Login

परकी : भाग दुसरा

इंदू मावशीच्या आयुष्याची अनोखी कहाणी
इंदू मावशीला तिचं हसरं, निरागस, उडतं बालपण आठवत होतं. कोकणातल्या छोट्याश्या खेडेगावातली इंदू, गव्हाळ रंगाची असली तरी नाकी डोळी एकदम सुंदर होती. नारळी पोफळीच्या बागेत आईच्या साडीपासून शिवलेल्या भल्यामोठ्या घेरदार परकराचा घेर सांभाळत धावत होती. त्या दिवशी वाडीत मैत्रिणींसोबत रंगलेला लपंडावाचा खेळ तिच्या वहिनीने मध्येंच थांबवला होता.

धावणाऱ्या इंदूचा हात सोळा सतरा वर्षांच्या नव्या नव्या वहिनीने हातात धरून तिला अलगद सगळ्यांपासून लांब माळावर आणलं होतं. आपल्या ह्या नव्या वहिनीला बाळ होणार हे गुपित कळल्यावर इंदूची कळी कोण खुलली होती. आपण बाळाची आत्या होणार ह्या कल्पनेनं इंदू खुलून गेली होती. गिरक्या काय घेत होती, गाणी काय गात होती. आनंदात होती एकदम!

"वहिनी, तुला बाळ झालं की मी छान न्हाऊ माखू घालेन त्याला. काळजी घेईन त्याची. तू पण मग माझ्यासाठी माझ्या आवडत्या सांजोऱ्या करायच्यास हं!"

"हो वन्स बाई! नक्की करेन सारं! आत्ता घराकडे जाऊया कारण उद्या तुम्हाला बघायला पाहुणे येणार आहेत म्हणे." वहिनीने हळूंच इंदूच्या कानात गोड बातमी सांगितली आणि मग तर इवलीशी इंदू आनंदानं वेडीपिशी झाली.

"खरंच? बापू माझं लग्न लावणार? मला पाहुणे पाहायला येणार म्हणजे गोडाचा खाऊ मिळणार, नवं लुगडं आणि खण मिळणार, भरपूर दागिने घालायला मिळणार आणि हो! नवरा! तोसुद्धा मिळणार की! अगदी शेजारच्या सखू सारखं. तिच्या लग्नाच्या वेळी काय धमाल केली होती माहित्ये का आम्ही वहिनी! गुदगुल्या करणं, लवंगा लपवणं, केळीच्या मांडवाखालून जाऊन देवाला पुजण, लग्नाचे विधी आणि मग घोड्यावरून वरात ! खूप गंमत असणार आहे गं! लग्न झालं तरी सखू अजून आईबापाच्यातचं राहतेय की म्हणजे मलाही इकडे राहायला मिळेल अजून! तुझ्या बाळाशी खेळता येईल." इंदू आनंदात होती. वहिनीकडे मन मोकळं करत होती.

दुसरा दिवस उगवला, पाहुणे घरी आले. छोटी इंदू लुगड्याचा घोळ सावरीत हसत आनंदाने त्यांना सामोरी गेली. ती आवडली सगळ्यांना. मग काय झटक्यात खाऊचा पुडा मिळाला, साडी खण मिळालं आणि आठवडाभरात अंगणात मांडवसुद्धा पडला. इंदू हरखून गेली होती. अंतरपाट पडे पर्येंत तिचा हा उत्साह टिकून राहिला पण मंगलाष्टक झाली आणि अंतरपाट दूर झाला, चेहरा वर करून पाहायची तिची हिंमत होईना. समोर पलीकडच्या बाजूला पाटावर उभी असलेली काळी सावळी भलीमोठी पावलं पाहून इंदू घाबरून गेली.
"बापरे! किती मोठा नवरा आपला! सखूचा नवरा किती छान होता अगदी आपल्या दाद्या सारखा. शाळेला जाणारा, आपल्यातलाचं वाटायचा पण हा असा कसा आपला नवरा..." इंदूच्या मनात आलं.

वरमाळ घालायला उभी राहिली तेव्हा तिच्या पेक्षा दुप्पट उंचीच्या नवऱ्याला माळ काही घालता येईना मग मामाने तिला उचलून घेतलं आणि तिने नवरदेवाच्या गळ्यात माळ घातली त्या निम्मिताने म्हणून तेवढं तिने आपल्या नवऱ्याला पाहून घेतलं. ओठांवर काळ्याभोर मिशांचा झुपका होता त्याच्या. "सखूच्या नवऱ्याला काही दाढी मिशी नव्हती बुआ!" इंदूचं मन सारखं सखू आणि तिच्या नवऱ्याभोवती फिरत होतं. इंदूला हवे तसे तिच्या अंगंभर दागिने होते, जरीचं लुगडं होतं अगदी सखूपेक्षा सगळं कांकणभर जास्तचं होतं पण तरीही ती नाराज झाली होती बिचारी. सगळं हवंहवंसं होत असूनही खूप मोठ्यांदा रडावसं वाटत होतं इंदूला.

जेवणं झाली आणि इंदू आईच्या, काकूच्या गळयात पडली. काकूने तिच्यापरीने इंदूची समजूत घातली. कोणीतरी म्हणत होतं ते नेमकं इंदूच्या कानावर पडलं,
"बिजवर आहे नवरदेव एवढं सोडलं तर लाखात एक स्थळ आहे हे. इंदूचं भलं झालं." इंदूच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. तिने हळूंच आईला विचारलं,
"आई गं बिजवर म्हणजे काय?" आई काहींचं नं बोलता गप्प झाली. वर्षभर इंदू माहेरीचं राहील असं ठरलं.

वर्ष बघता बघता कसं उलटलं कळलं नाही. एक दिवस मग इंदूच्या सासूबाई तिच्या घरी आल्या. इंदूच्या सासूबाई इंदूच्या वडिलांना म्हणाल्या,
"आमच्या बापूचं शिक्षण संपलं. तो आलाय गावाकडे परत. इंदूला नांदवायला घेऊन या म्हणाला म्हणून मग चांगला दिवस पाहून आलो आज न्यायला आमच्या घरच्या लक्ष्मीला." आणि तासाभरात तिला घेऊनही गेल्या. निघतांना इंदूला अश्रू अनावर झाले होते. सगळं घर उदास होऊन गेलं होतं. लेकीच्या पाठवणीवेळी इंदूची आई हुंदके देऊन रडली होती. वहिनी, दादा, वडील, काकू, काका सगळेचं रडले. एव्हाना वहिनीचं बाळ चांगलं चार पाच महिन्यांचं झालं होतं. इंदू मग त्याच्या गालाचा पापा घेऊन रडली होती. पाय निघत नव्हता पण सासरी जाणं भाग होतं.

शेवटी मन घट्ट करून इंदू सासूच्या पावलावर आपलं पाऊल ठेऊन तिच्या मागोमाग आयुष्याच्या नव्या प्रवासाला निघाली. पुढे काय वाढून ठेवलं आहे त्याची तिला सुरताम कल्पना नव्हती.

©️®️सायली पराड कुलकर्णी.

क्रमशः

वरील कथा काल्पनिक असून वास्तवाशी काही संबंध नाही, आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लेखिकेच्या नावासहित शेअर करायला परवानगी आहे. साहित्यचोरी हा गुन्हा असून असे केल्याचे आढळ्यास कारवाई करण्यात येईल.
0

🎭 Series Post

View all