Login

परतफेड

सासु सुन नाते विळ्या भोपळ्याचे
इरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

लघुकथा लेखन

परतफेड

मधुराताईंच्या 'मधुर मैफिल' या कादंबरीचा प्रकाशन सोहळा सुरू होता.
तिला चरित्रात्मक कादंबरी म्हटले तर वावगे ठरू नये कारण ती कादंबरी म्हणजे जणू मधुराताईंच्या जीवनाचा आरसाच होता.

मधुराताई आणि मधुकरराव हे जोडपे म्हणजे एक समाधानी सहजीवनाचे आदर्श उदाहरण.
शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे काय असते हे त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने लागू पडत होते.

मधुकरराव एका अति सामान्य घरातून आलेले तर मधुराताई, ज्याला आपण सुखवस्तु म्हणू अशा घरातून आलेल्या. एम ए, एम कॉम झालेल्या.

पण अतिशय साधी राहणी आणि उच्च विचार . तेव्हाच तर एवढ्या सुखवस्तू घरातून येऊन एक फाटका संसार नेटका करू शकल्या.
सासरी घरात सगळ्यात लहान. सगळ्या नंदाजावा मोठ्या. सासू-सासरे सगळ्यांशी जुळवून घेत घरात स्वतःचं एक स्थान निर्माण केलं.

कमालीची सहनशिलता, शांत समजूतदार वृत्ती.
घरात आवडत नाही म्हणून त्यांनी प्राध्यापिकेच्या नोकरीवर पाणी सोडले.
त्यांनी जे त्यांच्या वाट्याला आलं ते अगदी मनापासून स्वीकारलं स्वतःत तसे बदल घडवून आणले.

भविष्याचं मात्र आपण ठरवू शकत नाही.
आणि त्यातून त्यांचा स्वभाव म्हणजे बदल स्वतःत घडवून आणायचे. दुसऱ्याला बदलण्याच्या वल्गनाच ठरतात.
त्यांना दोन मुलं, एक मुलगी सगळ्यांना उच्चशिक्षित केलं .सगळे आपापल्या ठिकाणी योग्य होते.

खूप संघर्ष केला जगताना. सोपं नव्हतं जवळ काही नसताना मुलांना घडवणं.
आज पुस्तक प्रकाशन समारंभात त्यांचा मुलगा, सून मुलगी, जावई सगळे मिळून संचलन करत होते.
प्रत्येक जण आपला अनुभव सांगत होते.
नंदा ,जावा त्यांची मुलं-मुली प्रत्येक जण आपला अनुभव व्यक्त करत होते.
त्यांनी केलेली मदत ,त्यांचे सहकार्य, त्यांनी जीवा पलीकडे जपलेली नाती, हे सगळं कथन करताना प्रत्येकाचा उर भरून येत होता.
तिथे ,'मी पणा' ला कधी थाराच नव्हता.
मुलांची लग्न झाली त्यांनी सुनांना जावयाला आपलेसे करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला.पण त्यांची लहान सून हट्टी, जिद्दी, एकलकोंडी, स्वतःला फार हुशार समजणारी आणि समोरच्याला तुच्छ समजणारी.

वास्तविक ती लग्न होऊन घरात आली तेव्हा तिला काहीच येत नव्हते.
दहावी होत नाही तर शिक्षणासाठी घरा बाहेर पडलेली उच्च शिक्षण घेता घेता घरकाम विसरलेली.
आणि आता आपल्या करिअरला महत्त्व देणारी ‌.
तिच्या माहेरी मात्र फार कमी लोकं .आई वडील आणि ती एकटीच .बाकी चुलत उलत लोकांशी फारसे संबंध तिच्या आई-वडिलांनीच जपले नाहीत.
त्यामुळे फार कुणाशी जुळवून घ्यावे लागले नाही. तोच स्वभाव बनला.

