Login

परकी

धाकटी बहीण मोठ्या बहिणीला सावत्र शब्द वापरून परके करते
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
( संघ कामिनी )

कथेचे नाव - परकी

"डॉक्टर! मला कोणी काही बोलले तर मी खूप जीवाला लावून घेते. माझी बहीण मला खूप वाट्टेल तसे बोलली. तिच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती, कारण तिच्यावर मी मनापासून प्रेम केले होते. तिला मी बहिणीपेक्षा जिवाभावाची मैत्रीण समजत होते. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट मी तिच्याशी शेअर करायचे. तिने मला परके केले. तिचा शब्द नि शब्द माझ्या जिव्हारी लागला आहे. सारखी मनाला एक सल टोचते आहे. त्यामुळे मला अतिशय मानसिक त्रास झाला आहे. प्लीज डॉक्टर, काहीतरी औषध द्या." रिद्धी म्हणाली.

"ओके! इतकं मनाला लावून घेणं चांगलं आहे का? तुम्हालाच जास्त त्रास होईल. ठीक आहे, मी जे औषध देते आहे त्याने दोन दिवसांच्या आत तुम्हाला फरक जाणवू लागेल. डोन्ट वरी." मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रेश्मा म्हणाल्या.

डॉक्टरांकडून रिद्धी घरी आली. मनामध्ये असंख्य विचार तर चालूच होते. नकळतपणे ती भूतकाळात शिरली.

रिद्धी तीन वर्षांची होती तेव्हा तिचे वडील हृदयविकाराने वारले. रिद्धीची आई वसुधा तरुण असल्यामुळे तिच्या माहेरच्यांनी तिच्यामागे दुसरे लग्न कर असा लकडा लावला होता. पहिल्यांदा वसुधा तयार नव्हती; पण पदरात एक लेक असल्यामुळे तिच्या भवितव्यासाठी तिने जवळपास वर्षभराने दुसऱ्या लग्नाचा विचार केला. एका विधुराचे, श्री. संदीप यांचे स्थळ वसुधासाठी सांगून आले आणि वसुधाचे लग्न संदीप यांच्याशी झाले.

वसुधाला आणि रिद्धीला एक आधार मिळाला होता. लग्नानंतर वसुधाला दिवस गेले आणि दुसरी मुलगी झाली. रिद्धीच्या नावावरून छोट्या बाळाचे नाव सिद्धी ठेवले. वसुधा आणि संदीप यांनी ठरविले की, आपण ह्यापुढे मूल होऊ द्यायचे नाही, ह्या दोघींनाच चांगले शिक्षण वगैरे देऊन त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन करायचे.

रिद्धी-सिद्धी एकत्र मोठ्या होत होत्या. रिद्धी मोठी असल्याने साहजिकच आपोआप एक मोठेपण तिच्यामध्ये आले होते. मुळातच ती शांत असल्याने ती कधी कोणाला उलटसुलट बोलत नव्हती, कधी तिने कुठलेही हट्ट केले नव्हते. आपल्या धाकट्या बहिणीवर सिद्धीवर तिचे जीवापाड प्रेम होते.

रिद्धी आता वयात येत होती म्हणून वसुधा आणि संदीप यांनी रिद्धीवर बरीच बंधने घातली होती. नवीन कपडे घालून कॉलेजमध्ये जायचे नाही, कुठल्या मैत्रिणीच्या घरी जायचे नाही, कॉलेजमधून सहलीला जायचे नाही, मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जायचे नाही, सातच्या आत घरी आलेच पाहिजे अशी एक ना अनेक बंधने रिद्धीवर लादलेली होती. रिद्धीने त्यावरून देखील कधीही कोणाकडे तक्रार केली नव्हती. रिद्धी लहानपणापासूनच अतिशय सहनशील होती. रिद्धी सारं काही लहानपणापासूनच जाणून होती की, आपल्या आईचे दुसरे लग्न झाले आहे. तरीही तिने कधीही पप्पांना सावत्र वडील मानले नव्हते किंवा कधी सिद्धीला सावत्र बहीण मानले नव्हते आणि रिद्धीचे पप्पा देखील ही माझी सावत्र मुलगी आहे अशी कोणाकडे वाच्यता करत नसत.

रिद्धीने आईवडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. रिद्धीचे सासर त्यांच्या अगदी बाजूच्याच गल्लीमध्ये होते. रिद्धीचा नवरा हेरंब खूप समजूतदार आणि प्रेमळ असल्याने रिद्धीच्या पप्पांचा विरोध आपसूकच मावळला होता. लग्नानंतर एका वर्षात रिद्धीला मुलगा झाला होता. सिद्धी आपल्या भाच्याचे खूप लाड करत असे. आता सिद्धी वयात येत होती; परंतु रिद्धीसारखी बंधने तिला लावली गेली नव्हती. पुढे सिद्धीचे देखील लग्न झाले. तिने देखील प्रेमविवाह केला. लग्नानंतर ती आणि तिचे मिस्टर नोकरीसाठी म्हणून बंगलोरला निघून गेले त्यामुळे वर्षातून दोन-तीन वेळा तिला मुंबईमध्ये यायला जमायचे. दरम्यान सिद्धीलासुद्धा मुलगा झाला होता. त्याचे नाव अनिकेत ठेवले होते.

रिद्धीचा मुलगा अनिरुद्ध कॉलेजमध्ये जाऊ लागला होता, त्याच काळात रिद्धीच्या पप्पांना वारंवार हृदयविकाराचा त्रास होऊ लागला होता. तेव्हा रिद्धी, हेरंब आणि रिद्धीच्या सासरच्या लोकांनी रिद्धीच्या आईला खूप मानसिक आधार दिला होता. रिद्धीचे पप्पा हृदयविकाराच्या झटक्याने वारले. सिद्धी बंगलोरवरून अनिकेतला घेऊन आली. रिद्धी जवळच राहत असल्याने पप्पा गेल्यावर ती आईकडे राहायला नाही गेली कारण तिच्यावर सासरच्या देखील जबाबदाऱ्या होत्या; पण ती रोजच्या रोज आपल्या घरातील कामे आवरून मम्मीकडे जात होती. सिद्धी मम्मीसाठी थांबली होती. पुढे सिद्धी पुन्हा बंगलोरला निघून गेली. रिद्धी सासर-माहेर दोन्हीकडची कर्तव्ये पार पाडत होती.

रिद्धीचा साठावा वाढदिवस तिच्या नवऱ्याने आणि लेकाने मोठ्या उत्साहात साजरा केला होता. वाढदिवसाला सिद्धी देखील आली होती. चार दिवस मुंबईमध्ये आईकडे राहून सिद्धी पुन्हा बंगलोरला निघून गेली. सिद्धीची विचारपूस करण्यासाठी रिद्धीने तिला फोन लावला,

"कशी आहेस सिद्धी? अनिकेत कसा आहे?" रिद्धीने विचारले.

"मी ठीक आहे. मला तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत." सिद्धी म्हणाली.

"हां बोल ना." रिद्धी म्हणाली.

"ताई! तू प्रत्येकवेळी कर्तव्यात मागे पडतेस. मम्मीच्या बाबतीत तू तुझी कर्तव्ये पार पाडत नाहीस. पप्पा वारले त्यावेळी देखील तू मम्मीसाठी घरी येऊन राहिली नव्हतीस. तुझ्यासाठी ते सख्खे वडील नसले तरी नाव लावायला तरी ते तुझे वडील होते. तू माझ्याशी कायम सावत्रपणाने वागलीस त्यावरून मी तुला कधीचं काही बोलले नाही आणि तुझ्याशी नाते तोडले नाही. शेवटी सख्खे ते सख्खे असते आणि सावत्र ते सावत्र असते....." सिद्धी मोठमोठ्यांदा ओरडून एकावर एक रिद्धीवर आरोप लावत सुटली होती.

समोरून सिद्धी तिची भडास काढत होती आणि रिद्धी ती काय बोलते आहे ते फक्त ऐकून घेत होती. रिद्धीला सिद्धीच्या बोलण्याने एकदम शॉक लागला होता, कारण सिद्धीकडून तिला अशा वागण्याची अपेक्षाच नव्हती. ज्या बहिणीवर जीवापाड प्रेम केलं होतं, आज त्याच बहिणीने वयाच्या साठाव्या वर्षी तिला सावत्र शब्द वापरून एका क्षणात परकं करून टाकलं होतं.

रिद्धीला सिद्धीच्या बोलण्याने हृदयाचे असंख्य तुकडे पडल्यासारखे वाटले. इतकी वर्षे सिद्धीच्या मनात तिच्याविषयी असे काही असेल असे रिद्धीला स्वप्नात देखील वाटले नव्हते. खूप निर्मळ मनाने रिद्धी सिद्धीवर प्रेम करत होती. रिद्धीने सिद्धीला सावत्र बहीण ह्या दृष्टिकोनातून कधीच पाहिले नव्हते; परंतु सिद्धी इतकी वर्षं सावत्र बहीण ह्याच दृष्टिकोनातून रिद्धीला पाहत असल्याने तिने तिच्या मनातले कित्येक वर्षांचे साठलेले ओकले होते. रिद्धी अगदी लहानपणापासून आपण सिद्धीशी कसे वागलो हे आठवून पाहत होती; परंतु तिला एकही क्षण असा आठवला नाही की रिद्धी सिद्धीशी कधी वाईट वागली होती. उलट सिद्धी हक्काने रिद्धीच्या घरी अगदी आवडीने राहायला जायची. रिद्धीच्या सासरी देखील सिद्धीचे लाड व्हायचे. जिजूंसोबत तिचे आपुलकीचे संबंध होते.

सिद्धीच्या अशा वागण्याने रिद्धीचा नातेसंबंधांवरचा विश्वासच उडाला होता. सगळ्यांत कळस म्हणजे रिद्धीने तिच्या मम्मीला सिद्धी कशी वाट्टेल तशी बोलली हे सांगूनदेखील मम्मीच्या तोंडून एकही शब्द नाही आला की, 'कधीतरी एखादं कर्तव्य करायचे राहून गेले असेल तुझ्याकडून; पण सिद्धीने तुला एवढे बोलायला नको होते. एवढ्या मोठ्या बहिणीला बोलण्याचा तिला अधिकारच नाही.' रिद्धीला मान्य होते की, आईला सगळी मुले सारखी असतात. आई कोणाच्या बाजूने बोलू शकत नाही; पण मम्मीने सिद्धीला योग्य ते बोलायला काहीच हरकत नव्हती.

सिद्धीचा प्रत्येक शब्द नि शब्द मनाला वेदना देऊन गेला होता त्यामुळे रिद्धी त्या मानसिक आघातातून बाहेर पडत नसल्याने शेवटी तिला मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. रिद्धीच्या लेकाला अनिरुद्धला देखील आपल्या मावशीकडून ही अपेक्षाच नव्हती. त्याला कायम वाटायचे की, कठीण प्रसंगी जग एकीकडे असेल आणि मावशी एकीकडे असेल. अनिरुद्ध मावशीच्या मनातील किल्मिष काढण्याचा प्रयत्न करणार होता; पण सिद्धीने त्याचाही संपर्क तोडला होता. सिद्धीचे मन तिच्याविषयी इतके कलुषित झाले असल्याने रिद्धीने तिच्याशी संबंध तोडले होते. रिद्धीला कायम वाटायचे की, देवाने मला एक बहीण दिली तर देवाचे माझ्यावर उपकारच झाले आहेत त्यामुळे तिच्या रूपाने मला जवळची, प्रेमाची मैत्रीण मिळाली; पण सिद्धीच्या मनात वेगळेच होते.

"रिद्धी! मला चहा देतेस का?" हेरंबने रिद्धीला हाक मारली. हेरंबची हाक ऐकल्यावर रिद्धीची तंद्री भंगून ती भूतकाळातून बाहेर आली. रिद्धी चहाचा कप घेऊन हेरंबच्या पुढ्यात येऊन उभी राहिली.

रिद्धीचे रडून रडून सुजलेले डोळे पाहून हेरंब तिला म्हणाला,
"रिद्धी! कशासाठी इतकी झुरते आहेस? तुझ्या मनाला माहिती आहे ना की तू तुझ्या घरच्यांवर खूप प्रेम केले आहेस, कर्तव्ये पार पाडली आहेस तर मग का इतकं जीवाला लावून घेतले आहेस? आपण बोलणाऱ्यांचं तोंड नाही धरू शकत किंवा त्यांच्या मनातले गैरसमज देखील काढू नाही शकत. तू जर अशी झुरत राहिलीस तर तू अशीच मरून जाशील. मेलीस तर सुटशील; पण जास्त विचार करून करून जर लुळीपांगळी होऊन पडलीस तर कसे जगशील पुढचे परावलंबी जीवन? तुला आमच्या दोघांचे काहीच वाटत नाही? तुला आमच्यासाठी जगायचे नाही? तू आम्हाला हवी आहेस याचा विचार कर. कोणीही कसेही वागले तरी सर्वांसाठी तुला तुझी कर्तव्ये करायला लागणारच आहेत. आता आपल्याला सून देखील येणार आहे. सासू म्हणून सुनेचे लाड तुला करायचे नाहीत? उद्या आपल्याला अनुष्काच्या घरी लग्नाची तारीख ठरवायला जायचे आहे तर त्यांच्या घरी नेण्यासाठी फळे, मिठाई आणायची आहेत की नाही? आता पूर्णपणे फ्रेश हो आणि आपल्या लेकाच्या लग्नाच्या तयारीला उत्साहाने लाग बरं."

हेरंबने रिद्धीची समजूत काढली.

"हो! मी फ्रेश होते. मग आपण फळे, मिठाई आणायला मार्केटमध्ये जाऊया." रिद्धी म्हणाली आणि मनातले मळभ दूर सारून लेकाच्या लग्नाची तयारी सुरू करण्यासाठी सज्ज झाली.

( समाप्त )
©सौ. नेहा उजाळे
ठाणे
0