Login

पण लक्षात कोण घेतो ?

गणपतीच्या दिवसांत बाजारात गेलो़‌ होतो....... रे त ते

                               गणपतीच्या दिवसात बाजारात गेलो तेव्हाचे प्रसंग. घरातून बाहेर पडताना बायकोने, " अहो, जरा केवडा, लाल फुलं, दूर्वा वगैरे घेऊन या अस बजावलं आणि... नुसते भटकून येऊ नका अस प्रेमाचा सल्लाही देण्यास ती विसरली नाही. लोकांच्या प्रचंड गर्दीतून वाट काढत मी वेगवेगळी फुलं, भाज्या बघत बघत जात होतो. खरंतर मी केवडाही शोधत होतो. केवडा विकणारी एकच बाई दिसली. पण तिच्या भोवती बिलकुल गर्दी नव्हती. पुढे पाहिल्यावर काही भय्येही हातात केवडे घेऊन विकताना दिसले. हल्ली कोणीही काहीही विकतो. पण मराठी माणसाकडूनच वस्तू विकत घेण्याचा मराठी बाणा ऐनवेळेवर मूळव्याधीसारखा माझ्या मनात विनाकारण उपटल्याने मी त्या बाईकडे जाऊन विचारलं, " काय मावशे, केवढ्याला दिलं हे कणीस? मावशीने माझ्याकडे पाहून न पाहिल्या सारखं केलं. तरी ही मी परत तोच प्रश्न विचारला. माझे एकूण कपडे आणि इतर भाव पाहून मी तिला केवड्याचा भावही सांगण्याच्या लायकीचा वाटलो नाही. असं मला वाटलं. थोडा रागही आला. पण मी पुढे जात नाही असं पाहून तिने तोंडातली तंबाखू थुंकून, ओठाच्या कोपऱ्यातून भाव सांगितला. "एकच भाव, साठ रुपये लागतील. " मी समजूनही विनोदाने म्हणालो, " अगं मला सगळी कणसं नको आहेत, एकच पायजे. " त्यावर तुच्छतेने पाहतं ती म्हणाली, " एकाचाच भाव सांगितलाय, घेयाचं तर घेवा न्हाई तर जावा. "

