परतफेड भाग- २

Story of a strong woman who is proud and has high self esteem
"आक्का आता तुमच्या पोषाखाची कपडे पण घेऊया" म्हणत विकास त्यांना कापड दुकानात घेऊन गेला.

"आक्का आधी तुझी साडी पसंत कर",

विकास बोलला. दुकानदार भारीतल्या साड्या पुढ्यात टाकत होता. विद्या त्यावरील किंमतीचे लेबल बघत होती,विद्या हळूच विकासच्या कानात कुजबुजली खर्चावर नियंत्रण ठेवा जरा, तिचा चेहरा पडला होता.

शारदाचे चांगले लक्ष होते ती पाहत होती, खर्च बघून विद्या अस्वस्थ होत आहे आणि तिचे कुजबुजणे ही तिने ऐकले होते म्हणून स्वाभिमानी शारदा बोलली,

"फार महागड्या साड्या दाखवू नका."

"अगं आक्का तू घे गं तुझ्या आवडीची चांगली साडी, पैशाचा विचार करू नको." विकास बोलला.

खरे तर विकासची शेतीवाडी भरपूर होती, त्याला चांगली नोकरी होती.बहिणी प्रती असलेलं कर्तव्य तो निभावत होता पण विद्या ची धुसफूस बघून शारदाने एक हलकीफुलकी काठपदर साडी निवडली. भाऊ आणि भावजयीसाठी तिने मात्र चांगली कपडे घेतली, विद्यासाठी साडी घेताना तिच्या पसंतीची साडी घेतली. काही खरेदीत छोटी बहीण शलाकाने हातभार लावला. आणि त्या दिवशीची खरेदी उरकली.


लग्न जवळ आले होते. शारदा विचारात गढून गेली होती, भावजय विद्याचे वागणे राहून राहून तिला आठवत होते. भाऊ चांगला होता.हक्क सोडपत्रावर सही करताना भाऊ बोलला होता , "तुम्हाला काय हवं ते सांगा तेव्हा तिघिंनीही सांगितले होते, आम्हाला काही नको तुझा आधार फक्त हवा.

"कसल्या विचारात गढून गेलीस?
शारदाचा पती संपत बोलला,

"अजून कसला करणार,?..लग्नाच्या खर्चाबद्दलच विचार करतेय. उगाच कुणाकडे हात पसरायला लागू नये. "

"अगं उसाचे पैसे आहेत खात्यावर, पन्नास हजार सोसायटी काढतो. सोयाबीन आहे ते काय येईल त्या दराने विकू, यात लग्नाचा खर्च निघून जातोय तू काळजी करू नकोस संपत बोलला.

ठरल्याप्रमाणे लग्न छान पार पडले. सगळ्यांचे मानपान यथाशक्ती केले, लग्नात बहिणी आणि भावाने मदत केली होती.

आजेचिराचा मान पण विद्याला दिला होता. एकंदरीत विद्या कशी खूश राहिल याचा प्रयत्न शारदाने केला होता.

"मला नको आजेचिर दुसऱ्या कोणाला तरी द्या "
अशी विद्या बोलली होती. तेव्हा,

"माझी सासू आणि आई हयात नाहीत म्हणून त्यांच्या मागे तुझाच मान", असे म्हणत येनकेन प्रकारे विद्याला ती खूश करत होती.

क्रमशः
©®सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव