विषय:- परफेक्शनिस्ट
शीर्षक:- परिपूर्णतेचा हट्ट भाग-२
ऋतुराज आणि मनवा दोघे चित्रपट पाहण्याचे निमित्त करत पुन्हा भेटले.
"मला काही गोष्टी सांगायच्या होत्या." ती म्हणाली.
"हो सांग ना." तो म्हणाला.
"मला जेवण फारसे जमत नाही. म्हणजे मी प्रयत्न करते पण तरीही. त्याचेच थोडे मला टेन्शन होते." ती म्हणाली.
"अगं, काळजी करू नकोस. त्यात काय एवढे? माझे बाबा काही बोलत नाहीत. तू प्रयत्न तर करत आहेस ना मग झाले तर." तिला समजावत म्हणाला.
"हो. खरेतर मी शिक्षण आणि नोकरीसाठी घरापासून लांब राहत होते आणि आई वडिलांची एकुलती एक मुलगी असल्याने कधी मी घरातील काम केले नव्हते. त्यामुळे एकदम सर्व जबाबदारी आता येणार त्यामुळे दडपण आले आहे. मला पुढे जमेल की नाही माहीत नाही आणि पुढे त्यावरून वाद झाले तर." ती बोलता बोलता थांबली.
"तू प्रयत्न तर करशील ना? मला घरातील थोडेफार काम करायची सवय आहे. जेवण मलाही तुझ्यासारखेच सर्व नाही येत पण बाबांनी शिकवले आहे. ते समजून घेतात. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आपले घर आपण सर्व मिळून सांभाळू." तो म्हणाला.
तिला ते ऐकून हायसे वाटले. असे नव्हते की ती काहीच प्रयत्न करणार नव्हती. घरी तिचे बाबाही तिच्या आईला मदत करताना तिने पाहिले होते.
थोड्याच दिवसांत दोघांचे लग्न झाले आणि मनवाने आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात ऋतुराज बरोबर केली.
ऋतुराजच्या घरी तो आणि त्याचे वडील फक्त दोघेजणच होते. त्याचा लहान भाऊ शिक्षणासाठी बाहेर होता आजी काही वर्षांपूर्वी त्याच्या आईचे दुर्धर आजाराने निधन झाले होते.
नवी नवरी म्हणून तिचे खूप कौतुक होत होते. ऋतुराजचे आजोळचे काही दिवस तिथे थांबणार होते.
देवदर्शन,सत्यनारायण पूजा झाली आणि दोघे लग्नानंतर फिरण्यासाठी उटीला गेले.
जवळपास आता एक महिना त्यांच्या लग्नाला झाला होता. थोडे दिवस मनवाने सुट्टी घेतली होती. त्यामुळे त्या सुट्ट्याही संपत आल्या होत्या. नवीन जोडपे म्हणून त्यांना ह्या महिन्याभरात जेवणासाठी आमंत्रण आल्याने तिला जास्त वेळ घरात जेवण बनवावे लागले नाही.
ऋतुराजचा लहान भाऊ त्याची परीक्षा असल्याने लग्नाला आला नव्हता पण फोनवरून त्याचे बोलणे व्हायचे.
मनवाने काय काय बनवायचे कधी काय करायचे ह्याचे नियोजन करण्यासाठी एक वही घेवून त्यात सर्व लिहून घेतले.
बाकी सर्व कामात तिला दोघे मदत करायचे पण जेवण तिचं बनवायची. सुरुवातीला तिची गडबड व्हायची तरीही तिचे सासरे आणि ऋतुराज समजून घ्यायचे.
एकदिवस ऋतुराज घरी लवकर आला. त्याचे बाबा केर काढत होते. त्याने स्वतःसाठी पाणी घेतले आणि स्वतःच्या खोलीत निघून गेला.
थोड्यावेळाने मनवा घरी आली. आज खूप थकली होती. तिने पाहिले तर सासऱ्यानी भाजी आणि आमटी झाली होती फक्त चपाती बनवायची बाकी होती.
तिने आधी सर्वांसाठी चहा बनवला मग पीठ मळून चपात्या करायला घेतल्या. मनवाला आता बऱ्यापैकी स्वयंपाक येत होता फक्त चपाती आणि भाकरी ह्याचा आकार कधी गोल व्हायचा नाही. ती खूप प्रयत्न करायची. आईही शिकून दमली मग तिने यूट्युबवर व्हिडिओ पाहून बनवायचे ठरवले. त्यातही दोन घडीच्या चपात्या काही तिला गोलाकार करायला जमत नव्हता. कसे तरी चपात्या बनवल्या आणि त्यांना जेवायला बोलावले.
सासरे तिच्याशी आज काय काय झाले हे नेहमीप्रमाणे विचारत जेवण करत होते. ऋतुराज मात्र शांत होता.
"अजून एक चपाती घ्या." मनवा त्याला म्हणाली.
"काही नको. एक साधी चपाती तुला गोल बनवता येत नाही. तिचा काय हा आकार आहे ?" तिला एक चपाती दाखवून तो रागात म्हणाला.
"अरे ती प्रयत्न करते. तिला हळू हळू जमेल." तापलेले वातावरण थंड करण्याचा प्रयत्न करत त्याचे बाबा म्हणाले.
"बडी, कधी जमणार? कालही तशाच बनवल्या होत्या. आधी तर नवीन म्हणून आपण मीठ नसलेली भाजी पण खाल्ली. असेच तिला पाठीशी घातले ना तर ती अशीच गृहीत धरेल." खूप तावातावाने तो बोलून आपल्या खोलीत निघून गेला.
"तू लक्ष देवू नकोस. आज त्याचे काहीतरी बिनसले असेल म्हणून तो राग काढतोय." त्याचे बाबा तिचे भरलेले डोळे पाहून म्हणाले.
तिने कसेबसे दोन घास पोटात ढकलले आणि सर्व आवरून खोलीत गेली तर तो झोपला होता.
सकाळही शांततेत गेली.
संध्याकाळी तो घरी आला तर सगळीकडे अंधार होता. त्याचे वडील निवृत्त झाल्यामुळे ते घरीच असायचे. त्याने त्यांना फोन लावला पण तो लागत नव्हता. काहीवेळाने ती येणारच होती तिला माहीत असेल म्हणून तो फ्रेश होऊन शांत बसला.
खूप वेळ झाला दोघांचा काहीच पत्ता नाही म्हणून त्याने तिला फोन केला तर तो सारखा व्यस्त आहे सांगत होता.
कुठे गेले दोघेजण असा प्रश्न त्याला पडला होता. काल आपण जास्तच बोललो का म्हणून त्याचे मन खात होते. आजवर तो आपल्या बायकोवर कधी रागवला नव्हता पण काल ऑफिसमधील एका व्यक्तीवरचा राग तिच्यावर काढल्याने त्याला वाईट वाटले. दोघांशिवाय त्याला ते घर थोड्यावेळातच खायला उठले. त्याने तिच्या घरी फोन केला पण ती तिथेही नव्हती.
रागावून ती कुठे गेली असेल तसेच हा विचार डोक्यात चालू असताना त्याने त्याच्या बाबांच्या मित्रांना फोन लावून ते तिथे आलेत का म्हणून विचारणा केली असता ते तिथेही नव्हते.
आता तो खूपच घाबरला. जवळजवळ तीन तास झाले होते तो घरात बसून वाट पाहत होता.
आता तो खूपच घाबरला. जवळजवळ तीन तास झाले होते तो घरात बसून वाट पाहत होता.
ते दोघे कुठे गेले असतील ?
क्रमशः
कथा आवडत असेल तर तुमची कॉमेंट्स मार्फत प्रतिक्रिया नक्की द्या.
© विद्या कुंभार
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा