परतफेड भाग-३ अंतिम

Story of a strong woman who is proud and has high self esteem
लग्न पार पडले, डोक्यावरचा लग्नाचा ताण उतरला होता. शारदा आणि संपत आनंदी होते कसलेही कर्ज न घेता एक मुलगी उजवली होती. आता दोन मुले आहेत त्यांचे पण हळूहळू चांगलेच होईल. चार पाच वर्षात मुलगा कमावता होईल मग हे दिवस जाऊन चांगले दिवस बघायला मिळतील. भाऊ बहिणींनी केलेल्या मदतीची परतफेड त्यांच्या मुलांच्या लग्नात करू असे त्यांचे संभाषण सुरू होते.

संपत आणि शारदा आपल्या शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करत होते, मुलाला मुलीला शिकवत होते. दोन नंबरची मुलगी राधा शिक्षण पूर्ण करून नोकरी करु लागली. घराला हातभार लावू लागली. पाच सहा वर्षे उलटली. दरम्यान शारदाच्या दोन नंबरच्या मुलीचे ही लग्न झाले, तिच्या मुलाला सुजयला चांगली नोकरी मिळाली आणि तिच्या आयुष्यत टर्निंग प्वाईंट आला,हळूहळू शारदाला चांगले दिवस आले. घरची परिस्थिती सुधारली, संसार सुखासमाधानात सुरू होता. सगळी सुखं तिच्या पायाशी लोळण घेत होती, पण ती पहिले दिवस विसरली नाही.

जुन्या घराच्या जागी नवीन घर बांधले, गाई गुरांनी गोठा भरला होता, दुधदुभत्याची रेलचेल होती, बागायती शेती बहरली होती. घरात संपन्नता आली .

दरम्यान बहिण सुनिताच्या मुलीचे लग्न ठरले होते त्या लग्नात तोडीसतोड खर्च केला, त्यांचे केळवण मानपान केला. शलाकाचा मुलगा आणि मुलगीच्या लग्नातही तिने रितसर मानपान केले. एक बहिण म्हणून तिने आपले कर्तव्य तर केलेच पण बहिणींनी केलेल्या मदतीचीही जाणीव ठेवली.

एक वर्षाच्या अंतराने तिच्या भाचीचे,भावाच्या मुलीचे लग्न ठरले होते. भाऊ भावजय भाची सगळ्यांना केळवणाला बोलवून यथोचित मानपान केला. भाचीला साखरपुड्यात सोन्याची नथ, तिच्या पसंतीने साडी घेतली. आणि भांडी घेताना त्यात निम्मा खर्च उचलला.

भाऊ बोलत होता,

"अगं आक्का तू ऐवढ करण्याची गरज नाही."
तेव्हा शारदा बोलली, "

"आता मला चांगले दिवस आले आहेत, माझ्या भाचीसाठी मला थोडे हौसेने करु दे काहीतरी."

भावजय विद्या पण खूश होती, तिला शारदा कडून पोषाखासाठी पैठणी मिळाली होती. शारदा सगळे मनापासून करत होती, पण त्यात परतफेडीची भावना मात्र तिव्र होती. एकप्रकारे ती परतफेड करत होती. आता तिचे चांगले दिवस आले होते,ती एका हाताने घेतलेले दुसऱ्या हाताने देत होती, कर्तव्य भावनेबरोबर परतफेड करत होती.
समाप्त
©®सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव
२९/५/२०२४