विषय:- परफेक्शनिस्ट
शीर्षक:- परिपूर्णतेचा हट्ट भाग -१
"आई तुला माहीत आहे ना मला काहीच येत नाही." मनवा चेहऱ्यावर चिंता दर्शवत म्हणाली.
"हो, पण तू आता शिकशील तर हळू हळू येईल. तू नको जास्त विचार करूस." रेणुका तिची आई म्हणाली.
मनवाचे लग्न ठरले होते. तीन महिन्यांनी लग्नाचा मुहूर्त होता त्यामुळे घरापासून शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी बाहेर राहिलेली मनवाला काहीच जेवण बनवता येत नव्हते.
आपले पुढे कसे होणार ह्याची तिला चिंता होती. तिच्या वयातील मुलींची लग्ने झाली होती. त्यांच्या घरातील कामे आणि सर्वांच्या आवडीनिवडी सांभाळत सगळे करायचे म्हणजे काय असते हे ऐकून तिने त्या गोष्टीचा धसकाच घेतला होता.
"मनवा तू आजपासून सर्व शिकायला सुरुवात कर हळू हळू जमेल तुला." नरेश, तिचे बाबा आपल्या मुलीकडे पाहून म्हणाले.
तिने होकारात मान हलवली.
दररोज सकाळी आणि रात्री कामावरून आल्यावर ती आईच्या मदतीने स्वयंपाक शिकत होती.
काही लोकांसाठी त्या गोष्टी सोप्या असतात तर काहींसाठी त्या अवघड. सुरुवातीला मीठ चवीनुसार घ्यायचे असे सांगितल्यावर मनवाचा खूप घोळ व्हायचा. कधी जास्त व्हायचे तर कधी कमी. आपली मुलगी शिकत आहे म्हणून तिचे आई-बाबा त्याकडे दुर्लक्ष करायचे.
एकदा मनवाचा होणारा नवरा ऋतुराज तिला बाहेर फिरायला नेण्यासाठी घेवून जाणार होता. मुले एकमेकांना भेटून आणखी ओळखतील म्हणून दोन्ही घरच्यांनी त्यांना संमती दिली होती.
"काय खाणार आहेस?" ऋतुराजने विचारले.
"काहीही फक्त जास्त तेलकट नको." ती म्हणाली.
त्याने हसूनच तिला पुन्हा विचारून जेवणासाठी ऑर्डर दिली.
"तुला एक विचारू?" त्याने विचारले.
"हो." मोजकच उत्तर.
"काही झालंय का? नाही म्हणजे तू खूप शांत असतेस." त्याने विचारले.
"नाही. असे काही नाही." ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"बरं, माझ्या मित्रमंडळींनी पुढच्या आठवड्यात फिरण्याचे ठरवले आहे. सोबत त्यांचे जोडीदारही असतील तर तुला यायला आवडेल? एका दिवसात फिरून येवू." त्याने जेवण येईपर्यंत तिच्याशी बोलताना विचारले.
"मी घरी विचारून पाहते. कारण ते काहीना काही खरेदी चालू असते आणि माझे ऑफिसचे काम आहे का पाहते." ती म्हणाली.
"हरकत नाही." तो म्हणाला.
थोड्यावेळाने त्यांनी जेवण केले आणि घरचा रस्ता गाठला.
"काही असेल तर सांगू शकते. कारण तू नाही म्हणालीस तरी काही आहे ज्याने तुझा मूड आज ठीक नव्हता असे मला वाटले." त्याने तिला मॅसेज पाठवला.
"आहे एक टेन्शन पण काही खास नाही." तिने त्याच्या मॅसेजला प्रतिसाद दिला.
"बरं,पुढच्या आठवड्याचे काय ते एक दिवस आधी सांग." त्याने पुन्हा दुसरा मॅसेज केला.
तिने "हो सांगेन." म्हणून त्याला मॅसेज पाठवला.
तिला कामामुळे काही त्याच्यासोबत जायला जमले नाही. तिने तसे त्याला कळवले.
"नाराज आहात?" फोनवर तिने विचारले.
"खोटं नाही सांगणार वाईट वाटले पण मला माझ्या बडीने समजावले. त्यामुळे आता काही वाटत नाही." ऋतुराज म्हणाला.
"तुमचा बडी खूप चांगला आणि समझदार आहे." ती त्याला हसत म्हणाली.
"हो,खूप जास्त." तो म्हणाला.
थोडावेळ बोलून त्यांनी फोन ठेवला.
तिचे बाबा तिच्याकडे आले.
"मनू एक गोष्ट बोलायची होती." तिचे बाबा बाजूला बसत म्हणाले.
ती "हो, बोला ना."
"कधी कधी जेव्हा आपल्या व्यक्ती सोबत वेळ घालवण्याची संधी येते ना तेव्हा त्याला नाही म्हणायचे नसते. कारण समोरचा व्यक्ती आपल्यासाठी त्याचा वेळ देत असतो. आज तू सुट्टी टाकून ऋतुराजसोबत जावू शकली असतीस की नाही?" त्यांनी विचारले.
"हो बाबा, पण त्याने घेतले ना समजून. तसेही मला नंतर सुट्ट्या घ्याव्या लागणार आहेतच की, आताच सुट्ट्या घेवून मी पुढे काय करणार?" ती हसत म्हणाली.
"मनू, काम आपण अर्थार्जनासाठी करतो बरोबर आहे पण त्यामुळे आपले प्रियजन दुखावणार नाही ह्याची पण काळजी घ्यायला हवी. जर होत असेल काही त्यावेळी तर करून बघ. आम्ही तुला एकुलती एक मुलगी म्हणून समजून घेत आलो तसेच सगळेच घेतील असे नाही ना आणि मला सांग तू कधी समजून घेतलेस तर काय फरक पडतो. जेव्हा एखादी वस्तू जास्त होते तेव्हाच तराजूची ती बाजू खाली जाते. मोठेपणा घेवून आपण पण नमते घेतले तर काय फरक पडतो सांग?"
तिच्या बाबांनी सांगितल्यावर ती त्या दृष्टीने विचार करू लागली.
तिच्या बाबांनी सांगितल्यावर ती त्या दृष्टीने विचार करू लागली.
"उद्या तुम्हाला वेळ आहे का?" तिने लगेच मेसेज केला.
"हो, ऑफिसनंतर आहे." त्याने सांगितले.
'आपण त्याला भेटल्यावर सर्व सांगू आणि तो काय विचार करतो ते पण समजेल. कारण सर्वच घाईत होत आहे असे मला वाटते.' ती स्वतःशी म्हणाली.
उद्या मनवाला भेटायचे त्यामुळे त्याने उशीर नको व्हायला म्हणून आधीच कपडे काढून ठेवले. झोप लागत नव्हती त्यामुळे गाणी ऐकत ती गुणगुणत थोड्यावेळाने तो झोपला.
पाहूया पुढे काय होते ?
क्रमशः
कथा आवडत असेल तर तुमची कॉमेंट्स मार्फत प्रतिक्रिया नक्की द्या.
© विद्या कुंभार
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा