परतफेड भाग- १

Story of a strong woman who is proud and has high self esteem
"मुलगा चांगला आहे त्याला आपली सीमा पसंत आहे."
विकास त्याची बहिण शारदा बरोबर बोलत होता. पाहुणे पुढची बोलणी करुया म्हणत होते. शारदा विकासला बोलली, "
"पण लग्नातील खर्चाचे काय?...तू बोललास का त्यांना."
"हो आक्का त्यांना काही नको आहे फक्त मुलगी आणि नारळ घेऊन या म्हणत आहेत आणि बाकी मी आहेच की तू काही काळजी करू नकोस." विकास बोलला.

त्याच दिवशी लग्नाची बोलणी पक्की झाली. लग्न ठरलेआणि पाहुणे पुरणपोळीचे जेवण जेवून गेले.
साखरपुडा पण साध्या पद्धतीने घ्यायचा ठरले होते, त्याप्रमाणे ओटीत नारळ घालून साखरपुडा संपन्न झाला. सीमाचा मामा विकास, दोन मावश्या, थोडी जवळची पाहुणे मंडळी आणि भावकी एवढेच लोक आमंत्रित होते. कार्यक्रम आटोपल्यावर पाहुणे गेले.

शारदाच्या घरी फक्त घरचे लोक भाऊ विकास भावजय विद्या आणि दोन बहिणी राहिल्या.लग्नात पुढे काय काय करायचे, खर्चाचे बजेट ठरवायचे होते. शारदाची परिस्थिती जेमतेम होती, नवरा शेतकरी होता, तस खाऊन पिऊन सुखी कुटुंब होत, पण लहरी हवामानामुळे कधी पीक चांगल मिळायच तर कधी नापिकीचा सामना करावा लागत होता. त्यांना अजून दोन मुले होती मधली राधा आणि धाकटा मुलगा सुजय दोघे शिकत होते.

'घर पहावं बांधून आणि लग्न पहावे करून' अशी म्हण आहे. लग्नात होणाऱ्या खर्चाची चिंता दोघांना लागली होती. म्हणूनच सगळे पाहुणे गेल्यावर लग्नाचे नियोजन करण्यासाठी भाऊ बहिणी बसले होते.

"आक्का तू काळजी करू नकोस, विकास बोलत होता. मी आणि सुनिता( बहिण) संसार उपयोगी वस्तू घ्यायला मदत करू."

बहिण सुनिता पण हो म्हणाली. दुसरी बहिण अनिता ही म्हणाली मी काही हातभार लावेन. स्वाभिमानी सुनिताने कितीही खडतर परिस्थिती आली तरी आतापर्यंत कोणाकडेही मदतीसाठी हात पसरला नव्हता आता ही तिला मुलीच्या लग्नासाठी कुणाकडे मदत मागायची नव्हती, पण आताची परिस्थिती वेगळी होती.

एक दिवस भाऊ, भावजय, बहिणी सगळे भांडी खरेदीसाठी गेले. देव पुजेची भांडी,पळी, पंचपात्र, आणि ठराविक उपयोगी भांडी खरेदी करुया शारदा बोलली पण संसारोपयोगी भांडी तर मुलीला द्यायलाच हवीत असे म्हणत पंचवीस हजाराची भांडी खरेदी केली.विकास आणि सुनिता दोघांनी मिळून भांड्याचे पैसे दिले. विकास ची पत्नी विद्या सगळ्या गोष्टी वर बारीक लक्ष ठेऊन होती.
क्रमशः
©®सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव