परतुनी येईल मी... भाग ३

"काय वाटतं? आपला अंदाज खरा बरोबर असेल?" शेखर इनामदार त्या व्यक्तीस बोलले."बघुया अजून काय घडतं ते. त्यावर अवलंबून आहे सगळं." ती व्यक्ती.
मागील भागात आपण बघितले….


"मिहिर. आपल्या आजच्या आणि उद्याच्या मीटिंग बद्दल कोणाला काही सांगू नकोस. जो पर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. तुझ्या मित्राला देखील नाही." मिस्टर इनामदार बोलले.


"ठीक आहे सर." मिहिर बोलून निघून गेला.

जाताना परत त्या फाऊंटन जवळ जाण्यावचून तो स्वतः ला रोखू शकला नाही. मिस्टर इनामदार आणि त्यांच्या सोबत अजून एक व्यक्ती वरून हे सगळं बघत होते.


आता पुढे …


"काय वाटतं? आपला अंदाज खरा बरोबर असेल?" शेखर इनामदार त्या व्यक्तीस बोलले.


"बघुया अजून काय घडतं ते. त्यावर अवलंबून आहे सगळं." ती व्यक्ती.


दोघे मिहीरचे अगदी बारीक निरीक्षण करत होते. मिहिर त्या फाऊंटन जवळ मूर्ती सारखा उभा होता. त्याला असे वाटतं होते की, खूप पूर्वी पासून तो असाच त्या फाऊंटनला बघतो आहे. एक वेगळी शांती मिळत होती त्याच्या मनाला, जसे खूप यातानांतून काही क्षण विसाव्याचे मिळावे. त्याची नजर फाऊंटन मधून पडणाऱ्या पाण्यावर स्थिर झाली होती. तिथून पडणारे पाणी त्याच्या नायनांतून देखील दोन थेंब बनून पाझरले आणि त्या फाऊंटनच्या काठावर पडून त्यात विरले.


मिहिर काही वेळ थांबून आल्या पावली निघाला. मनात मात्र विचारांचे वादळ उठत होते. जे तो अनुभवत होता ते शब्दात सांगणे त्याच्या साठी कठीण होते आणि त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे होते. मीटिंग पेक्षा जास्त त्याला तो फाऊंटन आठवत होता.


मीटिंग संपवून परत निघायला त्याला संध्याकाळचे चार वाजले होते. त्यामुळे ऑफिसमध्ये परत न जाता तो सरळ घरी गेला.


घरी जाताना वाटेत त्याला विशालचा कॉल आला. पण त्याने तो उचलला नाही. असे ह्या आधी कधीच झाले नव्हते..त्यामुळे विशाल विचारात पडला की,

"नक्की काय झाले आहे? मिहिर फोन उचलत का नाही? मीटिंग संपली नसेल का अजून? काही प्रोब्लेम तर नाही ना झाला?" असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात येत होते.


मिहिर विचारांच्या गर्दीत हरवलेला होता. त्याच गर्दीत तो केव्हा घरी पोहोचला त्याला देखील कळले नाही. त्याने चवी ने दार उघडले आणि आत गेला. पण त्याचं डोकं दुखायला लागलं होतं. शरीर एकदम थकल्या सारखं झालं होतं.


मिहिर घरी आला आणि थंड पाण्याच्या शॉवर खाली उभा राहिला.


शॉवरचे थंड पाणी त्याच्या अंगावर पडत होते. पण मन मात्र अस्वस्थ होते. अंग मात्र गरम होत होते. अशी बेचैनी त्यानी आधी कधीच अनुभवली नव्हती. काहीही कारण नसताना डोळ्यातील पाणी झरत होते. काळजात वेदना उठत होत्या. पण का? कोणासाठी? म्हणायला ह्या जगात त्याचं आपलं कोणीच नव्हतं. आई वडील भाऊ बहिण आहेत की नाही हे देखील माहीत नव्हते त्यामुळे त्यांच्या विचारात तो अडकला नव्हताच. विशालच्या येण्याने एका मित्राची जागा भरून निघाली होती इतकंच. पण तोही त्याच्या सोबत होता. मग का इतकी वेदना उमाळुन येत होती? मनात खोलवर काहीतरी खूप तीव्र टोचत होते. पण काय? ओघळणारे अश्रू कोणासाठी आणि का ओघळत होते?


थंड पाण्याने शरीर तर थंड झाले पण मन काही शांत होत नव्हते. काही वेळाने तो बाहेर आला. टॉवेलला डोकं पुसले आणि सोफ्यात आडवा झाला. खिन्न मनाने. वास्तविक मीटिंग छान झाली होती. पण तरी त्याचा आनंद त्याला होत नव्हता.

डोक्यावर फिरणाऱ्या पंख्याकडे बघत त्याचे डोळे कधी लागले त्याला कळलेच नाही.


छुम…छुम…


कोणीतरी एक एक पावलं टाकत चालत होते. कानात घुंगरांचा आवाज घुमू लागला. दूरवर वाजणारे घुंगरू हळू हळू जवळ येत होते. पुसटसा आवाज आता तीव्र होत होता. वातावरण प्रसन्न झाले होते. संध्याकाळ खुलली होती.


तो त्या आवाजाच्या दिशेने बघत होता. समोरच्या वळणावर ती त्याला दिसली त्याच्याच दिशेने येत होती. तो पटकन पडद्यांच्या आड लपाला.


तिच्या सुंदरतेचे बद्दल त्याने फक्त ऐकले होते. आज तिला बघण्याचा योग येणार होता म्हणून तो लपला. ती हळू हळू जवळ येत होती. त्याच्या हृदयाचे ठोके वाढत होते. तिला बघण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ती अगदी त्याच्या समोरून जाणार होती. त्याने हळूच किंचितसा पडदा बाजूला केला आणि त्यातून बघण्याचा प्रयत्न करत होता. पण ती काही दिसली नाही. कारण ती आणि तिच्या निवडक मैत्रिणी चारही बाजूनी वेढलेल्या पडद्याच्या कमानीतून चालत होत्या. त्याचा हिरमोड झालं. तरी तो तिच्या त्या कमानीला बघत होता. त्याचे लक्ष तिच्या पायांकडे गेले. कमानीतून त्याला फक्त तिचे ते नाजूक पाय दिसले ज्यात घातलेल्या पैंजनाच्या घुंगारांचा आवाज येत होता आणि सोबतीला तिच्या निखळ हास्याचा आवाज होता. त्यातच तो सुखावला.


"जिचे पाय इतके नाजूक, कोमल सुंदर आहेत ती किती सुंदर असेल." तो मनातच विचार करत होता.


"एकदा दिसली असती तर."


तितक्यात त्याच्या मागे काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि तो दचकला.


"आ…" मिहिर


"अरे, झोप झोप मी आहे. दार बंद करताना हातातील पाण्याची बाटली पडली." विशाल खाली पडलेली पाण्याची बाटली उचलत बोलला.


"तू केव्हा आलास?" मिहिर ने विशाल ला विचारात स्वतः ला चाचपडून बघितले.


"हा काय आत्ताच." पायातील शूज काढत विशाल बोलला.


"अच्छा."


"म्हणजे मी स्वप्न बघत होतो तर." मिहिर मनातच बोलला.


"काय रे काय झालं?" विशाल ने विचारले.


"काही नाही रे जरा लेटलो तर झोप कधी लागली कळलेच नाही." मिहिरच्या डोक्यावर घामाचे थेंब अजूनही होते.


"चल मी फ्रेश होऊन येतो." विशाल आत जात बोलला.


मिहिर सोफ्यातच पडून होता.

"सकाळी पडलेले स्वप्न, दुपारी घडलेली घटना आणि आत्ताचे स्वप्न सगळं एकच दिवशी कसं घडतं आहे? हा निव्वळ योगायोग आहे का?
योगायोगच असेल. नाहीतर काय संबंध माझा त्या फाऊंटन शी? मी उगाच विचार करतो आहे. आणि स्वप्नं म्हणायचं तर विशाल म्हणतो तेच खरं आहे, मी एतिहासिक पुस्तकं वाचतो म्हणून अशी स्वप्न पडत असतील.

पण पुस्तकं काही आज नाही वाचत मी गेल्या कित्येक वर्षांपासून वाचायला आवडतं मला. इतक्या वर्षात कधी अशी स्वप्न पडली नाही. खरं तर स्वप्नच पडत नाहीत मला.


मग काय होत असेल हे? जाऊदे विचार करून डोकं परत दुखायला लागेल. आत्ता कुठे जरा कमी झालं आहे दुखायचं. स्वप्नच ती त्यांचा काय विचार करायचा?" मिहिर मनातच विचार करत होता.


"काय रे कसल्या विचारात मग्न आहे?" विशाल हॉल मधे येत बोलला.


"काही नाही रे. असच."


"बरं. चहा घेणार की कॉफी?" विशाल बोलला


"कॉफी." मिहिर बोलला.


"अच्छा म्हणजे आज डोकं दुखतंय वाटतं तुझं?" विशाल ने विचारले. मिहिरचे डोके दुखत असेल तेव्हा मिहिर आवर्जून कॉफीच घेतो हे विशालला चांगलेच ठाऊक होते.


"हो रे. मीटिंग वरून निघालो तेव्हा पासून दुखतंय. म्हणून जरा लेटलो तर डोळा लागला." मिहिर डोके चोळत बोलला.


"चल तुझ्या साठी मस्त स्ट्राँग कॉफी करतो. तुला आवडते तशी." विशाल किचनकडे जात बोलला.


"मी येतो तुझ्या मदतीला." मिहिर सोफ्यातून उठत बोलला.


"अरे नको तू कर आराम. मी करतो कॉफी." विशाल बोलला.
तसा मिहिर परत सॉफ्यात आडवा झाला


"थँक्यू." मिहिर


"हो थँक्यू नंतर म्हण. पण आधी सांग मीटिंग कशी झाली?" विशाल किचन मधून जरा जोरात बोलत होता.


"काय सांगू ह्याला? शेखर इनामदारांनी आजच्या आणि उद्याच्या मीटिंग बद्दल कोणाला सांगू नको असे सांगितले आहे. त्यांनी असं का सांगितलं तेच कळत नाहीये.
पण विशाल माझा बेस्ट फ्रेंड आहे. त्याच्या पासून कसं लपऊ? त्याला सांगितलं तर त्यानं काय कळणार आहे? विशाल ला त्या फाऊंटन बद्दल देखील सांगायचे आहे. पण त्या बद्दल सांगायचे तर मीटिंग बद्दल देखील सांगावे लागेल." मिहिर विचार करत मनातच बोलत होता.


"हॅलो, अरे तुला काही विचारलं मी." विशाल परत बोलला.


काय होईल? सांगेल का मिहिर मीटिंग बद्दल? फाऊंटन बद्दल? त्याचे परिणाम काय होतील? मिस्टर इनामदारांनी का असे सांगितले असेल मिहिर ला? काय करेल मिहिर?
जाणून घेण्यासाठी वाचत राहा परतुनी येईल मी…


क्रमशः


© वर्षाराज


🎭 Series Post

View all