पाण्याची गोष्ट !

.
सकाळचे आठ वाजले होते. पाखी गाढ निद्रेत होती.

" पाखी , उठ ना. " अधिक म्हणाला.

" मागे बघ. मागे बघ. " पाखी अचानक ओरडली.

दचकून अधिक मागे वळला.

" काय झाले ? कोण आहे मागे ? तुला भूत तर दिसत नाहीये ना ? तस असेल तर लगेच सांग. मी एका मांत्रिकाला ओळखतो. ते ऑनलाइन व्हिडीओ कॉल करून भूतांना पळवतात. " अधिक म्हणाला.

" अनुज मागे बघ. अनुपमा तिथेच आहे. " पाखी म्हणाली.

" ओह. ही झोपीत आहे. सकाळच्या आठ वाजता कोण झोपीत बडबडते यार. लग्नाआधी वाटायचे की माझी बायको आंघोळ करून मला उठवेल. तिचे ओले केस माझ्या चेहऱ्यावरून फिरवत पाणी शिंपडेल. पण इथं मलाच माझ्या बायकोला उठवावे लागत आहे. " अधिक म्हणाला.

अधिकने कसेबसे पाखीला उठवले.

" काय झाले ? एवढ्या पहाटे का उठवले ?" पाखी डोळे चोळत म्हणाली.

" कमऑन पाखी , सकाळचे आठ वाजले आहेत. " अधिक म्हणाला.

" माझ्यासाठी पहाटच. माझी सकाळ तर नऊला होते. मला नऊला उठव. गुड नाईट. " पाखी म्हणाली.

पाखी परत निद्रेच्या स्वाधीन होणार इतक्यात अधिकने तिला धरले.

" पाखी , तुझ्या झोपेत विघ्न घातले त्यासाठी माफी मागतो. मला सांग नळाला पाणी का येत नाहीये ? मला पटकन आंघोळ करून ऑफिसला जायचे आहे. " अधिक म्हणाला.

" काय ? ओह शीट. आय थिंक टाकीमधले पाणी संपले असेल. " पाखी म्हणाली.

" कसकाय ?" अधिक म्हणाला.

" काय माहीत. " पाखी म्हणाली.

पाखी इकडे तिकडे बघू लागली.

" पाखी ?" अधिक म्हणाला.

" ते काल चुकून नळ चालू राहिले. " पाखी म्हणाली.

" व्हॉट ? पाखी तू इतकी केअरलेस कशी असू शकते ? मी हल्ली नोटीस करतोय तू खूप पाणी वाया घालवतेस. " अधिक म्हणाला.

" अरे एका न्यूज चॅनलवर " मिस धिंच्यांक " अनुपमा सिरीयलमध्ये पुढे काय होणारे सांगणार होती. मी ते बघत होते. त्यामुळे नळ बंद करायचे लक्षातच राहिले नाही. त्यामुळे पाणी वाया गेले. " पाखी म्हणाली.

" चल वरती. " अधिक म्हणाला.

अधिक आणि पाखी गच्चीवर गेले. त्यांच्या टाकीतले पाणी खरोखरच संपले होते.

" खाली पण एक टाकी आहे ना. " अधिक म्हणाला.

" हो. मोटर चालू करून ते पाणी वापरता येईल. "
पाखी म्हणाली.

" मग चालू करू मोटर. " अधिक म्हणाला.

" पण खालच्या टाकीतही पाणी जास्त नाही. फक्त वॉशरूमसाठी वापरू शकतो. " पाखी म्हणाली.

" अरे यार. म्हणजे आज विना आंघोळीचेच जावे लागेल ऑफीसला. " अधिक म्हणाला.

***

" अधिक , किती बॉडी स्प्रे मारत आहेस. मला खोकला येतोय. " पाखी म्हणाली.

" हे बघ माझ्याकडे. कुणाला संशयपण नाही येणार मी आंघोळ केली नाही म्हणून. " अधिक म्हणाला.

" तू इतकं डियो मारून जातोय त्यामुळे नक्कीच कुणालातरी संशय येईल. " पाखी म्हणाली.

" नाही येणार. कॉलेजमध्ये असताना जेव्हा लेक्चरला जायला उशीर व्हायचा तेव्हा आम्ही मुले असच स्प्रे मारून जायचो. कुणाच्या बापालाही कळत नव्हते की आम्ही आंघोळ नाही केली ते. " अधिक म्हणाला.

" शी ! काय रे तुझी भाषा ? बाप अँड ऑल. मी तर नेहमी मेकअप करून जायचे. " पाखी म्हणाली.

" तू कॉलेजमध्ये शिकायला जायची की मॉडेलिंगला."
अधिक हसत म्हणाला.

" शट अप. " पाखी म्हणाली.

" चल मी येतो. तू प्लिज आज पाणी वाया नको घालवू. उद्या पाणी येईलच. " अधिक म्हणाला.

" अधिक , उद्या पाणी नाही येणार. " पाखी म्हणाली.

" काय ?" अधिक म्हणाला.

" अधिक , उद्या पाणी नाही येणार. " पाखी म्हणाली.

" अग ऐकू आले मला. मी शॉकमध्ये म्हणले. " अधिक म्हणाला.

" तू आज महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन टँकरसाठी नंबर लावशील का ?" पाखी म्हणाली.

" काय ?" अधिक म्हणाला.

" प्लिज. " पाखी म्हणाली.

" पाखी , मला ऑफिसची कामे असतात. " अधिक म्हणाला.

" ठीक आहे. उद्या पण जा असच स्प्रे मारून. " पाखी म्हणाली.

" यार पाखी. तू जा ना. " अधिक म्हणाला.

" मी उन्हात घराबाहेर पडले तर टॅन पडेल माझ्या चेहऱ्यावर. तू नवरा आहेस माझा. घरासाठी टँकर बुक करणे कर्तव्य आहे तुझे. " पाखी म्हणाली.

" मग बायकोचे कर्तव्य काय आहे ?" अधिक म्हणाला.

" नवऱ्याची सॅलरी उडवणे. " पाखी म्हणाली.

" वाह ! मला अड्रेस सेंड कर. येतो मी. बाय. " अधिक पाखीच्या कपाळाला किस करत म्हणाला.

" बाय. " पाखी म्हणाली.

***

दुपारी अधिक महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये पोहोचला. तिथे भलीमोठी रांग लागली होती. अधिकने स्पॉटीफाय उघडले आणि तो रणवीर अलाहाबादीयाचे पोडकास्ट ऐकत बसला. अखेरीस त्याचा नंबर लागला.

" सर , मला टँकरसाठी नंबर लावायचा होता. " अधिक म्हणाला.

" कोणत्या एरियात राहतात तुम्ही ?" अधिकारी म्हणाला.

" श्रेयानगर. " अधिक म्हणाला.

" हो का ? मी घोषालनगर. " अधिकारी म्हणाला.

तो अधिकारी स्वतःच्याच जोकवर मोठ्याने हसला. अधिकला जोक खूप पांचट वाटला तरी त्या अधिकाऱ्याचे मन राखण्यासाठी तो खोटे खोटेच हसला. नंतर अधिकने अड्रेस आणि फोन नंबर सांगितला.

" येईल ना टँकर ?" अधिक म्हणाला.

" मिठाई हवीय. " तो अधिकारी डोळा मारत म्हणाला.

" आताच घेऊन येतो. " अधिक म्हणाला.

अधिक लगेच तिथून निघाला. जवळच एक मिठाईचे दुकान होते. अधिकने तिथून थोडी मिठाई विकत घेतली. तो परत ऑफिसमध्ये गेला. यावेळी रांगेत उभे न राहता सरळ अधिकाऱ्यासमोर उभा राहिला.

" सर , ही घ्या मिठाई. " अधिक म्हणाला.

ऑफीसमधले बाकीचे अधिकारी जोरजोरात हसू लागले.

