Login

पलीकडचा किनारा भाग १

पलीकडचा किनारा भाग १
पलीकडचा किनारा भाग १

"अद्वैत! अद्वैत, कुठे आहात तुम्ही ? लवकर बाहेर या... माझ्याकडे तुमच्यासाठी एक 'सरप्राईज' आहे ! "
स्काय-हाय त्या आलिशान फ्लॅटचं दार उघडल्या उघडल्या ईश्वरीचा आवाज घरभर घुमला. तिच्या आवाजातला आनंद आणि उत्साह घराच्या भिंतींनाही स्पर्श करून जात होता.

अद्वैत लॅपटॉपवर काम करत हॉलमध्येच बसला होता. त्याने चष्मा खाली सारला आणि हसून विचारलं,

" काय झालं ईश्वरी ? एवढी का खुश आहेस ? एखादी नवीन साडी घेतली की काय ? "

ईश्वरीने धावत येऊन त्याला मिठी मारली. तिच्या हातात तिचं लॅपटॉप बॅग आणि एक मिठाईचा बॉक्स होता.

" साडी नाही हो ! त्याहीपेक्षा मोठं काहीतरी आहे. कंपनीने आज माझं प्रमोशन डिक्लेअर केलं! आता मी फक्त टीम लीडर नाही, तर 'रिजनल हेड' आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, माझ्या पगारात तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. अद्वैत, आपला ड्रीम फ्लॅट घेण्याचं स्वप्न आता खूप लवकर पूर्ण होईल ! "

अद्वैतच्या चेहऱ्यावर क्षणभर स्मितहास्य आलं. त्याने तिचं अभिनंदन केलं,

" अरे वा! ईश्वरी, अभिनंदन. खूपच मोठी झेप घेतली आहेस तू."

त्याने तिला मिठाईचा तुकडा भरवला, पण त्या हसण्यामागचा जिव्हाळा कुठेतरी हरवलेला होता. ईश्वरी आनंदाच्या भरात अद्वैतच्या डोळ्यांत उतरलेला तो विषण्णतेचा सावट वाचू शकली नाही.

त्या रात्री डिनर टेबलवर ईश्वरी सतत तिच्या नवीन जबाबदाऱ्यांबद्दल, तिच्या नवीन टीमबद्दल आणि तिला मिळणाऱ्या नवीन अधिकारांबद्दल बोलत होती.

" अद्वैत, आता मला थेट लंडनच्या क्लायंट्सशी डील करायला लागेल. खूप मोठं चॅलेंज आहे ना ? "
अद्वैतने ताटातला एक घास घेतला आणि शांतपणे म्हटलं,

". हो, चॅलेंज तर असणारच. पण ईश्वरी, पगार वाढला म्हणून जबाबदारीही वाढते. आता घरातल्या गोष्टींकडे तुला लक्ष द्यायला वेळ मिळेल का ? की घर म्हणजे फक्त 'वीकेंड होम' होणार आपलं ? "

ईश्वरी अचानक गप्प झाली. तिला अद्वैतचा हा प्रश्न अनपेक्षित होता.

" तसं नाहीये अद्वैत, मी मॅनेज करेन सगळं. आपण दोघं मिळून करूया ना."

अद्वैतने फक्त सुस्कारा सोडला. त्याच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं होतं.
'आजवर मी घराचा प्रमुख होतो. माझ्या पगारावर आपण मोठे निर्णय घ्यायचो. आता ईश्वरीचा पगार माझ्यापेक्षा जास्त आहे. लोक काय म्हणतील ?

'बायकोच्या पैशावर मजा करतोय' असं तर कोणाला वाटणार नाही ना?'

हा पुरुषी अहंकार त्याचा स्वतःचा मेल इगो त्याच्या मनात हळूहळू विष कालवू लागला होता.

पुढच्या काही दिवसांत घराचं वातावरण पूर्णपणे बदललं. ईश्वरी जेव्हा ऑफिसमधून थकली-भागली यायची आणि एखादी आनंदाची बातमी सांगायची, तेव्हा अद्वैत तिच्याकडे दुर्लक्ष करायचा. एकदा ईश्वरी उत्साहाने सांगत होती,

" अद्वैत, आज मी एक मल्टि-मिलियन डॉलर डील क्लोज केली ! "

अद्वैतने टीव्हीचा आवाज वाढवला आणि न बघताच म्हटलं,
" बरं, चांगलं आहे. पण आता चहा मिळेल का? मला खूप डोकं दुखतंय."

अद्वैतला ईश्वरीचं यश कौतुकास्पद वाटण्याऐवजी ती आपल्यापेक्षा मोठी होत चालली आहे, याची भीती वाटू लागली. तो ईश्वरीशी बोलताना तुटक वागू लागला. घरात एक सायलेन्स झोन तयार झाला. एकेकाळी तासनतास गप्पा मारणारं हे जोडपं आता फक्त आवश्यक तेवढंच बोलू लागलं होतं.

"जेवण झालं का?"

"पाणी हवंय का?"

"उद्या सकाळी लवकर जायचंय का?"

एवढ्यापुरताच त्यांचा संवाद उरला होता. ईश्वरीला सुरुवातीला वाटलं की अद्वैत त्याच्या ऑफिसच्या कामामुळे तणावात असेल. पण जेव्हा तिने त्याला त्याच्या प्रोजेक्टनबद्दल विचारलं, तेव्हा तो चिडून म्हणाला,

" तुझ्याइतकी मोठी पदवी आणि पगार नाहीये माझा ईश्वरी! साधी नोकरी आहे माझी, तुला काय समजणार त्यातलं ? "

अद्वैतच्या या एका वाक्याने ईश्वरी सुन्न झाली. तिला जाणवलं की, तिच्या प्रगतीने त्यांच्या नात्यात एक अदृश्य भिंत उभी केली आहे. ती भिंत वादाची नव्हती, तर अद्वैतच्या अहंकाराची होती. संसाराची सुंदर नौका जी विश्वासाच्या लाटांवर स्वार होती, तिला आता स्पर्धेच्या वादळाने घेरलं होतं. अद्वैतला स्वतःची उंची कमी वाटू लागली होती, जरी ईश्वरी त्याला कधीच तसं भासवू देत नव्हती.

त्या रात्री ईश्वरी बाल्कनीत उभी राहून पुण्याच्या रात्रीच्या प्रकाशाकडे बघत होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. तिला मिळालेल ते प्रमोशन आता तिला शाप वाटू लागल होत.

"अद्वैत, आपण एकमेकां शेजारी बसून जेवतोय की दोन अनोळखी माणसं एखाद्या हॉटेलमध्ये बसलीत ? गेल्या अर्ध्या तासात तुझा डोळा लॅपटॉपमधून बाहेर निघालेला नाही आणि तोंडातून शब्दही..."