परत फिरा रे.. भाग ४(अंतिम)

परदेशात गेलेली मुलं परत येतात तेव्हा

परत फिरा रे..
जुळले बंध पुन्हा- भाग ४

मोबाईलची रिंग वाजली म्हणून राधा वहिनी स्वतःशी पुटपुटल्या आता कोणाचा फोन आला असेल. मुलांचे फोन तर काल येऊन गेले. पाहतात तर रोहितचाच व्हिडिओ कॉल दिसला. रोहितच्या शेजारी राकेश पण दिसला. त्यांना जरा आश्चर्यच वाटले.

"आई कशी आहेस?" राधा वहिनींना रोहितचा स्वर खूपच हळवा वाटला.

"मी बरी आहे पण आज लगेच कसा काय फोन केला."

"आई आज तुला एक आनंदाची बातमी सांगायला फोन केला आहे."

"पुन्हा बाबा होणार आहेस की काय!"

"नाही ग." पाणावलेल्या डोळ्यांनी रोहित पुढे म्हणाला,

"आम्ही सर्वांनी घरी परत येण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही तुझ्यापासून दूर नाही राहू शकणार. आम्ही लवकरच घरी येऊ. या वर्षाचा गुढीपाडवा आपण सगळे एकत्रित साजरा करू." राधा वहिनींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गदगदलेल्या स्वरात त्या म्हणाल्या,

"अरे मी कधीची तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. तुमची प्रगती होते आहे, तुमचं सर्व छान चाललं आहे म्हणून मी कधीच शब्दातून व्यक्त केले नाही. पण मला नेहमी वाटायचं की तुम्ही सर्व माझ्या जवळ असायला हवं. कधीकधी मला वाटायचं की तुम्हाला बोलावून घ्यावं अर्थात हा माझा खूप स्वार्थी विचार आहे पण मनाला कोण आवरणार?" आईचा आवाज ऐकून व्याकुळ स्वरात राकेश म्हणाला,

"आई आम्हाला पण तुझी खुप आठवण येते. बऱ्याच वेळा जेवताना तुझ्या हातचं कधी खायला मिळेल असं वाटायचं."

राधा वहिनींची दोन्ही नातवंडं स्वरा आणि साहिल दोघेही आनंदाने उड्या मारत म्हणाले,

"आजी आता मी तुझ्याजवळ येणार. तुझ्याकडून खूप लाड करून घेणार."

सर्व घरी परतणार म्हणून राधा वहिनींची लगबग सुरू होती. त्यांनी सर्वप्रथम ही खुशखबर रेवाला दिली. तिला पण खूप आनंद झाला. राधा वहिनींनी त्यांच्याकडे असलेल्या ताईंना मदतीला घेऊन खूप सारे पदार्थ बनवले होते. घर सजवलं होतं. आता मुलं कधी एकदा येतात असं त्यांना झालं होतं. ठरल्याप्रमाणे दीड महिन्यांनी दोन्ही मुलं सहकुटुंब घरी परतली. राधा वहिनींनी त्यांना ओवाळून घरात घेतलं. सगळ्यांचे डोळे आनंदाने लकाकत होते. सगळ्यांनी राधा वहिनींना मिठी मारली. स्वरा आणि साहिलच्या आनंदाला पारावर उरला नाही. आजीच्या सहवासासाठी दोघही आसुसले होते. रोहित म्हणाला,

"हा गुढीपाडवा आपण या घरात सगळ्यांनी एकत्र मिळून साजरा करायचा. आपल्या घराचं पुन्हा पूर्वीसारखं गोकुळ करायचं. लवकरच आपण याच्यापेक्षा प्रशस्त घर घेऊया आणि सगळे आनंदाने राहू या."

"तुम्ही सर्व आलात यातच मला खूप आनंद‌ आहे. मला आता दुसरी कसलीच अपेक्षा आहे. तुम्ही लांब होतात तरी पण माझं मन आतून मला ग्वाही देत होतं की एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच परत याल. आपल्या नात्यांची वीण इतकी मजबूत नक्कीच आहे." रोहित म्हणाला,

"आम्हाला माफ कर आई. तुला जेव्हा आमची खरी गरज होती त्यावेळी आम्ही कोणीच तुझ्याजवळ नव्हतो. यापुढे असं कधीच होणार नाही. असहाय अवस्थेत तू कसे दिवस काढले असतील या विचाराने मला खूपच अपराधी वाटतं. तुझ्या मायेचे पाश तोडून मी खूपच स्वार्थीपणे वागलो."

त्याची री ओढत राकेश म्हणाला,

"आजी-आजोबांनी, तू आणि बाबांनी आमच्यावर इतके चांगले संस्कार करून पण आम्ही ते विसरलो."

"अरे तुम्ही दोघं इतकं वाईट वाटून घेऊ नका. आता आलात ना परत. रुही आणि रिया या माझ्या दोन सुनासुद्धा खूपच चांगल्या आहेत. स्वरा आणि साहिल दुधावरची साय आहेत." राधा वहिनी त्यांच्याही नकळत गुणगुणू लागल्या,

'घरात हसरे तारे असता
पाहू कशाला नभाकडे
छकुल्यांची गं प्रशांत वदने
गोड गुलाबी गाली हसणे'

समाप्त


©️®️ सीमा गंगाधरे


🎭 Series Post

View all