पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा भाग ३अतिम भाग
विषय- दुस्वास
पोलीस इन्स्पेक्टर यांनी विलासराव आणि अलका दोघांना वैद्यकीय तपासणी साठी दवाखान्यात पाठवलं. आता पुढे
डॉक्टरांना इन्स्पेक्टर देशपांडेंनी विलासराव आणि अलका यांची केस सविस्तर सांगीतली होती. त्यामुळे विलासराव दवाखान्यात पोचल्यावर डाॅक्टरांच्या केबीनमधे दोघं शिरताच डाॅक्टर म्हणाले,
"विलासराव, बसा. मला तुमच्या मिसेस बरोबर काय घडलं आहे ते कळलय. तुमच्या बायकोला जबरदस्तीने एचआयव्ही असलेल्याचे रक्त दिलं गेलं आहे. त्यामुळे आम्हाला तिची तत्काळ एचआयव्ही चाचणी करावी लागेल."
"डॉक्टर, यामध्ये कोणता इलाज आहे ? आम्ही आता काय करू शकतो?"
"हो, विलासराव. सुदैवाने, तुम्ही लवकर आलात. बहात्तर तासांच्या आत एचआयव्ही प्रोफिलॅक्टिक थेरपी (PEP) सुरु केल्यास संसर्ग टाळण्याची चांगली शक्यता असते. आजच त्यांना एड्स बाधित रक्त दिलं आहे त्यामुळे आम्ही तातडीने औषधोपचार सुरू करू."
“ डाॅक्टर या उपचारांनंतर तिच्या आरोग्यावर काही परिणाम होईल का?"
विलासरावांनी घाबरत विचारलं.अलका तर पार दु:खाच्या दरीत कोसळली होती.
"या औषधांमुळे काही साइड इफेक्ट्स होऊ शकतात, जसे की थकवा, उलट्या, डोकेदुखी वगैरे. परंतु हे साइड इफेक्ट्स तात्पुरते असतात. दरम्यान, तिची नियमित तपासणी करावी लागेल."
"डॉक्टर, कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. आम्ही या परिस्थितीत काय करावे? आम्ही दोघेही फार घाबरलो आहे. असं काही आमच्या बाबतीत घडेल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं."
"धीर ठेवा, विलासराव. तुम्हा दोघांच्या मन:स्थितीची मला कल्पना आहे. आम्ही तुम्हाला संपूर्ण उपचाराच्या प्रक्रियेची माहिती देऊ. आम्ही वेळोवेळी तपासणी करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ. तुम्ही तुमच्या मिसेस स्वस्थ आणि तणावमुक्त कशा राहतील याची काळजी घ्या. यामध्ये मनाची ताकद खूप महत्त्वाची आहे."
“ ठीक आहे डाॅक्टर तुम्ही सांगाल तसं करू.”
डॉक्टर सिस्टर ला हात मारतात आणि सांगतात यांना घेऊन जा आणि आपल्या तपासणीचे तयारी करत तोपर्यंत मी येते.
सिस्टम अलकाला घेऊन तपासणीच्या खोलीत जाते. इकडे विलासराव दवाखान्यातील बेंचावर उद्विग्न होऊन बसलेले असतात. त्यांना काय करावे कळत नाही. ज्या मुलींना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवले, जपले त्यांनी पैशासाठी असं करावं ?इतक्या नीच पातळीवर जावं? हेच विलासरावंना पटत नव्हतं.
इतक्या खालच्या थरावर आपल्या मुलींची बुद्धी कशी गेली? यांना सुशिक्षित म्हणावं की अडाणी? एखादा अडाणी तरी बरा अशी म्हणण्याची वेळ आली. विलासरावंना काही कळत नव्हतं. त्यांच्या कपाळावर घाम साचलेला होता. त्यांना श्वास घ्यायला जड जात होतं.
त्यांना मनातून अस्वस्थ वाटत होतं कारण ज्या रोगाला सगळे इतके घाबरतात त्याचा प्रादुर्भाव जर आपल्या बायकोच्या शरीरात झाला तर काय करायचं ? तिने कसं जगायचं आणि तिला आपण सांभाळायचं कसं ? विलास रावांच्या मनात प्रश्नांचा भलामोठा अजगर त्यांना गिळायचा प्रयत्न करत होता.
विलासरावांनी पोलीस इन्स्पेक्टर देशपांडेंना फोन केला.
“ साहेब माझ्या मिसेसची तपासणी सुरू झाली आहे. आता पुढे काय करायचं?’
“ तुम्ही एफआयआर नोंदवली आहे मुलींवर आता डाॅक्टरांचा रिपोर्ट आला की आपण तुमच्या मुलींवर कारवाई करू.”
“ नेमकं काय करायचं?”
विलासरावांनी विचारलं.
“ हे बघा जर अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने एचआयव्ही (HIV) असलेल्या व्यक्तीचं रक्त दिलं गेलं, तर हे एक गंभीर वैद्यकीय आणि कायदेशीर प्रकरण आहे
यामध्ये भारतीय दंड संहिता (IPC) आणि अन्य कायद्यांचे कलम लागू होऊ शकतात, जसे की खुनाचा प्रयत्न करणे, एखाद्या व्यक्तीला धोका निर्माण करणे, आणि गुन्हेगारी हेतूने शारीरिक हानी करणे.
तपासानुसार जे कळेल त्यानंतर मग खुनाचा प्रयत्न कलम 307, IPC, इतर शारीरिक इजा कलम 324, IPC आणि इतर संबंधित कलमांतर्गत आपण तुमच्या मुलींवर गुन्हा नोंदवू शकतो.”
“ हे कधी करायच?”
विलासरावांनी विचारलं.
“ डाॅक्टरांचा रिपोर्ट आल्यावर आपल्याला पुढची कारवाई करता येईल. तुम्ही निर्धास्त रहा. तुम्ही नक्की तुमच्या मुलींवर कारवाई करायला तयार आहात नं? की ऐनवेळी कच खाल आणि नाही म्हणाली?”
“नाही. आम्ही कारवाई करायला तयार आहोत. आम्ही दोन्ही मुलींचे पालन पोषण इतक्या व्यवस्थित केलं आणि त्याचे हे फळ मिळालं. इन्स्पेक्टर साहेब आमच्या प्रेमाचा, ममतेचा त्यांनी अपमान केला आहे. आम्ही बचत करून काटकसरीने संसार केला पण मुलींना काही कमी पडू दिलं नाही. आमच्याजवळ जी संपत्ती आहे ती आम्ही असताना यांच्या भविष्यासाठी का खर्च करायची? आमचं म्हातारपण आहे. आमच्या नंतर त्यांचच होणार आहे सगळं. साहेब जी काही रितसर कारवाई करावी लागेल ती आम्ही करू.”
एवढं बोलताना विलासरावांना दम लागला.
अलकाची तपासणी चालू असताना तिच्या मनात काहूर माजलं होतं. इतकी कोत्या मनोवृत्तीच्या आपल्या मुली आहेत? की नव-यांच्या सांगण्या वरून त्या तशा वागल्या? काहीच कळत नाही. नवरे म्हणाले म्हणून यां दोघींनी आपलं स्वत्व का सोडावं? ठणकावून सांगता आलं नाही नव-यांना?
कितीतरी वेळ अलका विचारात बुडाली होती. डाॅक्टरांनी अलकाला सगळ्या तपासण्या झाल्या असं सांगितलं. ती थकल्या पावलांनी खोलीबाहेर आली. बेंचवर विलासराव गंभीर चेहे-याने बसले होते. त्यांचा चेहरा बघून अलकाचं काळीज गलबललं. ती हळूहळू त्यांच्या जवळ गेली.
“ अहो झालं माझं. घरी चालता नं?”
“ हो. चल जाऊ. “
विलासराव हळूच उठले. दोघं दवाखान्या बाहेर पडले.
“हे बघ अलका आपण आपल्या मुलींवर कायदेशीर कारवाई करायची आहे. मधेच तुझं मुलींवरचं प्रेम उफाळू देऊ नको.”
अलका काहीच बोलत नाही.
“ कळतंय नं? तुझ्या मातृत्वाचा आपल्या मुलींनी अपमान केला आहे. त्याला माफी नाही. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मी आता मृत्यूपत्र बदलणार आहे.”
“ म्हणजे?”
अलकाने काही न समजून विचारलं.
“ मी आता आपल्या नंतर आपली संपत्ती या मुलींना देणार नाही. मी एका चांगल्या संस्थेचा शोध घेऊन त्यांना खटल्याचा खर्च वगळून उरतील ते पैसे संस्थेला आणि आपलं घर दान देणार आहे. आपल्या पैकी जो शेवटी राहील. त्याने सरळ चांगल्या केअरटेकर संस्थेत जायचं. कळलं का ? या आपल्या मुली नाही. हे तू मनाला बजाऊन सांग.कळलं?”
अलका ने नुसती मान हलवली.तेवढ्यात एक रिक्षा तिथे आला. दोघं त्यात बसून आपापल्या स्वतंत्र विचाररथात बसून घरी निघाले.
_________________________
समाप्त
©® मीनाक्षी वैद्य.
_________________________
समाप्त
©® मीनाक्षी वैद्य.
टीप ही कथा मालिका फार वर्षांपूर्वी घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा