Login

पारिजातक

पारिजातकवरील ललित लेख

पांढऱ्या शुभ्र पाच नाजूक पाकळ्या व केशरी नाजूक दांड्याचे प्राजक्ताच्या फुलांचा सडा धरेच्या कुशीवर पांघरूण निशेच्या काळोखात शुभ्र चांदण्या जशा अंबरात लुकलुकाव्यात तशा ती सुमने त्या तरूवर विराजमान झालेली आणि सकाळी सकाळी त्यांना धरतीवर मंद सुगंध पसरवण्यासाठी वाऱ्याच्या झोतासह विखूरण्यासाठी सज्ज झालेल्या ही प्राजक्तांची मखमली शाल मनाला, डोळ्यांना सुखवून जातो. त्याचा तो मंद सुगंध श्वासात भरला की एक वेगळाच आनंद वाटतो.

मी लहान असताना शेजारच्या अंगणात पहिल्यांदाच पाहिलेला प्राजक्त मनास भावला व डोळ्यांत देखील भरला. खास करून त्याची ती धवल केशरी दांड्याची इवलीशी नाजूक फुले. आईकडे मी हट्ट केला आपल्याही अंगणात असाच प्राजक्त हवा म्हणून. तेव्हा आम्ही भाड्याच्या घरात राहायचो म्हणून आईने त्यास नकार दिला. नंतर काही वर्षांनी आमचं स्वतःचं घर बांधलं तेव्हा मात्र प्राजक्ताचं छोटसं रोपटं अंगणात लावलं. किती आनंद झाला म्हणून सांगू ! माझ्या हक्काचा प्राजक्त माझ्या अंगणात, माझ्या दारात लावलेलं पाहून मन प्रफुल्लित झालं. केव्हाही मी त्याला पाहू शकते, मनातील गुपीत बोलू शकते हेही एक कारण होतंच. बाळाचे संगोपन करण्यात आई जसे अगदी निस्वार्थपणे त्याची काळजी घेत प्रेमाने सगळं करते तसे मी व माझी आई त्याची काळजी घेत होतो. हळूहळू ते रोपटं झाड व्हायला लागलं. दिसामाजी रोप वाढू लागलं. मुळांनी बळकटी धरली. अंकुर, धुमारे फुटू लागले. पहाटेच्या दवात न्हाऊ लागलं. कोवळ्या उन्हात चमकू लागलं. लबाड वाऱ्याच्या झुळकीसरशी डोलू लागलं. सर्व बाजूंनी त्याने बाळसं धरलं. हळूहळू रोपं कमरेपर्यंत व नंतर खांद्यापर्यंत आलं. त्याच्या फांद्यांचा पसारा वाढू लागला. मुक्या कळ्या दिसू लागल्या. बघता बघता फुलं येण्या योग्य झाला. ते बघून आम्हा मायलेकींचा ऊर आनंदानं भरून आला. नवजात बालकाचा हुंकार, त्याचं कुशीवर वळणं, पालथं पडणं, रांगणं व नंतर एक एक पाऊल टाकणं या सर्व गोष्टी जशा मातेला स्वर्गसुखाचा आनंद देतात तसाच या रोपाचं वृक्षात रूपांतर होण्यापर्यंतची स्थित्यंतरं पाहून आम्हा दोघींना झाला.

एखाद्या पहिलटकरणीसारखा तो वृक्ष कळ्यांच्या भारान वाकू लागला. वृक्षाचं सुप्त वैभव फांद्यागणिक कळ्यांच्या रूपाने नजरेत भरू लागलं. वाऱ्याशी दंगामस्ती करत फांद्या डोलू लागल्या. वेगळ्याच सौंदर्यानं वृक्ष नजर लागावी असा देखणा दिसू लागला.

एकदा मध्यरात्री अचानक मला जाग आली. खिडकी उघडी असल्याने माझी नजर सहज तिकडे गेली. मला दिसला तो भरगच्च पांढऱ्या पुष्पगुच्छांची बहरलेला प्राजक्त. जणू बाहू फैलावून हसत मला सांगतोय की, 'बघ रजनीच्या कुशीत तुझा प्राजक्त किती सुंदर दिसतोय.' त्या कुसुमांचा मंद सुगंधाने मी खिडकीत येऊन मनसोक्त नयनभरून त्याचं ते सौंदर्य न्याहाळू लागले. मध्यरात्री निवांतपणे निद्रिस्त झालेल्या प्राजक्ताच्या अर्धोन्मिलित कळ्यांवर खट्याळ वाऱ्यान हलकेच फुंकर मारल्याबरोबर कळ्या पूर्ण उमलून हसू लागल्या. कळ्या, फुलांच्या भारानं ते झाड अंगणात थोडासा वाकला. वाऱ्याच्या झुळूकीसरशी इवलीशी नाजूक केशरी दांड्यांची शुभ्र सुमने टपटप वसुंधरेवर बरसू लागली. ते पाहून मनात ' टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले' ही कविता आठवली. मुलांना शिकवताना वाचनात आलेली ही कविता मला खूप आवडायची.

पहाटे पहाटे अंगणातील प्राजक्ताचा सडा पडलेला दिसला की वाटायचे की निसर्गाने धरणीमातेवर त्या फुलांनी सुंदर रांगोळी काढली. खरे तर ही फुले अल्पायुषी पण तरीही हवी हवीशी वाटायची ती त्याच्या अभिजात सौंदर्यामुळे. ती फुले परडीत वेचून घ्यायची, देवाला वाहायची हा माझा दिनक्रम आहे. देवाबरोबर त्या फुलांनाही देवाला भेटण्याची आस असायची असे वाटायचे. जेव्हा ती त्याच्या चरणावर विराजमान व्हायची तेव्हा ती खूप खूश असल्यासारखी भासायची जणू ती वाट पाहत असायची त्याला नतमस्तक होण्यासाठी, त्याच्या चरणी लीन होण्यासाठी.

प्राजक्त वृक्षाला स्वर्गीय वृक्ष म्हटलं जातं. पुराणात ते झाड अमृत मंथनाच्या वेळी स्वर्गात अवतरलं असे मानले जाते. इंद्राच्या अंगणी असलेलं हे वृक्ष सत्यभामा रूसल्याने तिचा राग घालवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने ते धरतीवर आणलं. अशा गोष्टीचा उल्लेख पुराणात वाचण्यात आल्या आहेत. बघा ना देवदेवतांनापण ह्या प्राजक्ताची भूल पडली मग आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्याची भुरळ पडणारी नाही असे कसे होईल!

आमच्या अंगणात प्राजक्तावर आता फुलचुकी, वेगवेगळी पक्षी येऊ बसतात. रंगीबेरंगी फुलपाखरे त्या नाजूक फुलातील मकरंद गोळा करण्यात दंग होतात. छोटी सुगरण तिच्या इवल्या चोचीने सुंदर घरटं बांधून राहू लागली. मधून मधून छोटीशी खाऊटीही सरसर चढत उतरत लपाछपीचा खेळ खेळत असते. एकूणच काय तर आमच्याबरोबर तो पशुपक्षांचा सवंगडी झाला आहे.

कधी कधी रिकाम्या वेळी मला त्याच्याशी गप्पा मारायला आवडतं. सकाळी कधी सुट्टीच्या तो दिनकराच्या सोनेरी किरणांची चौफेर उधळण अंगावर घेताना मला दिसायचा. काही फुले धरेवर अंथरलेली दिसली तर काही झाडावरच होती म्हणून मग मी ते झाडं हालवल तर ते टपटप माझ्या अंगावर पडलीत. जणू त्या प्राजक्तांनी माझ्यावर वर्षाव केला आणि त्या वर्षावात मी चिंब न्हाऊन गेले. किती ते परमसुख म्हणावं.

माझ्या अंगणी प्राजक्ताच्या
नाजूक पुष्पांचा वर्षाव झाला
चिंब न्हाऊन गेले सारे अंग
किती ते परमसुख मिळे मला

खरंच की असे सुख आजच्या धावत्या युगात मिळणं दुर्मिळच ना !

सकाळी अंगणात प्राजक्त सडा टाकून मोकळा होतो. रितं होण्याचं समृद्धपण तो किती सहजपणे दाखवतो. त्या इवल्याशा नाजूक फुलांचा कितीसा भार असणार ना ! जो की त्याला हलका होऊन मोकळा झाला म्हणजे सृजनांचा हा भार हलका होतं असतो का? हलकं झालं म्हणून पोकळी निर्माण होतं नाही. तो मोकळा झालं म्हणजे खरंच रिता झालं असं म्हणता येणार नाही. मला वाटतं की रितं होण्यासाठी मुळात रिकामं असावं लागतं. हेच रिकामपण प्राजक्तकडे नक्कीच आहे, पुन्हा नव्याने फुलण्यासाठी, ह्या सृजनांकडे त्या सुंदर प्रक्रियेत तो मशगूल होतो. उद्यासाठी पुन्हा तेवढ्याच कळ्यांना खुलवण्यासाठी, सुंदर शुभ्र फुलांना फुलवण्यासाठी तो रिता होतो. प्रत्येकात केशर साठवून सुगंधाची कुपीची सगळीकडे लयलूट करण्यासाठी तो मोकळा झाला. मातीकडून घेतलेल्या जीवनदशाचं देणं सुगंधाच्या रूपात परत करण्यासाठी तो मोकळा झाला. धरणीच्या उपकराची परतफेड करायची त्याला जाणीव आहे. कृतघ्न व्हायला तो माणूस नाहीच ना. ज्या क्षणी ती फुले त्याच्या फांदीपासून वेगळी होतात त्याच क्षणी त्याचा त्या फुलांवरचा हक्क सोडतो. आजची फुललेली सारी फुले तो वर्तमानातील त्या क्षणांना वाहून मोकळा होतो. त्या फुलांत तो गुंतून राहत नाही. फुलांपासून दुरवण्याचं, विरहाचं दुःख तर त्यालाही असतं पण तरीही तो ते दुःख ठाऊक नाही असे दाखवतो म्हणूनच रितेपणाची भावना त्याच्या मनी मुळ धरत नाही. तो अनुभवतो तो फक्त बहरण्यातील परिपूर्णता आणि देण्यातील समाधान जे की त्याच्याकरिता
लाखमोलाचं आहे. त्याचा हाच गुण आपल्याला घेता आलं तर असा प्राजक्त व्हायला हवं ना ! मागच्या गोष्टी विसरून, त्यात गुंतून न रहता वर्तमानाचा प्रत्येक क्षण पूर्ण जगून घ्या, पुढचा क्षण प्राजक्ताच्या फुलासारखं फुलवा. फक्त आपलंचं नाही तर इतरांचं आयुष्यही सुगंधी करा. हाच संदेश तर देतो तो आपल्याला, होय ना!

प्राजक्तला पारिजातही म्हणतात. मराठी साहित्यातही हा सर्व साहित्यिकांचा पारिजात तेवढाच आवडता आहे. 'उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे' ही सुरेश भटांची व लतादींनी आपल्या स्वर्गीय स्वराने अशी गायली आहे की ही गझल मनाला हुरहूर लावून जाते. जसा गुलाब, मोगरा प्रेमिकांचा आवडता तसाच हाही त्यांना तितकाच आवडतो. विराह जाणतो तो. फुलांपासून तो वेगळा होतो म्हणजे विरह झाला ना, तो हसत पचवतो कारण त्याला माहिती पुन्हा त्याची भेट होणार आहे, तशीच सकारात्मकता तो सांगंतो म्हणून कदाचित आवडत असेल.

प्राजक्त मला आवडतो
विरहाचं दुःख जाणतो
पुन्हा फुलतो भेटीसाठी
सकारात्मकता सांगतो

प्रत्येकाच्या जीवनी असा सकारात्मक प्राजक्त फुलावा.