परतुनी येईल मी... भाग ४

"हो रे बरी झाली." मिहिर भानावर येत बोलला."म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फायनल होईल तर." "अजून काही त्यांनी तसं सांगितलं नाही. बघू काय होईल ते." मिहिर बोलला
मागील भागात आपण बघितले…


"हो थँक्यू नंतर म्हण. पण आधी सांग मीटिंग कशी झाली?" विशाल किचन मधून जरा जोरात बोलत होता.


"काय सांगू ह्याला? शेखर इनामदारांनी आजच्या आणि उद्याच्या मीटिंग बद्दल कोणाला सांगू नको असे सांगितले आहे. त्यांनी असं का सांगितलं तेच कळत नाहीये.
पण विशाल माझा बेस्ट फ्रेंड आहे. त्याच्या पासून कसं लपऊ? त्याला सांगितलं तर त्यानं काय कळणार आहे? विशाल ला त्या फाऊंटन बद्दल देखील सांगायचे आहे. पण त्या बद्दल सांगायचे तर मीटिंग बद्दल देखील सांगावे लागेल." मिहिर विचार करत मनातच बोलत होता.


आता पुढे..


"हो रे बरी झाली." मिहिर भानावर येत बोलला.


"म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फायनल होईल तर."


"अजून काही त्यांनी तसं सांगितलं नाही. बघू काय होईल ते." मिहिर बोलला


"होईल रे. नको टेन्शन घेऊ. बरं मी तुला किती कॉल केले तू उचलत नव्हता तर मला टेन्शन येत होतं." विशाल बोलला.


"हो का? अरे फोन सायलेंट वर होता तर कळलंच नाही. पण तू का कॉल करत होतास?"


"अरे म्हटलं मीटिंग झाली असेल तर सोबत घरी जाऊ म्हणून विचारात होतो. तर तू फोन उचलला नाही." विशाल, कॉफीचा एक मग मिहिरच्या हातात देत बोलला.


"ओके. अरे मीटिंग संपली आणि थेट घरी आलो. तेव्हापासून डोकं चढलं आहे बघ. काही सुचत नाहीये."


"हो रे ते तुला झोपलेलं बघून आलं लक्षात. नाहीतर तू असा ह्या वेळी कधी झोपत नाहीस. सॉरी माझ्यामुळे तुझी झोप मोड झाली. पण आता कॉफी घे मस्त मग बरं वाटेल तुला." विशाल बोलला.


"थँक्यू मस्त झाली आहे कॉफि. मला आवडते तशी एकदम कडक." मिहिर, गरम गरम वाफळेल्या कॉफीचा एक घोट घेत बोलला.


"बरं डिनर ला खणार?" विशाल बोलला.


"मला भूक नाहीये रे. मी काही जेवणार नाही. तुझ्यासाठी बनवू आपण काही." मिहिर


"असं कसं जेवणार नाही? थोडं तरी खावच लागेल तुला नाहीतर अजून डोकं दुखेल.


"खरंच नको रे."


"ते काही नाही. आज आपण बाहेरून ऑर्डर करू. मी सूप ऑर्डर करतो तुझ्यासाठी ते घे. सूप आणि चिकन बिर्याणी. चालेल?" विशाल बोलला.


"ठीक आहे. पण बिर्याणी मध्ये माझा हिशोब नको धरूस. चार पाच घास खाल्ली तर खाईल मी नाहीतर ते पण नाही. पण मंचाव सूप मात्र सांग." मिहिर बोलला.


"येस बॉस. जसं तू म्हणशील. पण खा म्हणजे झालं." विशाल बोलला.


"हो रे खाईल तुझ्यासाठी." मिहिर कॉफीचा मग खाली ठेवत बोलला.


थोड्यावेळाने विशालने बाजूच्या हॉटेलला फोन करून बिर्याणी आणि सूपची ऑर्डर दिली.


"काय बघायचं? मूव्ही की वेब सीरिज?" विशालने टीव्ही लावत विचारले.


"डोक्याला तान न देता बघता येईल असं काहीही लाव." बोलता बोलता मिहिर सोफ्यात परत लेटला.


"म्हणजे कॉमेडी बघायची आहे. चल तर तुझा आवडता सिनेमा हलचल बघू." विशाल टीव्ही मध्ये सिनेमा शोधत बोलला.


"बेस्ट. तोच लाव." मिहिर


आता साधारण संध्याकाळ चे आठ वाजत आले होते. कॉफीने बरेच बरे वाटत होते त्याला. पण तरी मन मात्र अजूनही अस्वस्थ होते. टीव्ही बघून मनावरील ताण कमी करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. विशाल त्याच्यामानातील जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण मिहिर काही बोलत नव्हता. काहीवेळात बिर्याणी आणि सूप आले. ते घेऊन विशाल किचनमध्ये गेला आणि थोड्यावेळात येताना दोन ग्लास, एका प्लेट मध्ये चिवडा, सोबत थंडगार बिअर च्या दोन बाटल्या घेऊन आला.


"अरे हे काय? मला वाटलं बिर्याणी आणि सूप घेऊन येतो आहेस तू." मिहिर ने त्याच्या हातातील ग्लास आणि बिअरच्या बॉटल बघत बोलला.


"घेऊ रे सूप पण आधी आज मस्त बिअर मारू. असं ही उद्या शनीवार आहे. ऑफिसला सुट्टी, सकाळी लवकर उठायचं टेन्शन नाही. म्हणत विशाल ने एक बॉटल हातात घेतली.


"विशाल आज नको हवं तर उद्या घेऊ. आज खरंच इच्छा होत नाहीये." मिहिर त्याला थांबवत बोलला.


"काय रे आल्यापासून बघतो आहे..काहीतरी विचारात आहेस. संगत पण नाही तू काही." विशाल बोलला.


"सांगेल पण आत्ता नाही. आता सूप पितो आणि झोपतो. खूप दमल्या सारखं होत आहे मला." उद्याच्या मीटिंग बद्दल बोलणे टाळत मिहिर ने दुसरे कारण दिले.


विशाल काहीच बोलला नाही. दोघांनी जेवण केले. विशाल टिव्ही बघत बसला आणि मिहिर त्याच्या खोलीत झोपायला गेला. झोपण्याआधी आठवणीने त्याने पहाटे पाचचा गजर लावला.


विशाल रात्री बऱ्याच उशिरा पर्यंत मिहीरच्या उशाशी बसून होता. त्याला मिहिर ची काळजी वाटत होती. तो नेहमीच असं त्याच्या उशी जवळ बसत असे. मिहिर मात्र पुन्हा तेच स्वप्न बघत होता. आज मात्र तो घाबरून उठला नाही पुढे काय आहे हे बघण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण पुढे काहीच दिसले नाही. फक्त सगळी कडे सांडलेले रक्त त्याला दिसत होते. जणू कोणी जाणून त्याला पुढे काही बघण्यावाचून रोखत होते.


पहाटे चा गजर झाला. मिहिरला जाग आली. अर्धा तासात तो आवरून तयार झाला. जाताना त्याने विशाल च्या खोलीत डोकावून बघितले. विशाल गाढ झोपलेला होता.
स्वतः कडील चवीने त्याने घराचे लॉक बाहेरून बंद केले. टॅक्सी बुक केली आणि प्रवासाला निघाला. प्रवास दूरचा होता त्यामुळे सकाळी लवकर निघावे लागणार हे त्याला माहीत होते. निघताना मात्र एक मेसेज विशालला केला.


विशाल ला कसली काळजी वाटतं असेल? काय आहे सगळं? कोण रोखत असेल मिहिरला स्वप्नात? काय मेसेज केला असेल विशालला? जाणून घेण्यासाठी वाचत रहा परतुनी येईल मी


क्रमशः


© वर्षाराज



🎭 Series Post

View all