*शीर्षक:बालक आणि पालक!*
बालक आणि पालक म्हणजे मुलाच्या जन्मापासूनच जोडलेले नाते! लहान मुलं तरुण अवस्थेत पोहोचेपर्यंत आपल्या पालकांवर अवलंबून असते. तसेच ते जे पाहिलं आणि ऐकेल तसेच अनुकरण पुढे करते. मुलांवर संस्कार करण्याचे एक शिवधनुष्यच आई-वडील उचलतात. कारण जस जसे लहान बाळ मोठे होत जाते तस तसे आधी घर मग नंतर शाळा ह्यात ते गुंतत जाते. स्पर्धेच्या ह्या युगात टिकण्यासाठी पालकही आपल्या पाल्यासाठी योग्य काय आहे तेच पाहतात परंतु आज काल असे दिसून येते की मुले हट्टी होत आहेत. त्यांना हवं ते मागण्यासाठी ते हट्ट करतात. पर्यायाने आपल मूल ऐकत नसेल तर त्याचे आईवडील तो रागवू नये किंवा रडू नये म्हणून ते पूर्ण करतात पण प्रश्न असा पडतो की मग एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहणे आणि संयम हे गुण त्या मुलांमध्ये न येता मला हवं ते मिळणार असे ते निश्चित करतात त्यामुळे पुढे जावून मुलांनी काही मागितले आणि तर तेव्हा नाही मिळाले तर ते त्यांना सहन होत नाही. ह्यासाठी पालकांनी कोणता हट्ट पुरवावा हेही लक्षात घेतले पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीसाठी वाट पाहणे हे ही त्यातून सांगायला हवे.
घरात जर अपशब्द बोलणे असे जर चालू असेल तर मुले ते शब्द ऐकून इतरांना बोलण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांच्या समोर बोलताना ह्याचे भान ठेवून बोलणे आवश्यक असते.
तसेच कोणतीही गोष्ट चुकीची असेल तर रागवून न सांगता आधी प्रेमाने समजून सांगणे गरजेचे असते. ह्यातून मुलांना पालकांशी मनमोकळेपणाने काही समस्या सांगता येतील आणि ते केलेली चूक पुन्हा करणार नाही ह्याची खात्री होते.
आपल्या मुलाची तुलना इतरांशी न करता तो कुठे कमी पडतो किंवा त्याला कशात रस आहे हे पाहिले तर पुढचे भविष्य चांगले असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपल्या पाल्याची किती कुवत आहे त्यानुसार त्याला मार्गदर्शन केले तर ते पाल्य नक्कीच कोणत्याही दडपणाखाली राहणार नाही.
जसे पालक समजून घेतात तसेच पाल्यानेही त्यांचा आदर करावा आणि त्यांचे अनुभव ऐकून त्यानुसार पुढील पाऊल उचलले तर नक्कीच काही निर्णय चुकीचे घेण्यापासून परावृत्त होईल. बालक आणि पालक हे एकमेकांशी तेव्हाच जुळतील जेव्हा विचारांची देवाणघेवाण होईल त्यामुळे संवादही इथे खूप महत्त्वाचा घटक आहे.
समाप्त.
© विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा