परत फिरा रे.. भाग १

परदेशात गेलेली मुलं परत येतात तेव्हा

परत फिरा रे..
जुळले बंध पुन्हा - भाग १


"अरे काय म्हणतोस राजन. गेल्यावेळी मी घरी आले तेव्हा राधा वहिनी अगदी ठणठणीत होत्या. अचानक असं काय झालं?"

"हे जीवन अशाश्वत आहे रेवा. कुणाच्या बाबतीत काय घडेल कधी सांगू शकत नाही."

"हो ना अगदीच खरं आहे."

रेवा जवळजवळ दोन-तीन महिन्यांनी आपल्या माहेरी आली होती. त्यांच्या सोसायटीतील राधा चितळे म्हणजेच राधावहिनी बद्दल राजनने, रेवाच्या भावाने तिला सांगितलं होतं की राधा वहीनी अचानक घरात पडल्या आणि त्यांना पॅरॅलिसिसचा अॅटॅक आला. रेवा स्वभावाने खूपच हळवी होती असं काही ऐकलं की तिला खूपच वाईट वाटायचं. तिने राजनला मी थोडा वेळ राधा वहिनींकडे जाऊन येते असे सांगितले आणि ती लगेच त्यांच्या घरी गेली. बेल वाजवल्यावर एका बाईने दरवाजा उघडला. ती तडक राधावहिनी जिथे झोपल्या होत्या तिथेच गेली.

"राधा वहिनी असं कसं अचानक झालं. अशा कशा पडलात तुम्ही घरी. मला सांगा नक्की काय झालं ."

"अगं हो रेवा जरा बस तरी अशी घाबरून जाऊ नकोस. दोन-तीन दिवसापासून मला गरगरत होतं आणि आज जाऊ डॉक्टर कडे उद्या जाऊ असं करून मी टाळाटाळ करत होते. नंतर एक दिवस चक्कर येऊन पडले. नशीब माझा फोन जवळ होता मी लगेच राजनला फोन केला. तो डॉक्टरांना घेऊनच आला. माझं बीपी खूप वाढलं होतं त्यामुळे मला पॅरालीसीसचा अटॅकच आला गं. राजननेच रोहितला फोन केला त्याला काही येता आलं नाही त्याची बायको रुही येऊन गेली. तिनेच मग राजनच्या मदतीने मला डॉक्टरांकडे नेलं. हॉस्पिटलयझेशन केलं आणि आता ह्या एक ताई सुद्धा २४ तासांसाठी माझ्याबरोबर राहायला आहेत."

"काळजी करू नका तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन त्यासाठी तुम्हाला खूप उपयोगी पडेल."

"एकटीला राहायचं म्हणजे मला लवकरच बरं व्हायला लागेल. फिजिओथेरपी वगैरे चालू आहे बघू आता कसं होतंय ते."

"खरंतर रोहित आणि राकेश दोघांपैकी एकाने तरी थोडे दिवस रजा घेऊन तुमच्याजवळ येऊन राहायला हवं होतं."

"कसं असतं ना रेवा एकदा पाखराला पंख फुटले की ते मुक्त संचार करत असतं. तुला तर सर्व माहीतच आहे. आपण सर्व कुटुंबं ह्या सोसायटीमध्ये एकत्रच राहायला आलो आहोत. आई, अण्णा, सुजय माझा दीर, अर्चना नणंद, आम्ही दोघं आणि आमची दोन मुलं असं आमचं एकत्र कुटुंब खूप आनंदात नांदत होतं. आईंचं सोवळं ओवळं किती कडक होतं. अण्णांना तर घरात नखं कापलेली पण चालत नसत. ते तर स्वतः त्या रस्त्याच्या पलीकडे जाऊन नखं कापून येत असत. घरात कोणाची मदत नसायची सर्व सांभाळून मी शाळेत जायचे."

"हो ना आम्हाला सर्वांनाच त्यावेळी तुमचं फार कौतुक वाटायचं. आजींचा तर सारा वेळ पूजा अर्चेतच जायचा. अर्चनाताईंनी तर लग्न होईपर्यंत मला नाही वाटत कोणत्या कामाला हात लावला असेल."

"ते सर्व जाऊदे ज्याचं त्याचं नशीब असतं. रोहित आणि राकेश दोघेही अभ्यासात हुशार होते चांगले मार्क मिळवून बारावी झाले. आधी रोहित इंजिनियर झाला त्याला एम एस करायचं होतं. आर्थिक परिस्थिती पण चांगली होती त्याला आम्ही यूएस ला पाठवलं. नंतर राकेशचं पण इंजीनियरिंग झाल्यावर त्याला सुद्धा रोहितने तिथे बोलावून घेतलं. त्यावेळी आम्हाला सुद्धा आनंद झाला दोघं भाऊ एकाच ठिकाणी राहतात, प्रगती करताहेत. खूप आनंद होत होता तेव्हा."

"हे सर्व ठीक आहे पण आता काका पण नाहीयेत, तुम्ही अगदीच एकट्या आहात आणि आता तर तुम्ही उठूही शकत नाहीत अशावेळी तरी त्यांनी काही दिवस तरी इथे यायला हवं असं मला तरी वाटतं."

"नुसतं आपल्याला वाटून उपयोग नाही गं रेवा. त्यांच्या मनात तसा विचार यायला हवा ना."

(दोन मुलांपैकी कोण थोडे दिवस राधा वहिनींजवळ येतं की नाही पाहूया पुढल्या भागात)

क्रमशः


©️®️ सीमा गंगाधरे


🎭 Series Post

View all