परत फिरा रे.. भाग २

परदेशात गेलेली मुलं परत येतात तेव्हा

परत फिरा रे..
जुळले बंध पुन्हा - भाग २

राधा वहिनींचे निराशाजनक बोल ऐकून रेवा म्हणाली,
"मला आठवतंय रोहित आजारी असताना तुम्ही पूर्ण दिवस निर्जळी उपवास केला होता आणि देवासमोर बसून कोणीतरी तुम्हाला सांगितलेला जप करत होतात. दोघांनाही तुम्ही अगदी शिस्तीत वाढवलं तरी त्यांचे लाड सुद्धा तेवढेच केले."

"अग आपल्यासाठी मुलंच सर्वस्व असतात ना. आपण जीवाचं रान करून त्यांना मोठं करतो. त्यांचं भवितव्य उज्वल कसं होईल याकडेच आपण लक्ष देत असतो."

"एकदा का परदेशातल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मुलांना खुणावू लागल्या की ती कुणाचीच उरत नाहीत हेच खरं. पण सगळीच मुलं अशी असतात असेही नाही हं. काही मुलं परदेशात उच्च शिक्षण घेऊन सुद्धा पुन्हा आपल्या मायभूमीत परत येतात. काहींना तर कितीतरी नवीन क्षितिजं खुणावत असतात. तरीही ते आपल्या आई-वडिलांना सोडून कुठेही जात नाहीत. उतार वयात आई-बाबांजवळ राहून त्यांना आधार देणे हेच त्यांना त्यांचे परम कर्तव्य वाटत असते. अगदी आताच्या जमान्यातील श्रावण बाळच असतात ते."

"रेवा तुझं म्हणणं अगदीच खरं आहे. ‌एका पाठोपाठ एक दोघांची लग्न झाली दोघांनाही बायका अगदी उच्चशिक्षित मिळाल्या. अगदी भरून पावल्यासारखं झालं आम्हाला."

"हो राधा वहिनी तुम्हाला तसं वाटणं स्वाभाविकच आहे. तुमच्या आई अण्णांनी सुद्धा अगदी समाधानाने या जगाचा निरोप घेतला."

"रोहित आणि राकेश दोघेही जेव्हा परदेशात सेटल झाले तेव्हा आम्हाला पूर्ण युरोप फिरवून आणलं. अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं ग तेव्हा. नंतर रोहितला पहिलं बाळ होणार होतं तेव्हाही त्यांनी आम्हाला दोघांना बोलावून घेतलं. नातवंडाचा चेहरा बघितला तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला. राकेशच्या बाळाच्या वेळी पण आम्ही दोघेही गेलो होतो. ते दिवस खूपच सुंदर होते ग."

"राधा वहिनी तुम्हाला एक विचारू का? काकांच्या अचानक जाण्यानंतर तुम्ही इथे अगदीच एकट्या पडल्या ना. आता जर मुलं इथे येत नसतील तर तुम्हीच तिकडे जाऊन का नाही राहत. कसं असतं ना या वयात कोणाचा तरी आधार किंबहुना सोबत असणं खूप गरजेचं असतं."

"रेवा तुला खरं सांगू का. काही काळासाठी परदेशात जाणं, फिरणं हे सगळं खूप आनंद देतं परंतु कायम तिकडे राहणं माझ्या स्वभावातच नाही. किती झालं तरी 'गड्या अपुला गाव बरा.' ते दोघेही म्हणतात की आई तू इकडे येऊन रहा आम्हाला काय आता तिकडे कायमचे येणे शक्य नाहीये."

"शेवटी हा तिढा असाच राहणार तर. तुम्हाला एकाकी जीवनच जगावं लागेल. मी काय म्हणते आता तुम्ही बऱ्या झालात ना की ज्येष्ठ नागरिक संघ, योगा क्लास, मैत्रिणी अशा सगळ्यांमध्ये गुंतून राहा म्हणजे तुम्हाला एकटेपणा अजिबात जाणवणार नाही. कधीतरी नाटकाला, सिनेमाला जायचं. आहे ते आयुष्य मस्त एन्जॉय करायचं."

"हो ते तर आहेच. 'त्याच्या' मनात जे असेल तेच होणार." वर आभाळाकडे बोट दाखवत राधा वहिनी म्हणाल्या.

"चला मी निघते आता. पुन्हा आले की नक्की येईन भेटायला. अधूनमधून फोन सुद्धा करेन. तुम्ही सुद्धा मला फोन करा. माझा नंबर आहेच तुमच्याकडे."

"हो नक्की. तुझ्याशी बोलून खूप हलकं हलकं वाटलं. चल नीट जा."

(राधा वहिनींच्या एकाकी जीवनात पुढे काय घडेल पाहूया पुढच्या भागात)

क्रमशः


©️®️ सीमा गंगाधरे



🎭 Series Post

View all