Login

पैसे काढले तरी कोणी!

पोलीस इन्स्पेक्टर च्या घरातलीच मुलगी एटीएम द्वारे पैसे काढते

पैसे काढले तरी कोणी!

मोबाईलवर सकाळी सात वाजता मेसेजची रिंगटोन वाजली. पहाटे तीन वाजता येऊन झोपलेला संजय गाढ झोपेत होता. गेले काही दिवस सतत १५-१६ तास ड्युटी करून शिणलेला जीव घरी आल्यावर झोपेच्या अधिन होऊन जायचा. पोलीस मध्ये नोकरी लागण्या अगोदरच हे त्याने गृहीत धरलं होतं. म्हणूनच त्याला त्याची खंत वाटत नव्हती. लहानपणापासूनच पोलिसात नोकरी करायची हे त्याचे एक स्वप्न होतं. आत्ताच गणेशोत्सवाचे दिवस सरले होते. आता थोडासा निवांतपणा मिळेल असे त्याला वाटत होतं. सकाळी उठल्यावर त्याने खात्यातील हजार रुपये डेबिट झाल्याचा बँकेचा मेसेज पाहिला. त्याने विचार केला ठीक आहे आपणच काढले असणार. दुपारी जेवून तो नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेला. जाताना त्याने एक सुंदर कुटुंब पाहिलं नवरा, बायको आणि दोन मुलं हसत खेळत एकमेकांशी संवाद साधत चालले होते. तेव्हा तो आठवू लागला की असं आपण आपल्या बायको आणि मुलींबरोबर कधी गेलो होतो. आपल्या कुटुंबाला आपण योग्य वेळ देऊ शकत नाही याचं त्याला खूप वाईट वाटत होतं. अर्थात प्रत्येक पोलिसाचीच ती भावना असते. त्याची बायको आणि मुली पण त्याला खूप समजून घेत असत.

दुसऱ्या दिवशी पण सकाळी सात वाजता मेसेजची रिंगटोन वाजली. अतिशय थकव्यामुळे त्याला खूपच छान झोप लागली होती. सकाळी उठल्यावर त्याने पुन्हा बँकेचा दोन हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज पाहिला आणि तो चक्रावला. अरे आपण तर पैसे काढले नाही, असं कसं झालं. त्याने घड्याळात बघितलं बँकेची वेळ वेळ संपली असणार. त्याने विचार केला उद्या जरा लवकर उठून बँकेत जाऊन चौकशी करायची. पण कॅलेंडर कडे लक्ष जाताच त्याला लक्षात आलं की तीन दिवस सतत बँका बंद आहेत. अरे बापरे आता काय करायचं. तेव्हा बँकेच्या ऑनलाईन ॲप्सचं प्रमाण खूप कमी होतं. पैसे काढायला एक तर बँकेत जावं लागायचं किंवा एटीएम मधून काढता यायचे. त्याच्या खात्यातून एटीएम द्वारे पैसे काढले गेले होते. पुढचे तीन दिवस बँकेला सुट्टी असल्यामुळे तो काहीच करू शकत नव्हता. खरं तर त्याच्या बँकेची ब्रांच त्यांच्या पोलीस क्वार्टर्स समोरच होती.

दुसऱ्या दिवशीपासून त्याची रात्रपाळी सुरू होणार होती. म्हणून दुपारी थोडी झोप काढावी या विचाराने तो आडवा झाला. संध्याकाळी पाच वाजता त्याच्या मोबाईलवर २००० रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्याला कळेना की बरोबर आपण झोपले असताना कसे काय पैसे काढले जातात. आपण स्वतः पोलीस असून आपल्या बाबतीत हे घडतंय याचा त्याला खूप मनःस्ताप होत होता. संजयची चलबिचल त्याच्या पत्नीच्या, सुमनच्या नजरेत आली. तिने काळजीच्या स्वरात विचारलं,

"अहो काय झालं तुम्ही असे चिंताग्रस्त का दिसता? काही झाले आहे का?" . संजयने विचार केला आपण हिला काही बोललो तर ही काळजी करेल म्हणून तो म्हणाला,

"काही नाही गं आता रात्री ड्युटीवर जायचं आहे त्याचाच विचार करत होतो."

तीन दिवसानंतर बँक उघडली की तेव्हा सकाळीच जायचं ठरवून तो सुमनला म्हणाला,

"आज सकाळी मी जरा कामासाठी बाहेर जातोय दुपारी जेवण झाल्यावर झोपेन."

संजय बँकेत आला आणि पाहतो तो काय तोबा गर्दी होती. तीन दिवसांनी बँक उघडल्यामुळे बँक ग्राहकांची खूपच गर्दी दिसत होती. काउंटर वर पैसे काढणाऱ्यांची गर्दी होती. त्याने विचार केला आपण सरळ नेहा मॅडमला विचारूया त्या आपल्याला नक्कीच मदत करतील. इतक्यात नेहाचं पण त्याच्याकडे लक्ष गेलं. तिला पोलीस खात्यात नोकरीला असलेल्या सर्वच लोकांचा खूप आदर वाटायचा. तिने लगेच संजयला तिच्याकडे बोलावलं.

"सर आज सकाळीच आलात बँकेत! काय काम आहे तुमचं? मी काही मदत करू शकते का!"

"मॅडम माझ्या खात्यातून एटीएम मधून दुसऱ्याच कोणीतरी पैसे काढले आहेत. असं चार-पाच वेळा झालं आहे. पैसे कोणी काढले काही कळू शकेल का?"

"मला एक सांगा तुमचं एटीएम कार्ड तुमच्याकडेच असतं ना."

