Login

परकी : भाग पहिला

इंदू मावशीच्या आयुष्याची अनोखी कहाणी
इंदुमावशीची तब्येत आज सकाळपासून चांगलीचं खालावली होती. शेवटचे क्षण जवळ आले होते तिचे. थकला, भागला, अस्थिपंजर झालेला क्षीण देह शेवटचे श्वास मोजून घेत होता. म्हाताऱ्या इंदू मावशीची साठी उलटून गेलेली सून आपल्या मरणासन्न सासूच्या डोक्यापाशी बसली होती. सासूच्या नाकाजवळ दोऱ्याचं सूत धरून अंदाज लावणं सुरु होतं. सत्तरीच्या घरात पोचलेला लेक आईच्या तोंडात देवघरातल्या "गंगेचं" पाणी कापसाच्या बोळ्याने थेंब थेंब घालत होता. ओठातून आत पर्येंत मात्र ते पाणी जात नव्हतं. ते दोन थेंब पाणी जिरवण्याचीही शक्ती आता इंदू मावशीच्यात राहिली नव्हती. तिच्या दोन लेकीसुद्धा एव्हाना घरी पोहचल्या होत्या. जमलेल्या प्रत्येकाच्या मनात 'तिची सुटका आता लवकर व्हावी' हिचं भावना होती.

तिचा गोतावळा तसा बऱ्यापैकी होता. शेजारपाजारचे लोक, तिच्या स्वतःच्या दोन लेकी, दोन जावई, झालंच तर दोन सुना, सुनांच्या माहेरच्या घरचे असे बरेच आप्त इंदू मावशीच्या घरापाशी जमले होते. तिची नातवंडंही गोळा झाली होती. घरात मृत्यू आsss वासून उभा होता. जन्मल्या पासून आत्ता पहिल्यांदाचं ही इंदू मावशी अशी अंथरुणाला खिळली होती. नाहीतर उभ्या आयुष्यात इंदू मावशीला कधी साधा सर्दी खोकला झालेलाही कोणी पाहिलं नव्हतं. तिला तिच्या तरुणपणी आजारी पडणं शक्यही नव्हतं म्हणा! महिनाभरापूर्वी अंगणात ओलसर फारशींवरून पाय घसरून पडल्यामुळे ती अशी अंथरुणावर पडली होती. घसरून पडल्यामुळे मुकामार लागला तिच्या अंगांत कणकण भरली.

"उगीचं थोडं अंग गरम आहे. अशी पटकन बरी होते." म्हणणारी इंदू मावशी वयापरत्वे बरी काही झाली नाही. तिने अंथरूण धरलं. सुरुवातीला पातळ खिचडी, भात, खीर असं काहीबाही तरी खाणारी मावशी मागच्या चार दिवसांपासून काहींचं खाईना. पाणीसुद्धा पिणं तिला नको वाटत होतं. तोंड नुसतं कडू जहर झालं होतं. गात्र थंड पडत चालली होती. आत्ता बरं वाटेल मग बरं वाटेल असं करत करत आले दिवस ढळत होते पण इंदू मावशी काही बरी होईना. सुरुवातीला निदान डोळे उघडून, कूस बदलून निजणारी इंदू मावशी मागच्या दोन / चार दिवसांपासून अगदींच निपचित झाली आणि हळूहळू तिची शुद्धही हरपू लागली होती.

लेकाने मग फोन करून सगळ्यांना बोलावून घेतलं होतं. सगळे जमले आणि आता म्हातारीच्या जाण्याच्या बातमीची वाट पाहू लागले. नातवंडांना कॉलेज होतं. लेकी सुनांना संसाराची काळजी होती. तसंही ह्या इंदू मावशीचा जीव कोणात किंवा कोणत्या वस्तुत अडकवा असं आता काहींचं उरलं नव्हतं. तिचा संसार कधीचं पूर्ण झाला हॊता पण जीव कुठेतरी घुटमळत होता तिचा. नेमका कशात? तिला स्वतःलाही कळत नव्हतं.

आजूबाजूला सगळे जमलेले आहेत. आपल्या बद्दल चर्चा सुरु आहेत ही सगळी बोलणी इंदू मावशीच्या कानापर्येत पोहचत होती. तिला मनातल्या मनात सगळं समजत होतं. बाहेरून शरीरानं क्षिणली असली तरी मेंदू, भावना आणि अंतर्मन अजूनही शाबूत होतं. तिला बोलता येत नव्हतं इतकंच. मिटल्या डोळ्यापुढे सगळ्या आयुष्याचा चित्रपट उलगडत होता. इंदू मावशी विचारांच्या गोधडीत गुरफटून गेली होती.

इतक्यात इंदू मावशीची मोठी मुलगी आपल्या भावाला म्हणाली,
"आपले अण्णा बघ ना रे किती पुण्यवान माणूस! चालते बोलते असताना गेले. कसलं आजारपण नाही की कोणाला कसला त्रास नाही. तुला नोकरी लागली आणि इकडे ह्यांनी एक्सिट घेतली." लेकीच्या बोलण्यात बाबांविषयीचं कौतुक ओसंडून वाहत होतं.

इंदू मावशीच्या डोक्यापाशी बसलेल्या सुनेचं लक्ष एकदम हातातल्या दोऱ्याकडे गेलं. दोरा हलकेचं थरथरत होता. सून विस्मयकारी नजरेनं पाहत होती.

"आईंना जाग येतेय वाटतं. दोरा हालतोय बघा." तिचं वाक्य पूर्ण होतंय तोवर सगळेजण इंदू मावशीच्या दिवाणापाशी जमले. मिटल्या डोळ्यांनी मनातल्या मनात इंदू मावशी जरा सुखावली.

"चला किमान आत्ता तरी मजजवळ जावे वाटले सगळ्यांना. जन्मभर लेकरांच्या तोंडी बाबांच्याचं मायेचे गोडवे होते. आता त्यांना जाऊन इतकी वर्ष झाली तरी त्यांचेच नाव लेकरांच्या ओठी. आई म्हणून आपण काहींचं केलं नाही का ह्यांच्यासाठी? कायम कौतुक सोहळा असला कि आपण उपेक्षित राहिलोय! का बरं हे असं नशीब घेऊन जन्मलो आपण! तरी बरं नणंदबाई, सासूबाई घडलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि आमच्या संसाराच्या सगळ्या बाबतीत साक्षिला होत्या. काय बोलणार म्हणा त्या तरी! एकामागोमाग धसक्यानं हाय खाऊन गेल्या बिचाऱ्या." इंदू मावशीच्या मनात विचारचं विचार येत होते. विचारांची आणि सोबतचं आयुष्याची क्षीण झालेली दोरी तुटता तुटत नव्हती.

आत्ताच्या शेवटच्या क्षणी तरी मनातलं सगळं सगळ्यांच्या पुढ्यात बोलून टाकावं असं इंदू मावशीला वाटत होतं पण जिभेतुन प्राण केव्हांच उडून गेला होता. ती लुळी जीभ कधीतरी आधीचं भूतकाळात जमा झाली होती.

©️®️सायली पराड कुलकर्णी.

क्रमशः

वरील कथा काल्पनिक असून वास्तवाशी काही संबंध नाही, आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लेखिकेच्या नावासहित शेअर करायला परवानगी आहे. साहित्यचोरी हा गुन्हा असून असे केल्याचे आढळ्यास कारवाई करण्यात येईल.
0

🎭 Series Post

View all