" तुम्ही जा. मी टँकर पाठवतो. " अधिकारी म्हणाला.

" सर , ही मिठाई. " अधिक म्हणाला.

" तुमच्याकडेच ठेवा. " अधिकारी म्हणाला.

***

अधिक संध्याकाळी घरी आला. त्याने सर्व हकीकत पाखीला सांगितली.

" व्हॉट ? अरे मिठाई म्हणजे तो अधिकारी जास्तीचे पैसे मागत होता. " पाखी म्हणाली.

" म्हणजे तो अधिकारी लाच मागत होता ?" अधिक म्हणाला.

" आणि तू लिटरली त्याला मिठाई देत होतास. अरे हे कोड वर्ड असतात. तू एवढं एमबीए करून तुला माहिती नाही. " पाखी म्हणाली.

" पाखी , आम्हाला एमबीएमध्ये करप्शनचे कोडवर्ड नाही शिकवत. त्याची चूक होती. पुरूष असूनपण अस बायकांसारखे कोड्यात का बोलायचे त्याने ?"
अधिक म्हणाला.

" हो. सर्वांसमोर मोठ्याने ओरडून लाच मागायला हवी होती ना. म्हणजे उद्याच्या न्यूजपेपरमध्ये फोटो आला असता त्याचा. " पाखी म्हणाली.

" पण तुला कसे माहिती हे कोडवर्ड ?" अधिक म्हणाला.

" माझे बाबा सरकारी अधिकारी आहेत. " पाखी म्हणाली.

" तरीच म्हणलं. त्यांचा चेहरा " नायक " चित्रपटातल्या अमरीश पुरीसारखा कसकाय दिसतो. आता कळले. " अधिक म्हणाला.

" माझे बाबा करप्शन नाही करत. ते त्यांच्या ऑफीसमध्ये काम करणाऱ्यांचे किस्से सांगतात. " पाखी म्हणाली.

" बरे जाऊदे. जेवायला दे. खूप भूक लागलीय. " अधिक म्हणाला.

" आणते. " पाखी म्हणाली.

पाखीने अधिकला जेवण वाढले.

" हे काय आहे पाखी ? सॅलड ? जेवण कुठे आहे ?" अधिक म्हणाला.

" हेच जेवण आहे. " पाखी म्हणाली.

" व्हॉट ?" अधिक म्हणाला.

" अरे आज दुपारी दीपिका आली होती. " पाखी म्हणाली.

" यायलाच पाहिजे. काम आहे तिचे. " अधिक म्हणाला.

" ऐक तर. तिने मला रसिका मॅडमची प्रसिद्ध कथा " पाण्याची गोष्ट " ऐकवली. त्या कथेत दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातला नायक आणि एक शहरात राहणाऱ्या नायिकेची प्रेमकथा आहे. शेवटी नायकामुळे त्या नायिकेलाही पाण्याचे महत्व कळते."
पाखी म्हणाली.

" पाखू , या सर्वांचा या सॅलडशी काय संबंध आहे ?"
अधिक म्हणाला.

" सोसायटीच्या ग्रुपमध्ये मेसेज आला आहे. पर्वाही पाणी नाही येणार. " पाखी म्हणाली.

" व्हॉट ?" अधिक म्हणाला.

" आपल्याला पाणी थोडं जपून वापरावं लागेल. म्हणून दीपिकाने मला ती कथा सांगितली. त्या कथेमुळे मला खूप प्रेरणा मिळाली. आता जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत आपण भांडे घासायचे नाही. सॅलड खायचे. म्हणजे जेवणात जे पाणी वापरतो त्याची बचत होईल. बाकी मी जार मागवले आहे. पिण्याच्या पाण्याचे टेन्शन नाही. " पाखी म्हणाली.

" पाखी , आपण दीपिकाला घरकामाचे पैसे देतो. रसिका मॅडमच्या कथा सांगण्याचे नाही. ती कथा सांगत बसते आणि काही काम करत नाही. बाय द वे तू दुपारी काय खाल्ले होते ?" अधिक म्हणाला.