"हो माझ्या शर्टच्या खिशातच असतं कारण कधी पैसे लागले तर काढता यावेत म्हणून."

"तुम्ही तुमच्या घरातील कोणाला कधी एटीएम कार्ड दिलं होतं का वापरायला किंवा तुमचा एटीएम पिन कोणाला घरात सांगितला आहे का?"

"माझा एटीएम पिन मी माझ्या बायकोला आणि मुलींना सांगितलं आहे. ‌ परंतु माझ्या घरातील कशाला माझं एटीएम कार्ड वापरतील. त्यांना मी योग्य वेळी पैसे देत असतो."

"तुम्हाला नक्की आठवतं ना तुम्ही पैसे काढले नाहीत."

"अहो मॅडम आमची सोळा सोळा तासांची ड्युटी असली तरी या अशा गोष्टी लक्षात राहणारच ना."

"तुमच्या घरी कोण कोण असतं. तुमची मुलं मोठी आहेत का?"

"माझ्याकडे मी, माझी पत्नी आणि माझ्या दोन मुली आहेत."

"तुमच्या मुली काय करतात? शिकत असतील ना?"

"हो माझ्या दोन्ही मुली कॉलेजला जातात. एक सकाळी पावणे सातला जाते आणि एक आठ वाजता जाते."

"पहिल्या दोन एंट्री सकाळी सात वाजताच्या आहेत. बँक हॉलिडे च्या दिवशी झालेली एन्ट्री संध्याकाळी पाच वाजता झाली."

"मी ड्युटी वरून येऊन झोपलेल्या वेळेतच माझं कार्ड वापरलं गेलं आहे."

"याचा अर्थ तुमच्या नकळतच हे एटीएम कार्ड वापरले गेले."

"मॅडम आता मुलींना विचारायचं म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल."

नेहा मॅडमच्या काउंटर खूप गर्दी झाली होती. संजय युनिफॉर्म मध्ये असल्यामुळे कोणीही काही बोलत नव्हतं. नेहा संजयला म्हणाली,

"तुम्ही तुमच्या मुलींना डायरेक्ट विचारू नका की तुम्ही पैसे काढले का. तुम्ही घरी सगळे एकत्र असाल तेव्हा सांगा माझ्या खात्यातील एटीएम द्वारे पैसे काढले गेले आहेत. बँकेत कळत नाही की कोणी असे पैसे काढले. त्यांनी माझी कंप्लेंट लिहून घेतली आहे आणि आता त्यांनी मला पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला सांगितले आहे."

"बापरे पोलिसाच्या खात्यातून कोणीतरी पैसे काढले कमालच झाली." आश्चर्यचकित होऊन सुमन म्हणाली.

"महत्त्वाचं म्हणजे मी झोपलेलो असतानाच कोणीतरी कार्ड वापरलं आहे. आपल्या घरात काही दिवसात कोणी बाहेरची व्यक्ती आली होती का. माझं एटीएम कार्ड माझ्या शर्टच्या खिशात असतं हे त्या व्यक्तीला माहीत असलं पाहिजे." हे सर्व बोलत असताना संजयच्या धाकट्या मुलीच्या, सायलीच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. संजयचं तिच्याकडे लक्ष जाताच तो म्हणाला,

"सायली काय गं तू अशी गप्प का. तुला कोणी काही बोललं का? एवढी घाबरली का आहेस." संजय ची काळजी ऐकून सायलीने पटकन त्याचे पाय धरले आणि रडतच म्हणाली,

"बाबा मी चुकले. मी तुमचं एटीएम कार्ड वापरलं आणि पैसे काढले. मला माफ करा बाबा."

"अग पण का कशासाठी. तुला कसली गरज होती तर तू मला सांगायचं ना. मी तुम्हाला कशासाठी तरी नाही म्हणतो का कधी."

"बाबा मला महागाचा मोबाईल घ्यायचा होता. माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे तसा मोबाईल आहे. तुमच्याकडे इतके पैसे मागायला मला भीती वाटली. मी सकाळी निघताना तुम्ही झोपलेले असायचात म्हणून मी विचार केला की तुमच्या एटीएम मधून थोडे थोडे पैसे काढले तर तुम्हाला कळणार नाही."

"पोलिसाच्या घरातच चोरी होते काय म्हणायचं याला. आम्ही सगळीकडे गुन्ह्याचा शोध घेत असतो. माझा तुमच्या सगळ्यांवर इतका गाढ विश्वास होता त्यामुळे माझ्या मनात असं कधी आलंही नाही. बँकेतल्या मॅडमनी बरोबर सांगितलं की हे नक्की तुमच्या घरातल्याच कोणाचं तरी काम आहे. आता पुन्हा असं कधीही वागू नकोस सायली. तुम्हाला कोणालाही काहीही हव असेल तर माझ्याकडे मागत जा. एक चोरी पचली की दुसरी चोरी करायची तीव्र इच्छा त्या व्यक्तीला होते. अशानेच चोर जन्माला येतो." सायलीला खूपच अपराधी वाटत होतं. ती आत मध्ये जाऊन सर्व पैसे घेऊन आली आणि बाबांना देत म्हणाली,

"बाबा तुमच्या इमानदारीचे कितीतरी किस्से मी इतरांकडून ऐकले आहेत आणि मी तुमची मुलगी असून इतकी वाईट वागले. आता प्रत्येक एटीएम कार्ड धारकाने आपली एटीएम पिन अगदी जवळच्या माणसांना सुद्धा सांगू नये हेच खरं."

"खरं आहे तुझं अशा केसेस मध्ये जवळच्या व्यक्तीचाच हात असतो."


©️®️ सीमा गंगाधरे