Login

पांघरुण भाग ३(अंतिम भाग)

पांघरुण भाग ३ (अंतिम भाग)
रोहिणीच्या आज्ञे नुसार तिने स्वयंपाक बनवला. नंतर सगळे जेवायला बसले. मागची आवरा आवर करून तिला झोपायला साडे अकरा वाजले होते.

आजचं रोहिणीच वागणं निरंजनला चांगलं खटकू लागलं. रात्री झोपल्यावर त्याला गेल्या सहा सात महिन्यातील प्रसंग डोळ्यासमोर उभे राहीले.

त्यावेळी मानसी नुकतीच लग्न होऊन घरी आली होती. तर तिच्या माहेरून बऱ्याच वस्तू या घरात आल्या होत्या. ते सामान घरात आणून ठेवायचं काम चालू होत. तर छोटी सई नवलाई ने बघत होती. मधे मधे लुडबुड करत होती. तर जमलेल्या पाहुणे मंडळीच्या समोर रोहिणी बाई म्हणाल्या होत्या,

" सुरभी सांभाळ तूझ्या पोरीला, सारखी मधे मधे करते आहे.. एखाद सामान वगेरे तुटेल. इतकं महाग वस्तू आहेत, जर तुटल्या तर भरून देण्याची ऐपत नाही तुझी. असल्या महाग वस्तू तु माहेरी कधी बघितल्या नसतील." असं म्हणून ती सगळ्या लोकांन समोर हसली होती.

आपल्या आईच असल वागणं बघुन त्या दोघांना वाईट वाटलं होतं. सगळे समोर होते म्हणून त्याने गप्प बसणं योग्य समजलं. घरातील वाद लोकांच्या समोर नको मांडायला ! हा सुज्ञ विचार केला होता.

सुरवातीचे नवलाईचे दिवस होते सुरभी मानसीला सांभाळून घेत होती. ती नोकरी करत होती त्यामुळे घर काम करायची जबाबदारी तिच्या वर राहीली. मधे एकदा सुरभी ने आईला सांगितल होत मानसीला घरातली काम करायची जबाबदारी दया. त्यावेळी आईनं तिला जमणार नाही. ती नोकरी करते. असं म्हणत वेळ मारून घेतली.

आता पण आईंचा ओढा अजुनही समीर कडेच आहे. या घरात मी पण तेवढेच पैसे देतो जितके समीर देतो. मग काम एकट्या सुरभीला का करावी लागतात. या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळाल नव्हत.

असेच दोन दिवस झाले. एक दिवस सुरभी सईला घेऊन बाजारात गेली होती. एका हाताला सई चा हात तर दुसऱ्या हातात मोठी भाजीची पिशवी. निरंजन पाठीमागून चालत येत होतो. नुकताच बस मधून उतरत होता . त्याने मानसीला स्कूटी वरून जाताना बघितल. पाठोपाठ समीर ची कार पण त्यांना ओलांडून पुढे निघून गेली.

निरंजन आणि सुरभी सई मध्ये बरच अंतर होत. त्यामुळे मला ते सगळं समजलं. सुरभीच्या हातातील पिशवी उचलावी म्हणून तो झप झप चालत होतो. तर सई म्हणली ,

" आई मी मोठी झाली की मी खूप पैसे कामावेन, मग आपल्याकडे पण एक गाडी असेल. म्हणजे अस सामान घेऊन तुला चालत जावं लागणार नाही."

" अग आपल्याकडे आहे की कार . समीर काकाची "

" आई काकु म्हणते ती कार तिच्या बाबांनी तिला घेऊन दिली आहे. तुला कार मध्ये बसायचं असेल तर तूझ्या बाबांना घ्यायला सांग "

" बरं बघू. आता तुला चॉकलेट घेऊन देऊ ? " सुरभी ने विषय बदलला.

त्या दोघींचं बोलणं ऐकून निरंजन चे पाय जागीच खिळले. त्याला ती गोष्ट मनाला लागली होती. त्याचं विचारात तो घरी येत होता. विचारांच्या नादात कधी तो पायऱ्या चढून वर आला त्याचं त्याला पण समजलं नाही.

तो घरी पोचत नाही तोच आत मधून आईचा आवाज ऐकू आला.

" या महाराणी. आल्या का फिरुन ? किती उशीर केलास. मानसी समीर आले पण. जा खायला उपमा कर. त्यांना भुक लागली आहे."

" आई भाजी आणायला खाली गेले होते. म्हणून उशीर झाला. करते नाष्टा." ती शांत आवाजात म्हणली.

" जा लवकर कर. म्हणे भाजी आणायला गेले होते. लक्षात ठेव या घरात राहायचं असेल तर जरा काम कर. नवरा काय पैसे कमावत नाही. तर निदान घरातील काम करून मदत करं."

गेल्या पंधरा दिवसां पासुन निरंजन एकच वाक्य ऐकत होता. तो काही कमवत नाही. त्याला सुरभी च्या वागण्याचं आश्चर्य वाटलं , तिने एकदा हि त्याच्या कडे तक्रार केली नाही. ना आईच्या दू टप्पी वागण्याची ना आई ने काही बोलल्याची ?

आई बोलतं होती त्यात काही चुकीचं नव्हत. निरंजनला समीर च्या तुलनेत कमी पगार होता. पण इतकाही कमी नाही की तो त्याच्या परीवाराच पालन पोषण करू शकत नाही.

एक दिवस रात्री सुरभी सई ला परीची गोष्ट सांगत होती. एका परीच घर पावसात वाहून गेल तर परी च्या राणीने तिला समुद्राच्या लाटेवर घर बांधुन दिलं. तर सई म्हणाली,

" आई तू पण सांग ना त्या परिला आपल्याला पण एक छोटं घर बांधुन द्यायला. आजी म्हणते माझ्या बाबा कडे तितके पैसे नाहीत ना काका काकू सारखं घर बांधण्या इतके. परी राणी आपल्याला पण एक छोटं घर बांधुन देईल."

हे सगळं बोलणं ऐकुन निरंजन खजील झाला होता. मनातल्या मनात त्याने काहि तरी निश्चय केला होता. त्या अनुसार त्याने हालचाली करायला पण सुरवात केली होती.

एक दिवस सकाळीं सगळ्याचा नाष्टा झाल्यावर निरंजन म्हणाला,

" आई मला काही बोलायचं आहे."

" मी मिरजला परत जाणार आहे. पुढच्या आठवड्यात शिफ्ट करतो आहे."

" का ? काय गरज आहे मिरजला जाण्याची ? "

" आई मान्य आहे मी समीर इतकं नाही कमवत, पण इतकं तर नक्कीच कमावतो की माझं आणि या दोघींचं पालन पोषण करू शकतो."

" आता तू ठरव तुला काय करायचं आहे ? "

" बायकोने कान भरले काय तुझे " रोहिणी बाईंनी तडकुन विचारलं.

" मला ती काहीही बोलली नाही. आई मी घरी नसतो म्हणजे मला घरात काय चालू आहे ते समजत नाही. आई जो नियम सुरभी ला तो नियम मानसी ला का नाही ?"

" दादा मानसी नोकरी करते. सुरभी वहिनी घरी असते. पुण्याला राहायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. तुला काय समजणार " समीर म्हणाला.

इतक्यात सई च्या हातातून बॉल खाली पडला. त्यामुळे टी व्ही शेजारचा काचेचा वाझ खाली पडून फुटला. बाजुला फोन वर बोलत असणारी मानसी मागे वळली नी फुटलेल्या वाझ कडे बघून तिने सईच्या एक खणकन कानाखाली वाजवली.
सई रडु लागली. सुरभी ने तिला छातीशी कवटाळून घेतल होत. निरंजन पण लगेचच धावला. हे दुसऱ्यांदा घडलं होत.

" मानसी ही कोणती पद्धत आहे लहान मुलांन सोबत वागण्याची ? "

" दादा मानसीला का ओरडतो, सई कडे बघ. सारखी काही ना काही पाडत असते " समीर म्हणाला.

