Login

परीघापलिकडले नाते - भाग 4 (मराठी कथा : marathi story)

Parigh, parigha, parighapalikadle, Nate, spardha, Arnav, Anay, Anshika, Riya, hostel, school, boarding, family, kutumb, kautumbik, relation, marathi, katha, story, kathamalika, malika, shala

परीघापलिकडले नाते - भाग 4

अर्णवला होस्टेलमध्ये येऊन आता दोन तीन आठवडे झाले होते. आता इथल्या वातावरणाला तो थोडाफार सरावला होता, जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होता. तरीही बरेचदा अर्णवला कोणत्याही विषयावरून घरची आठवण येई आणि त्याचा चेहरा हिरमुसल्या सारखा होत असे.

त्या रविवारी रिया चे बाबा राहुल तिला हॉस्टेलमध्ये भेटायला आले. रिया तेव्हा कॅन्टीनमध्ये असल्याने ते तिथे गेले . मिष्टी, रिया आणि अर्णव तिथे नाश्ता करत बसलेले होते. रिया बाबांना आलेले बघून खूप खुश झाली.  तिने राहुलला अर्णवची ओळख करून दिली.

"बाबा, हा बघा माझा नवीन फ्लेन्ड (फ्रेन्ड) . संडेला मी तुमची वाट बघत होती न गेटजवळ थांबून तेव्हा आला हा इथे. हा पण माझ्याच वर्गात आहे." रिया सांगते.

"अरे  वा, हो का ? व्हेरी गुड ! नाव काय बाळा तुझे?", राहुल ने विचारले.

"अर्णव".

"पूर्ण नाव सांग ना, बाबांचं नाव, आडनाव ", रिया चे बाबा राहुल.

"अर्णव अनय भावे", अर्णवने सांगितले.

"तुझं घर कुठे आहे बाळा?", राहुल.

"मुंबईला", अर्णव.

" ओह, अच्छा, भावे इंडस्ट्रीज चे मालक आहेत त्यांचा मुलगा आहेस का तू ! ?" , राहुल.

"हो", अर्णव.

"नाइस !  मी ऐकलय त्यांच्याबद्दल. एका छोट्याशा  उद्योगापासून सुरवात करून खूप कष्ट करून त्यांनी आता किती वाढवलाय त्यांचा बिझनेस ", राहुल.

रिया, मिष्टी आणि अर्णव राहुलकडे फक्त बघत होते. हे लक्षात येताच राहुलला जाणवले यांना आपले बोलणे जास्त काही कळले नसावे.

तेवढ्यात "हो , खूप काम करतात माझे बाबा . तुम्ही पण खूप काम करता न अंकल ?", अर्णव म्हणाला.

"हो बेटा, सगळे आई ,बाबा आपल्या मुलांसाठी काम करतच असतात. मुलांना खाऊ ,खेळणी , कपडे, पुस्तकं आणायला हवीत न.
रिया, हे घे. आजोबांनी ही गोष्टीची पुस्तकं दिली आहेत . चित्रांचं पुस्तक पण आहे  आणि यात थोडेसे चॉकलेट आहेत . तू पण खा आणि तुझ्या फ्रेंड्स ना पण दे हं. " राहुल.

"Wow ! बाबा तुम्ही चॉकलेट पण आणले ? " रिया आनंदाने नाचायला लागली.
" मी आत्ता खाणाल , हो की नाही अर्णव ?" रिया पिशवीतून दोन तीन चॉकलेट काढत  म्हणाली . लगेच एक मिष्टीला, एक अर्णवला, एक बाबांना देऊन एक स्वतः पण तोंडात टाकले.

"कशी आहे माझी बेटी? नीट राहतेस न? रोज शाळेत जातेस न वेळेवर?  रोज संध्याकाळी अभ्यास पण करायचा हं ", राहुल रियाला विचारत होता.

" हो , बाबा. मी तल लोज वेळेवल जाते शाळेत , अन अभ्यास पण कलते. मॅडम नी मला काल व्हेली गुड म्हटलं होतं आणि  स्टाल (स्टार) पण दिले माझ्या वही मध्ये.  मिष्टीला पण वहीमध्ये स्टाल मिळाले ", रियाचे डोळे सांगताना आनंदाने चमकत होते. " हे बघा, माझी प्रोजेक्ट ची बुक".

"आणि डान्स क्लास कसा सुरू आहे ग बेटी?", राहुल बुक बघता बघता पुढे विचारायला लागला.
" डान्स मध्ये मिस ने आम्हांला दोन गाण्यांवल स्टेप्स शिकवल्या. बाबा , बाबा पुढच्या महिन्यापासून ना, मिस कथ्थक पण शिकवणाल आहेत. मी पण शिकू न कथ्थक ?" रिया.

"तुला आवडतं न? मग नक्कीच शिक ".

" हो , त्या दिवशी मिस ने मला एक्सलंट पण म्हटलं " चॉकलेट खात खात रिया आनंदाने राहुल ला सांगत होती.

"शाब्बास बेटा, माझी परी आहेस न तू? असंच छान राहायचं हं. बाबा लव्हज यु सो मच", राहुल रियाला जवळ घेत पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला .

" रोज नीट जेवतेस, खातेस ना ग पिल्लू? कोणतीही भाजी असो आपण पोटभर जेवायचं हं. जे दिलं असेल ते खाऊन घ्यायचं. हे नको , ते नको असं करायचं नाही. खाल्लं नाही आणि मग भूक लागली तर रिया बेटी काय करणार? पोटात कसं तरी होईल ना मग? ", राहुल म्हणाला.

"हो , मी तल सगळं खाते. मी अर्णवला पण सांगितलं सगळं खायला.", रिया.

"व्हेरी गुड", राहुल.

"मी गुड गर्ल आहे ना बाबा?", रिया आनंदाने म्हणाली.

"हो तर, नक्कीच गुड गर्ल आहे रिया बेटी", राहुल.
राहुलने गुड गर्ल म्हटल्यावर रियाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि ती राहुलला बिलगली.

" बाबा, आजोबा का नाही आले मला भेटायला ? मला त्यांची पण खूप आठवण येते", रिया.

"ते गावाला गेले आहेत म्हणून ते नाही आले. पुढच्या वेळी येतील हं, त्यांना माहिती आहे ना की रिया बेटीला त्यांची आठवण येते म्हणूनच त्यांनी गिफ्ट पाठवलं तुझ्यासाठी ", राहुल.

" हो, त्यांना सांगा की लिया ने पुढच्या वेळी बोलावलं आहे आणि थँक यू पण सांगा", रियाने आठवणीने सांगितले .

न रडता शांतपणे ऐकून घेणाऱ्या आपल्या मुलीबद्दल राहुलला अभिमान वाटला नसता तरच नवल !  तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून तो म्हणाला," चला बेटा, आता तुम्ही आपापल्या खोलीत जा हं. मी पण आता निघतो. मग पुन्हा येईन काही दिवसांनी ".

"पण बाबा, लौकल या हं". रिया.

"हो ग , माझी परी ,लवकर येईन हं, बाय. बाय मिष्टी, बाय अर्णव बेटा", राहुल.

अर्णव आतापर्यंत आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी त्या दोघांकडे एकटक बघत होता. त्याचा चेहरा एवढासा झाला होता. त्याला शांत आणि उदास झालेला बघून राहुलने मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

"काय झालं बेटा?" राहुल.

"अंकल, माझ्या बाबांना पण सांगाल इथे यायला? ", राहुल आणि रियाला बघून त्याला आपल्या आईबाबांची आठवण येत होती. राहुललाही ते जाणवले होते.
"हो बेटा, सांगेन हं . तू पण छान रहा, खेळ , आणि अभ्यास पण कर" . राहुलने त्याला खोटेच आश्वासन दिले. तो तरी काय करणार ना!
राहुल वॉर्डन ला भेटून रियाची चौकशी करून निघून गेला.

****

सोमवारी शाळेच्या स्टाफ रूम मध्ये मधल्या सुट्टीत सर्व शिक्षक बसलेले असताना कुलकर्णी सर म्हणाले,
"साठे सर, तुमच्या वर्गात पहिलीत तो नवीन मुलगा आलाय म्हणे? कसा आहे ? झाला का ऍडजस्ट आता?

"हं, तो अर्णव भावे ना? होतोय तो ऍडजस्ट अजून", गणिताचे साठे सर.

तेवढ्यात प्रिन्सिपॉल स्टाफ रूम मध्ये आले.
"काय, कशाबद्दल गप्पा सुरु आहेत?", प्रिन्सिपॉल.

"साठे सरांच्या वर्गात एक नवीन मुलगा आलाय ना, त्याच्याबद्दल बोलत होतो", कुलकर्णी सर.

"अच्छा, हो मलाही त्याच्याबद्दल विचारायचेच होते, बरं झालं आठवण केलीत, झाला का तो आता ऍडजस्ट? कसा आहे अभ्यासात?", प्रिन्सिपॉल .

"अभ्यासात खूप हुशार आहे सर, एकदा शिकवलेलं लगेच लक्षात राहतं त्याच्या. खास करून गणित आणि विज्ञान आवडीचे आहे त्याच्या." , साठे सर .

"ड्रॉइंग तर खूपच छान आहे त्याचं", ड्रॉइंगचे सर म्हणाले.

"अरे, वा! छान! अशी हुशार मुले शाळेचा नावलौकिक टिकवायला मदतच करतात", प्रिन्सिपॉल.

"पण तो अजूनही इथे फारसा रमल्यासारखे वाटत नाही. आर्यन, रिया, जय, मिष्टी एवढे तीन चार मित्र सोडले तर कुणाशी फारसा बोलत नाही तो", साठे सर.

"थोडं प्रोत्साहन द्यावं लागेल , मग खुलेल. कदाचित त्याच्या मनाची इथे येण्याची तयारी  नसावी. गृप ऍक्टिव्हिटी देऊन बघा मुलांना ", प्रिन्सिपॉल.

"हो, गृप ऍक्टिव्हिटी देतोय आम्ही अध्ये मध्ये . पण सर, मित्रही भारीच निवडलेत बरं का त्याने, त्याच्या तोडीस तोड अगदी. पण हे जरा जास्त प्रो ऍक्टिव्ह आहेत त्याच्यापेक्षा" , साठे सर सांगत होते.

"स्पोर्ट्स मे भी अर्णव अच्छा है सर. फुटबॉल सिखा रहा हूँ मै उसे", फुटबॉल कोच बिपिन सर.

"आप तो उसके पसंदीदा टीचर लगते हो , काफी हसता खेलता है वो आप के साथ . हम सब टीचर्स स्टुडंट्सको  और पढो, और पढो ऐसे डांटते रहते हैं लेकिन आप तो और खेलो , और खेलो  ऐसे कहते हो. इसिलीये सारे बच्चे बहुत पसंद करते हैं आप को", साठे सर हसत हसत म्हणाले.

बिपिन सर आणि सर्व शिक्षकही हसण्यात सामील झाले. तेवढ्यात सुटी संपली आणि सर्वजण आपापल्या वर्गात जायला निघाले.

अर्णव अजूनही वर्गामध्ये फारसा बोलत नसे. मात्र फुटबॉल कोच त्याला फार आवडले होते.  ते त्यांच्या खेळकर स्वभावामुळे किंवा कदाचित अर्णवच्या कलाने घेतल्यामुळे असावे, ते त्याचे आवडते शिक्षक झाले होते. फुटबॉल खेळताना तो बाकी सगळं विसरून आनंदाने खेळत असे.

*****

"हॅलो, वॉर्डन मॅडम, मी अर्णवची आई अंशिका बोलते आहे", अंशिका ने वॉर्डन ला फोन केला.

"हं, बोला ना अंशिका मॅडम", वॉर्डन.

"अर्णव कसा आहे , ठीक आहे ना?" , अंशिका.

"एकदम ठीक आहे तो. शाळेत गेलाय आता", वॉर्डन.

"अच्छा. आम्हाला सोडून कधी दुसरीकडे राहिला नाहीये न तो, त्यामुळे काळजी वाटते", अंशिका म्हणाली.

"हो, मी समजू शकते, पण तुम्ही काही काळजी करू नका. तसे काही असलेच तर मी फोन करेन तुम्हाला", वॉर्डन.

"रडतो का हो तो अजूनही?", अंशिकाच्या स्वर आता जडावला होता.

"सुरवातीला काही दिवस थोडा रडायचा, पण आता नाही रडत. आता तर छान मित्रही झाले आहेत त्याचे. आर्यन, रिया, जय, निकी हे सगळे मिळून इतके छान सांभाळून घेत आहेत न त्याला, की त्याचा मूड जराही डाऊन वाटला की लगेच हसवतात सगळे मिळून त्याला....

खरं सांगू का मॅडम, हॉस्टेल लाइफ ची हीच तर मजा असते. एकमेकांच्या नात्यात नसणारी ही मुले इतकी सांभाळून घेतात, मदत करतात एकमेकांना . सोबत हसतात,  खेळतात, अभ्यासही करतात. इतकी रमतात इथे की शेवटी इथून जाताना रडतातसुद्धा. आणि आम्ही आहोतच ना , सगळं बघायला. तुम्ही अजिबात काळजी करू नका" , वॉर्डन अंशिकाला समजावत होती.

"थँक यू मॅडम. खरच तुम्ही आहात म्हणून तितकी काळजी नाही. "

" मी समजू शकते मॅडम, शेवटी आईचं हृदय असतं ना, आठवण ही येणारच", वॉर्डन.

"हो ना, तुम्ही खूप समजून घेता आम्हाला,  तुमचे खूप आभार मॅडम, बाय" , अंशिका.

अंशिका फोन ठेवून तसाच विचार करत बसली होती. होस्टेलला सोडतानाचे अर्णवचे रडणे आणि त्याचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर  येत होते.....

......त्या दिवशी अर्णवला सोडल्यानंतर गाडीत बसून निघून गेल्यासारखे दाखवत अनय ने किंचित पुढे जाऊन गाडी थांबवली होती. अंशिका लगेच उतरून गेटच्या बाजूला असलेल्या झाडामागे लपून अर्णवला जाताना पाहत होती. अर्णवचे रडणे ऐकून थोडया वेळासाठी तिला आपला निर्णय चुकतोय की काय असे वाटायला लागले होते. अर्णव आणि वॉर्डन आत पोचून दिसेनासे झाल्यावर मग तिने स्वतः ला सावरले होते. दोघेही पुन्हा गाडीत बसून परतीच्या प्रवासाला लागले होते.

अंशिकाच्या हातातल्या फोनवर मेसेज ची टोन वाजली आणि अंशिका भानावर आली. अर्णवला एकदा भेटून, बघून आल्याशिवाय तिच्या मनाला चैन पडणार नव्हती. अनयशी संध्याकाळी यावर बोलण्याचे तिने ठरवले आणि आपल्या कामाला लागली.

संध्याकाळी घरी ....

क्रमश:
*****

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेेेखिकेेकडे राखीव.

हा पार्ट कसा वाटला ते नक्की कळवा.

 

🎭 Series Post

View all