आता इथे खटल्याच्या घरात जुळवून घेणे कठीण जायचे म्हणून माधुरी ताईंनी नाईलाजास्तव वेगळी चूल मांडली.
पण चार लोकांशी जुळवून घेणे तिला जमले नाही.
त्यात पूर्वग्रह दुषितता.लग्नाआधी कुणीतरी सांगितलेले सांभाळून राहा सासू अशी असते सासू तशी असते.
त्यामुळे माधुरीताई तिच्याशी कितीही चांगल्या वागल्या तरी ती अर्थाचे बेअर्थ करायची आणि नासुकल्या गोष्टीसाठी भांडण उकरून काढायची.
माधुरीताईंनाही कळेना कसे वागावे? पण खरेच ती शांत सोज्वळ मूर्ती सगळं सहन करून पोटात घालत होती आपल्या मुलाकडे बघून.

तिच्या बाळंतपणात माधुरीताईंनी तिची लेकीइतकीच काळजी घेतली. तिची वेणी घालून देण्यापासून तर कपडे बदलून देण्यापर्यंत सगळं त्यांनी मायेने केलं.
कुत्र्याचे शेपूट नळकांड्यात घातलं तरी वाकडच असं म्हणतात.
तिच्या स्वभावात काही बदल घडून आला नाही.

त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं म्हणून तिने माधुरीताईंची संभावना केली.
पण जीवनात एक कलाटणी देणारा प्रसंग आला.
ती सतत आजारी आजारी राहू लागली.
डॉक्टरांनी निदान केले किडनी फेल. तिला किडनीची आवश्यकता होती.
तिला मॅच होणाऱ्या किडनीसाठी दाता शोधणे सुरू होते.

अशात माधुरीताईच पुढे आल्या. आणि विशेष म्हणजे कदाचित त्यांच्या हृदयातील माधुर्य असेल त्यांची किडनी तिला मॅच झाली.

जिथे तिची स्वतःची जन्मदात्री टेस्ट करायलाच घाबरत होती की, न जाणो माझीच मॅच झाली तर?

पण ते धाडस माधुरीताईंनी करून दाखवले कुठलाही मागचा पुढचा विचार न करता. सुने विषयी कुठलंही किल्मिष मनात न येऊ देता.

आज पुस्तक प्रकाशनाचा समारंभ सुरू होता. प्रत्येक जण आपापले विचार मांडत होते त्यांची लहान सूनही उभी राहिली.
सगळे विचार करत होते आता ही काय बोलणार?
पण तिला रडू आवरत नव्हते. महत्प्रयासाने ती बोलत होती. तिने एवढ्या पाचशे सातशे लोकांसमोर आपल्या चुकीची कबुली देऊन टाकली," की अगदी कळत्यावयापासून मनावर बिंबवले गेले होते सासू अशी असते सासू तशी असते आणि तोच विचार घेऊन मी लग्नानंतर सासरगृही प्रवेशले आणि त्यांच्याशी उद्धटासारखे वर्तन करत राहिले.
खूप दुखवले मी त्यांना सोबतच नवऱ्याला. मी त्यांना फक्त दुखावलेच नाही तर पदोपदी अपमान केला त्यांचा,नवर्याचा आणि घरातील अन्यही नातेवाईकांचा.

अहंकाराचा बुरखा पांघरला होता मी. त्यांनी मला किडनी देऊन जीवनदान देत त्या अहंकाराच्या चिंधड्या चिंधड्या केल्या.

मी त्यांची क्षमाप्रार्थी आहे असे म्हणत तिने सासू-सासरे नवरा आणि सगळ्यांच्याच चरणावर नतमस्तक होत आपल्या चुकीची क्षमा याचना केली.
त्यांच्या उदारतेची परतफेड माझ्याकडून या जन्मात तरी शक्य नाही पण तरी एक पाऊल म्हणून मी आज त्यांना सांगू इच्छिते की यानंतर आम्ही त्यांच्याजवळ राहू. कारण घर त्यांचं आहे.
माधुरी ताईंच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होतं.
©®शरयू महाजन
0