" मी तर झोमॅटोवरून ऑर्डर केले होते. " पाखी म्हणाली.

" मग मला रात्री सॅलड का ?" अधिक म्हणाला.

" तूच म्हणत असतो ना की पैश्यांचा जपून वापर कर. म्हणून मी सॅलड बनवलं. आणि मी पण खातच आहे ना तुझ्यासोबत. " पाखी म्हणाली.

" हे श्रीराम !" अधिक म्हणाला.

जेवण करून अधिक आणि पाखी बेडरूममध्ये आले.

" पाखी , मघाशी मी तुला विचारायचे विसरलो. बेडरूममध्ये हे बॅनर , पोस्टर कसले आहेत ? सोसायटीच्या लहान मुलांनी स्कुल प्रोजेक्टसाठी बनवलेत का ? पण मग आपल्या घरी काय करत आहेत ?" अधिक म्हणाला.

" हे बॅनर्स मीच बनवले आहेत. म्हणजे तुला पाणी वाचवण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी. कसे आहेत ? झाडे लावा खरोखरी , पाऊस पडेल घरोघरी. " पाखी म्हणाली.

" पाखी , उलट बोलत आहेस तू आणि ही सर्व कामे आम्ही शाळेत करायचो. इथे मला टेन्शन येत आहे की उद्या टँकर येणार की नाही. " अधिक म्हणाला.

" मला नाही वाटत. कारण तुझ्यामुळे त्या अधिकाऱ्याचा अपमान झाला चारचौघात. " पाखी म्हणाली.

" पण मी मुद्दाम नाही केलं यार. मी तर निरागस मनाने मिठाई घेऊन गेलो होतो. " अधिक म्हणाला.

" तुला दुनियादारी समजत नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल. " पाखी म्हणाली.

" काय करणार आहेस ?" अधिक म्हणाला.

" चल. " पाखी म्हणाली.

***

" पाखी , एवढ्या थंडीचे दोन बकेट आणि एक पाईप सोबत घेऊन तू मला गच्चीवर का आणले आहेस ?"
अधिक म्हणाला.

" ही जोधाबेनची टाकी आहे. " पाखी म्हणाली.

" मग ?" अधिक म्हणाला.

" अरे या टाकीला कुलूपच नाहीये. " पाखी म्हणाली.

" मग ?" अधिक म्हणाला.

" मग यातले पाणी आपण आपल्या टाकीत भरू. "
पाखी म्हणाली.

" म्हणजे चोरी ?" अधिक म्हणाला.

" ज्या चोरीने कुणाचं तरी भलं होतं त्याला चोरी म्हणत नाहीत. " पाखी म्हणाली.

" व्हॉट ?" अधिक म्हणाला.

" आता मी पटकन बकेट भरते आणि तू आपल्या टाकीत ते पाणी टाक. " पाखी म्हणाली.

" यार नको. जोधाबेनला कळलं तर अकबर आपल्याला सोडणार नाही. " अधिक म्हणाला.

" काय ?" पाखी म्हणाली.

" म्हणजे जोधा रुकैया बनेल आणि भांडण करेल. "
अधिक म्हणाला.

" अरे त्या बाहेरगावी गेल्या आहेत. तू टाईमपास नको करू. मी बकेट भरते. " पाखी म्हणाली.

पाखी पटकन बकेट भरू लागली आणि अधिक ते पाणी स्वतःच्या टाकीत ओतू लागला.

" वाह पाखी ! तू तर एकदम एक्सपर्ट आहेस या कामात. " अधिक म्हणाला.

" अरे लहानपणी मी आणि बाबा करमत नसल्यावर असच रात्री गच्चीवर जायचो आणि दुसऱ्यांच्या टाकीतले पाणी स्वतःच्या टाकीत ओतायचो. " पाखी म्हणाली.

" वाह ! सासरेबुवाबद्दल नवनवीन माहिती कळत आहे आज. " अधिक म्हणाला.

" अधिक , ते पाईप बाजूच्या सलीमाबेगमच्या टाकीत टाक. " पाखी म्हणाली.

" का ?" अधिक म्हणाला.

" अरे यार. हे पाईप घे आणि आपल्या टाकीला लाव." पाखी म्हणाली.

अधिकने पाईप त्याच्या टाकीला लावले. पाखीने पाईपचे दुसरे टोक तोंडाला लावले आणि त्यातली हवा शोषून ते सलीमा बेगमच्या टाकीत बुडवले. आता सलीमा बेगमच्या टाकीतले पाणी अधिकच्या टाकीत जाऊ लागले.

" पाखू , रुकैया बेगमची टाकी नाही का ?" अधिक म्हणाला.

" तू गप रे. " पाखी म्हणाली.

दोघांनी मिळून बऱ्यापैकी स्वतःची टाकी भरली. त्यानंतर थकून दोघेही खाली आले.

" आता सर्वात आधी आंघोळ करतो. दिवसभर आंघोळ न केल्यामुळे कसतरी वाटत आहे. " अधिक म्हणाला.

" लवकर ये. मला पण करायची आहे आंघोळ. " पाखी म्हणाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अधिक ऑफिसला गेल्यावर पाखी महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेली.

" सर , टँकर बुक करायचे आहे. " पाखी म्हणाली.

" मिठाई लागेल. " अधिकारी म्हणाला.

" मिठाई नाही जलेबी भेटेल. स्वाती मॅडमला तर ओळखतच असाल. " पाखी म्हणाली.

" नाही ओळखत. " अधिकारी म्हणाला.

" मग आधी बोला. ओळख होऊन जाईल. " पाखी म्हणाली.

" हॅलो. " अधिकारी फोन हातात घेत म्हणाला.

" मी स्वाती किर्लोस्कर. नगरसेविका. माझा पक्ष अखिल भारतीय महिला मोर्चा. चिन्ह लिपस्टिक. तुम्ही अधिकारी टँकर बुक करत नाही आणि मतदार आम्हाला मत देत नाहीत. आताच्या आता पाखीचे टॅंकर बुक करा नाहीतर वरती तुमची तक्रार करेल. " स्वाती मॅडमने कडक स्वरात सुनावले.

***

अधिकाऱ्याने लगेच टॅंकर बुक केले. संध्याकाळी ते टॅंकर आले. रात्री पाखीने सर्व हकीकत अधिकला सांगितली.

" वाह पाखू ! तू आज टॅंकर बुक केलेस आणि लगेच ते आले पण !" अधिक म्हणाला.

" हो. मी तर त्या टँकरवाल्याला भाऊ पण बनवलं. त्याचा नंबरही घेतला. तो म्हणे यापुढे टॅंकर हवे असेल तर डायरेक्ट त्यालाच कॉल करायचं. " पाखी म्हणाली.

" पण त्या नगरसेविकेसोबत तुझी ओळख कशी ?"
अधिक म्हणाला.

" त्या ईरावरच्या प्रसिद्ध लेखिका आहेत. मी त्यांच्या कथांना मोठमोठ्या कमेंट द्यायचे. एकेदिवशी मीच मस्करीत म्हणले की त्यांच्या पोझेस राजकीय नेत्यासारख्या आहेत. मग काय त्या सिरियसली राजकारणात उतरल्या आणि नगरसेविका बनल्या. " पाखी म्हणाली.

" वाह पाखू. तुझ्या इतक्या ओळखी आहेत माहिती नव्हते मला. " अधिक म्हणाला.

" मग. विषय आहे का ? ट्रम्पपासून पुतीनपर्यंत सगळीकडे माझ्या ओळखी आहेत. " पाखी म्हणाली.

अधिक पाखी दोघेही हसले आणि पाखी अधिकच्या घट्ट मिठीत विसावली.

©® पार्थ धवन

🎭 Series Post

View all