परत फिरा रे.. भाग ३

परदेशात गेलेली मुलं परत येतात तेव्हा

परत फिरा रे..
जुळले बंध पुन्हा- भाग ३


राधा वहिनींची तब्येत सुधारली होती. त्या आता चालू फिरू शकत होत्या. रेवाने सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळे ग्रुप जॉईन केले होते आणि जीवनाचा
यथेच्छ आनंद घेत होत्या. दिवस त्यांचा मजेत पार होत होता पण रात्र झाली एक एकाकीपणा खायला उठायचा. इथे रोहित आणि राकेशला पण आईची काळजी वाटत होती तरीही दोघांपैकी कोणालाही भारतात परत यायची इच्छा नव्हती. दोघंही अधून मधून आईला व्हिडिओ कॉल करायचे तिच्याशी बोलायचे. तिला हवं नको बघायचे पैसे पाठवायचे. पण पैसा हेच काही सर्वस्व नसतं ना. त्यांना व्यवस्थित पेन्शन येत होतं. पैशाची तशी काही त्यांना गरज नव्हती.

एक दिवस रोहितने आई आणि मुलाच्या भावनिक नात्याची एक पोस्ट व्हाट्सअप वर वाचली. त्याला प्रकर्षाने जाणवलं की खरोखर आईला आता आपल्या सोबतीची गरज आहे. आई आणि बाबांनी आपल्यासाठी किती आणि काय काय केलं आहे. आई आता या वयात एकाकी जीवन जगत आहे. हे काही योग्य नाही. त्याच्या मनात उलट-सुलट विचारांचे काहूर माजले होते. त्याने आपली पत्नी रुहीजवळ ही व्यथा बोलून दाखवली. तिनेही त्याच्या विचारांना दुजोरा दिला. आता आईंना खरी आपल्या साथीची गरज आहे. आपण तिथे गेलो तर आपल्या मुलांना सुद्धा आजीची माया मिळेल आणि त्यांनाही नातवंडांबरोबर खेळायला मिळेल. रोहित तिला म्हणाला,

"ठरलं तर मग. मी आजच राकेशला इथे बोलावून घेतो आणि त्याचा काय विचार आहे ते बघूया. तो यायला तयार नसेल तरी आपण नक्कीच जाऊया."

"हो काहीच हरकत नाही. मलाही माझ्या आई-बाबांना अधून मधून भेटता येईल. त्यांचंही वय झालं आहे."

संध्याकाळी राकेश आणि कुटुंबिय रोहित कडे आल्यावर रोहित ने त्याला त्याचा विचार सांगितला. तो त्याला म्हणाला,

"आईला आपण पैसे पाठवतो. खरं तर पैशाची आता गरज नाही तिला. तिचं पेन्शन, बाबांचं अर्ध पेन्शन मिळतंय. तिला आता खरी भावनिक आधाराची गरज आहे. खरंतर इतके दिवस मी या दृष्टीकोनातून कधी विचारच केला नव्हता. आई आणि मुलाची व्हाट्सअप वरची पोस्ट वाचली आणि मला आपण चुकतोय याची प्रकर्षाने जाणीव झाली."

"अरे दादा मला सुद्धा भारतात यायला नक्कीच आवडेल. खरंतर तू बोलावून घेतलंस म्हणून मी इथे आलो. आता आपण दोघांनीही भरपूर कमावलं आहे. काय योगायोग पहा. चार दिवसांपूर्वी रिया मला म्हणाली की आपण किती दिवस परदेशात राहणार. आता आपण भारतात जायला हवं आणि आज तोच विषय तू काढलास म्हणजे आपल्या सर्वांचे विचार आता त्याच दिशेने धावत आहेत."

"राकेश आपण आपल्या कंपनीत उद्याच नोकरी सोडण्याची नोटीस देऊया आणि लवकरात लवकर भारतात जाऊ. ही आनंदाची बातमी आपण आत्ताच आईला व्हिडिओ कॉल करून सांगूया आणि तिच्या चेहऱ्यावरचा परमानंद पाहू या."

(मुलांच्या फोनमुळे राधा वहिनींच्या चेहऱ्यावर कसा आनंदाचा मळा फुलतो ते पाहूया पुढच्या भागात)

क्रमशः


©️®️ सीमा गंगाधरे

🎭 Series Post

View all