केवड्याच्या एका कणसाचा भाव ऐकून माझी मुद्रा आरशात पाहण्यासारखी झाली असावी. मग माझ्या मनात सहज आलं, अशा विक्रेत्यांनी जवळ एक आरसा ठेवावा, आणि आमच्यासारख्या सामान्य गिऱ्हाईकांना तो दाखवावा. नाईलाजाने मी पुढे सरकलो. तेवढ्यात एक मारुती आली. चालवणाऱ्या बाई होत्या. त्यांनी फक्त काच खाली केली व त्या बाईकडे पाहिले. त्याबरोबर ती करंट लागल्यागत उठली व टोपली घेऊन गाडीशी गेली. पाच कणसे गाडीवाल्या बाईंना देऊन हातात शंभराच्या तीन करकरीत नोटा घेऊन ती जागेवर येऊन बसली. मी जवळच असल्याने, तिने माझ्याकडे विजयी नजरेने पाहिले, असे मला वाटले. मारूती अर्थातच गेली होती. तीच गोष्ट लाल फुलांची आणि दूर्वांची. पुढे गेल्यावर काही मुलं दूर्वांची जुडी आणि दोन लाल फुले घेऊन विकत असलेली दिसली. मी भाव विचारला. पाच रुपयाला एक. भाव पटला नाही तरी मी एक गुच्छ विकत घेतला. नंतर केवडे विकणाऱ्या भैय्याकडे गेलो. "ये केवडे का कणीस कैसे दिया भैयाजी? "(मी हिंदीत विचारले) भय्याने मराठीत उत्तर दिले. " दहा रुपयांना एक आहे साहेब. पाहिजे तर वीस रुपयांना तीन घ्या. " मी एक कणीस विकत घेतलं. घरी निघालो..... चालता चालता माझ्या मनात आलं. एखाद्या वस्तूची जास्तीत जास्त किंमत वाढत्या महागाईच्या पातळीवर काय असावी, हे आपले मन ठरवत असावे आणि त्याच्या आसपासची किंमत आपण योग्य समजून देतो. अर्थातच ही किंमत महागाईची पातळी आणि वस्तूची उपयुक्तता यांवर अवलंबून असावी. मला काही अर्थशास्त्राची माहिती नाही. पण वस्तूची दुर्मिळता व जीवनावश्यकता वगळल्यास माझे म्हणणे खरे ठरावे. एखाद्या वस्तूची किंमत साधारणपणे पाच रुपये असेल आणि जर दिवाळी सारखा सण असेल तर त्याची किंमत जास्तीत जास्त दहा झाली तर ठीक वाटेल. पण तीच किंमत जर पंचवीस झाली तर ती सामान्य माणसाला अवाच्या सव्वा वाटेल. अशा वेळेला साधारण माणूस ती विकत घेणारच नाही (जीवनावश्यक नसल्यास). अशा वेळेस पंचवीस रुपयांना विकत घेणारा गुन्हेगार नाही काय? जसे वर वर्णन केलेल्या मारूतीवाल्या बाई तीनशे रुपयांना तीन कणसे विकत घेऊन सामाजिक गुन्हाच करीत नाहीत काय? व अशा रितीने किंमती वाढवण्यास जबाबदार नाहीत का? त्यामुळे सर्वच ग्राहकांनी अशा वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार टाकल्यास किंमती खाली येण्यास मदत होईल असे मला वाटते. जवळ मोकळा पैसा (लूज मनी) असलेल्या ग्राहकांनी वाटेल त्या भावात वस्तू विकत घेण्याचे टाळावे हे योग्य. अन्यथा सुक्याबरोबर ओलेही जळते या प्रमाणे न परवडणारा भाव देऊन सर्वसामान्य ग्राहक भरडला जाईल हे नक्कीच. व्यापारी वर्गाला सरकारची काय किंवा ग्राहकांची काय दहशत अशी वाटत नाही. त्यांना ग्राहक हा राजा न वाटता, गरजू भिकारी वाटतो. वाटेल ती भीक द्या आणि ग्राहकाला विकत घ्या अशी वस्तुस्थिती हे पैसे वाले ग्राहक निर्माण करीत असतात.

आम्ही केवडा अथवा लाल फुलं न वाहिल्यास गणपती बाप्पा कोपेल नाही का? आम्ही रूढी सांभाळणारच, हे व्यापाऱ्यांना पक्के माहीत आहे. रोजच्या फुलपुड्यांच्या बाबतीतही तोच प्रकार. पुडीचे पैसे वाढले तरी फुलांची संख्या न वाढता तेवढीच राहते, आणि बरोबरच्या कचऱ्याची संख्या वाढते. कोणताही फुलवाला प्रत्येक हंगामात हंगामी कारण देऊन फुले देण्यास नकार देतो. उदा. साहेब पावसाळा आहे पान्यामुले फुलं खडतात, उन्हाळा आहे हल्ली कळ्या जळतात, हिवाळा आहे फुलं थंडीमुळे फारशी उमलत नाहीत. म्हणजे फुलांची भरभराट असलेला हंगाम परमेश्वरालाही अजून निर्माण करता आलेला नाही. दुकानात असलेली चांगली फुले नक्की कोणासाठी ठेवलेली असतात, कोण जाणे. कदाचित, मारुती वाल्या बाईंसाठी तर नाही? आपल्याला काय वाटते, ते आपण जरूर लिहावे. जाता जात एकच वस्तू सांगतो, जी सर्वसामान्यांच्या आवाक्यातली नसते, ती म्हणजे, "रत्नागिरी हापूस ".पण लक्षात कोण घेतो ?
Submitted by मिरिंडा on 21 November, 2012 - 06:31
गणपतीच्या दिवसात बाजारात गेलो तेव्हाचे प्रसंग. घरातून बाहेर पडताना बायकोने, " अहो, जरा केवडा, लाल फुलं, दूर्वा वगैरे घेऊन या अस बजावलं आणि... नुसते भटकून येऊ नका अस प्रेमाचा सल्लाही देण्यास ती विसरली नाही. लोकांच्या प्रचंड गर्दीतून वाट काढत मी वेगवेगळी फुलं, भाज्या बघत बघत जात होतो. खरंतर मी केवडाही शोधत होतो. केवडा विकणारी एकच बाई दिसली. पण तिच्या भोवती बिलकुल गर्दी नव्हती. पुढे पाहिल्यावर काही भय्येही हातात केवडे घेऊन विकताना दिसले. हल्ली कोणीही काहीही विकतो. पण मराठी माणसाकडूनच वस्तू विकत घेण्याचा मराठी बाणा ऐनवेळेवर मूळव्याधीसारखा माझ्या मनात विनाकारण उपटल्याने मी त्या बाईकडे जाऊन विचारलं, " काय मावशे, केवढ्याला दिलं हे कणीस? मावशीने माझ्याकडे पाहून न पाहिल्या सारखं केलं. तरी ही मी परत तोच प्रश्न विचारला. माझे एकूण कपडे आणि इतर भाव पाहून मी तिला केवड्याचा भावही सांगण्याच्या लायकीचा वाटलो नाही. असं मला वाटलं. थोडा रागही आला. पण मी पुढे जात नाही असं पाहून तिने तोंडातली तंबाखू थुंकून, ओठाच्या कोपऱ्यातून भाव सांगितला. "एकच भाव, साठ रुपये लागतील. " मी समजूनही विनोदाने म्हणालो, " अगं मला सगळी कणसं नको आहेत, एकच पायजे. " त्यावर तुच्छतेने पाहतं ती म्हणाली, " एकाचाच भाव सांगितलाय, घेयाचं तर घेवा न्हाई तर जावा. "

केवड्याच्या एका कणसाचा भाव ऐकून माझी मुद्रा आरशात पाहण्यासारखी झाली असावी. मग माझ्या मनात सहज आलं, अशा विक्रेत्यांनी जवळ एक आरसा ठेवावा, आणि आमच्यासारख्या सामान्य गिऱ्हाईकांना तो दाखवावा. नाईलाजाने मी पुढे सरकलो. तेवढ्यात एक मारुती आली. चालवणाऱ्या बाई होत्या. त्यांनी फक्त काच खाली केली व त्या बाईकडे पाहिले. त्याबरोबर ती करंट लागल्यागत उठली व टोपली घेऊन गाडीशी गेली. पाच कणसे गाडीवाल्या बाईंना देऊन हातात शंभराच्या तीन करकरीत नोटा घेऊन ती जागेवर येऊन बसली. मी जवळच असल्याने, तिने माझ्याकडे विजयी नजरेने पाहिले, असे मला वाटले. मारूती अर्थातच गेली होती. तीच गोष्ट लाल फुलांची आणि दूर्वांची. पुढे गेल्यावर काही मुलं दूर्वांची जुडी आणि दोन लाल फुले घेऊन विकत असलेली दिसली. मी भाव विचारला. पाच रुपयाला एक. भाव पटला नाही तरी मी एक गुच्छ विकत घेतला. नंतर केवडे विकणाऱ्या भैय्याकडे गेलो. "ये केवडे का कणीस कैसे दिया भैयाजी? "(मी हिंदीत विचारले) भय्याने मराठीत उत्तर दिले. " दहा रुपयांना एक आहे साहेब. पाहिजे तर वीस रुपयांना तीन घ्या. " मी एक कणीस विकत घेतलं. घरी निघालो..... चालता चालता माझ्या मनात आलं. एखाद्या वस्तूची जास्तीत जास्त किंमत वाढत्या महागाईच्या पातळीवर काय असावी, हे आपले मन ठरवत असावे आणि त्याच्या आसपासची किंमत आपण योग्य समजून देतो. अर्थातच ही किंमत महागाईची पातळी आणि वस्तूची उपयुक्तता यांवर अवलंबून असावी. मला काही अर्थशास्त्राची माहिती नाही. पण वस्तूची दुर्मिळता व जीवनावश्यकता वगळल्यास माझे म्हणणे खरे ठरावे. एखाद्या वस्तूची किंमत साधारणपणे पाच रुपये असेल आणि जर दिवाळी सारखा सण असेल तर त्याची किंमत जास्तीत जास्त दहा झाली तर ठीक वाटेल. पण तीच किंमत जर पंचवीस झाली तर ती सामान्य माणसाला अवाच्या सव्वा वाटेल. अशा वेळेला साधारण माणूस ती विकत घेणारच नाही (जीवनावश्यक नसल्यास). अशा वेळेस पंचवीस रुपयांना विकत घेणारा गुन्हेगार नाही काय? जसे वर वर्णन केलेल्या मारूतीवाल्या बाई तीनशे रुपयांना तीन कणसे विकत घेऊन सामाजिक गुन्हाच करीत नाहीत काय? व अशा रितीने किंमती वाढवण्यास जबाबदार नाहीत का? त्यामुळे सर्वच ग्राहकांनी अशा वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार टाकल्यास किंमती खाली येण्यास मदत होईल असे मला वाटते. जवळ मोकळा पैसा (लूज मनी) असलेल्या ग्राहकांनी वाटेल त्या भावात वस्तू विकत घेण्याचे टाळावे हे योग्य. अन्यथा सुक्याबरोबर ओलेही जळते या प्रमाणे न परवडणारा भाव देऊन सर्वसामान्य ग्राहक भरडला जाईल हे नक्कीच. व्यापारी वर्गाला सरकारची काय किंवा ग्राहकांची काय दहशत अशी वाटत नाही. त्यांना ग्राहक हा राजा न वाटता, गरजू भिकारी वाटतो. वाटेल ती भीक द्या आणि ग्राहकाला विकत घ्या अशी वस्तुस्थिती हे पैसे वाले ग्राहक निर्माण करीत असतात.

आम्ही केवडा अथवा लाल फुलं न वाहिल्यास गणपती बाप्पा कोपेल नाही का? आम्ही रूढी सांभाळणारच, हे व्यापाऱ्यांना पक्के माहीत आहे. रोजच्या फुलपुड्यांच्या बाबतीतही तोच प्रकार. पुडीचे पैसे वाढले तरी फुलांची संख्या न वाढता तेवढीच राहते, आणि बरोबरच्या कचऱ्याची संख्या वाढते. कोणताही फुलवाला प्रत्येक हंगामात हंगामी कारण देऊन फुले देण्यास नकार देतो. उदा. साहेब पावसाळा आहे पान्यामुले फुलं खडतात, उन्हाळा आहे हल्ली कळ्या जळतात, हिवाळा आहे फुलं थंडीमुळे फारशी उमलत नाहीत. म्हणजे फुलांची भरभराट असलेला हंगाम परमेश्वरालाही अजून निर्माण करता आलेला नाही. दुकानात असलेली चांगली फुले नक्की कोणासाठी ठेवलेली असतात, कोण जाणे. कदाचित, मारुती वाल्या बाईंसाठी तर नाही? आपल्याला काय वाटते, ते आपण जरूर लिहावे. जाता जात एकच वस्तू सांगतो, जी सर्वसामान्यांच्या आवाक्यातली नसते, ती म्हणजे, "रत्नागिरी हापूस ".