निरंजन ने चक्रावून त्याच्या कडे बघितले. तर समीर त्याच्या बायकोला सांभाळत होता. त्याने तिला आत नेले. या वेळीं देखील आई काहीही बोलली नाही.

" आई समीर कसा बोलत आहे ? लहान मोठं कोण याचं भान पण नाही का त्याला ? "

" वयाने मोठ असणं वेगळं असतं. बाकी ज्याचा त्याचा मान ज्याने त्याने स्वतः ठेवावा." अस म्हणून आई ने पण तिच्या रुम चा रस्ता पकडला.

तो दिवस त्या दोघांच्या साठी काळा दिवस होता. त्या नंतर आठवड्या भरातच त्याने त्याचं सगळ सामान मिरजेला शिफ्ट केलं. एका कापड गिरणी मधे त्याला सुपर व्हाईझर ची नोकरी मिळाली होती. त्यावेळी रोहिणी बाईंनी समीर सोबत राहायचा निर्णय घेतला.

काळ त्याच्या गतीने चालत होता. निरंजनने मिरजेला चांगल बस्तान बसवलं. त्याने मिरजेला स्वतः च छोटं घर विकत घेतलं होतं. सुरभी च्या हातात केक कुकीज पेस्ट्री बनविण्याच कसब होत. सई शाळेत गेल्यावर तिने एका बेकरी मध्ये नोकरी केली. थोडे थोडे पैसे साठवून स्वतः ची एक छोटी बेकरी सूरू केली. रोहिणी बाईं कधी तरी फोन करून चौकशी करत.

समीर आणि मानसी नोकरीला गेल्या वर घरातील सगळी जबाबदारी रोहिणी बाईंन वर पडली. मानसी ला एक मुलगा झाला. त्यामुळे रोहिणी बाईं आनंदी झाल्या. प्रेग्नसी नंतर कंपनी जॉईन केली. साहजिकच बाळाची जबाबदारी रोहिणी बाईंन पडली.

नोकरी मुळे मानसी ला घरकाम करायला वेळ मिळत नव्हता. त्या दोघांनी नोकरी केली तर त्यांना घराचे खर्च पेलता येणारं होते. रोहिणी बाईंच्या नवऱ्या चे पैसे घर खरेदी करताना घेतले होते. त्यामुळें त्या या घराच्या पन्नास टक्के मालकीण बाई होत्या. ते दोघं एकमेकांच्या हातात हात घालूनच चालु शकत होते. एका ने जरी हात मागे खेचला तरी खोल दरी पडणं ठरलेलं होतं.

मुलं नातवंडं सांभाळायला नकार नव्हता रोहिणी बाईंचा, पण संपुर्ण जबाबदारी त्यांच्यावर ठेवण्यात आली होती. ते दोघ रोहिणी बाईंवर अवलंबून होते. त्या गोष्टीचा त्यांचा विरोध होता.

आता तर परिस्थिती अशी होती, ना सुरभी कडे राहू शकतं ना इथ राहून मानसी सोबत जुळवून घेऊ शकत. समीर च्या चुकांवर पांघरूण घालणं त्यांच्यासाठी शिक्षा बनलं होतं.

निरंजन चं वाक्य त्यांच्या कानात सारखं घुमत होते.

" मान्य आहे मी समीर इतकं कमवत नाही. पण माझं कुटूंब पोसण्याची ताकद आहे मनगटात. इतके दिवस या घरात राहून दिलं या बद्दल आभारी आहे. यापुढे तुम्हाला आमचा कोणताही खर्च उचलण्याची गरज नाही. मी समर्थ आहे. मला तूझ्या पांघरुणाची गरज नाही. फक्त तुझा आशिर्वाद डोक्यावर असू दे."

त्याला माझ्याकडून फक्त आशीर्वाद हवे होते तर समीर ला आशीर्वाद सोडून सगळं काही.

समाप्त

© ® वेदा

कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.

या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.