत्ती कमावतात, तर काही शॉर्टकटचा मार्ग निवडतात. पैसा नुसता कमावनं हे पूरसं नाही, तो टिकवणं, योग्य वापर करणं आणि योग्य ठिकाणी गुंतवणं हे पण जमायला हवे खरं तर ती एक कला आहे. पैशाची महत्त्वाकांक्षा माणसाला उंच शिखरावर नेऊ शकते, पण त्याच वेळी त्याचं अति लोभ माणसाला त्याच शिखरावरून ढकलू शकतो.
पैसा आपल्या जीवनाचं प्रतिबिंब आहे. गरीब असताना त्याचं महत्त्व जास्त वाटतं, श्रीमंत असताना त्याची किंमत कमी भासते. आणि दुर्दैवाने, पैसा असला की समाधान नेहमीच त्याच्यासोबत असते असे नाही. कोट्यवधींच्या संपत्तीने सजलेली माणसं देखील आतून पोकळ असतात, तर हातात फक्त दोन रुपये असलेला एखादा गरीब माणूस आनंदाने गाणं गात जगतो.
पैसा नसेल, तर आयुष्य कठीण होईल, पण तोच पैसा माणसाच्या नातेसंबंधांना विकत घेऊ लागला, की तो संबंधांचा धागा तोडतो. कुटुंबांमध्ये अनेकदा आर्थिक तणावामुळे वाद निर्माण होतात. पैशामुळेच माणसं एकत्र येतात, पण कधी कधी पैशामुळेच ती दुरावतात.
पैसा हे साधन आहे, साध्य नाही. माणसाचं खरं धन त्याच्या माणुसकीत आहे, नात्यांत आहे. पैसा कमवायला हवाच, पण तो जीवनाचा एक भाग असावा,संपूर्ण आयुष्य नव्हे. आपल्या आवडीच्या गोष्टींवर खर्च करताना, स्वप्नं पूर्ण करताना आणि दुसऱ्यांच्या मदतीसाठी पैसा वापरल्यावर त्याचं समाधान काही वेगळंच असतं
म्हणूनच म्हणतात पैसा आहे म्हणून आयुष्य सुंदर बनते, पण पैसा जास्त झाला, तर तिचं पैसा ते आयुष्य गढूळही करू शकतो. पैसा आपल्या नियंत्रणात हवा, आपण पैशाच्या नाही.