Login

परिपूर्णतेचा हट्ट भाग-३(अंतिम)

ऋतुराजचा परिपूर्णतेचा हट्ट योग्य की अयोग्य?
विषय:- परफेक्शनिस्ट

शीर्षक:- परिपूर्णतेचा हट्ट भाग-३(अंतिम)

"बाबा,आपण केले ते बरोबर केले का?" एका हॉटेलमध्ये जेवत असताना न राहून मनवा म्हणाली.

"हो कारण त्याला समजायला हवे की, ऑफिसच्या कामाशी संबंधित गोष्टी घरात पाय ठेवल्यावर विसरायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे बघ आता त्याला रात्रीचे जेवण नाही मिळाले म्हणून त्याला समजेल की तुला काल बोलून त्याने चूक केली आहे. सकाळी ते दिवसभरात तो माफी मागू शकत होता पण त्याने तसे न करून अजून एक चूक केली."त्याचे बाबा म्हणाले.

"ठीक आहे ना बाबा, आता त्यांना आपण समजून घेवू. जास्त ताणायला नको. असे मला वाटते." तिला ऋतुराजची काळजी वाटत होती.

"जेव्हा कोणतीही गोष्ट पहिल्यांदा होते ना तेव्हा बोललेले बरे असते मनवा, नंतर बोलून वेळ निघून जाते. आता त्याला जाणीव व्हायला हवी." तिचे सासरे समजावून सांगत होते.

दोघे रात्री उशिरा घरी पोहोचले.

"तुम्ही दोघे कुठे गेला होता?" ऋतुराज त्यांना पाहून विचारत होता.

"किती फोन लावले मी, तुम्ही एकाने पण फोन उचलून मला सांगणे गरजेचे समजले नाही?" तो रागात म्हणाला.

"आलो ना आता. जा जावून झोप. आम्ही थकलो आहोत." त्याचे बाबा म्हणाले.

"बडी, मी तुमचा मुलगा आहे हे विसरू नका." आपल्या बायकोवर नजर टाकून त्याने बाबांना म्हंटले.

"वय झाले असले तरी मी विसरलो नाही आहे की तू माझा मुलगा आहेस ते." त्यांनी पण जरा हुश्यातच त्याला सांगितले.

ती खोलीत निघून गेली तिच्या पाठोपाठ तोही निघून गेला.

दोघेही काही न बोलता रात्री झोपून गेले. दुसऱ्या दिवशी दोघे आपल्या कामाला निघून गेले.

काल जे झाले त्याचा विचार ऋतुराज ऑफिसमध्ये बसून करत होता त्याचे कामात लक्ष नव्हते म्हणून त्याने हाफ डे घेवून घरी आला.

"बडी मला तुमच्याशी बोलायचे आहे." त्याने त्यांच्या बाबांच्या खोलीत जावून उभे राहून म्हंटले.

"बोल. " ते म्हणाले.

"काय झाले आहे? तुम्ही माझ्याशी असे का वागत आहात?" तो न राहून विचारत होता.

"मला तुझे परवाचे रात्रीचे वागणे पटले नाही. तुझे कसे झाले आहे माहीत आहे का सर्व गोष्टी तुला नीट हव्या असतात पण त्यात त्याचा दुसऱ्याला त्रास होत नाही ना हा तू विचार करत नाहीस. " त्यांनी सांगितले.

"पण बडी, ती पण चुकलीच ना. आता दोन महिने होतील तरी तिला नीट चपाती बनवता येत नाही." तो म्हणाला.

"तिने हे सर्व लग्नाआधी सांगितले होते ना? मग आता का तुला त्याचा त्रास होतोय. फक्त आकार गोल नाही बाकी ती नीट बनवतेच की. मला सांग तू ऑफिसवरून आल्यावर किती स्वतःहून मदत करतोस रे ? तुला सर्व सांगावे लागते मग करतोस तू." त्याचे बाबा त्याला तो काय करतो हे सांगत होते.

"जसे तुला तुझ्या ऑफिसमध्ये काम आणि त्याचा ताण असतो तसे तो तिला नसेल का? फक्त लग्नाआधी तुला घर सांभाळावे लागेल अशी अपेक्षा तू केलेलीस तशी ती पूर्ण करत नाही का? तिच्या घरी पण तिने इतके काम केले नसेल एवढे ती इथे करते. आपणही मदत करतोच पण तरीही ती कधी काही बोलते का? तुला माहित आहे काल मी जेव्हा तिला म्हंटले की तुझी चूक आहे तर ती काय बोलली?"

"काय?" ऋतुराजने विचारले.

"बोलली की आपण समजून घ्यायला हवे. तू उपाशी असशील ह्याची तिला काळजी होती."

"हो म्हणून मी जेवलो की नाही हे न विचारता ती झोपली." तो तोंड वाकडे करते म्हणाला.

"तसे वागायला तिला मी सांगितले होते आणि काय रे एव्हढेच होते तर डाळभात करायचा होतास ना नाहीतर ऑर्डर करायचे होते एका दिवसासाठी." बाबा म्हणाले.

"बडी काय झालं काय आहे? तुम्ही तिला चपाती नीट येत नाही म्हणून मी बोललो तर असे वागत आहात." तो नाराजीच्या सुरात म्हणाला.

"हो, कारण तू पुढे जाऊन क्षुल्लक कारणावरून होणारी मोठी भांडणे करू नये असे मला वाटते. तुला परफेक्ट बायको हवे आहे मग बाकी तिने कसेही करू दे. त्यामुळे ती काहीही करताना स्वत:चा आत्मविश्वास गमावेल. आपल्या जोडीदाराला तो आहे तसे स्वीकारले ना तर खूप कोडी सुटतील. ती एक गोष्ट सोडली तर आठव कधी तिने काही करायला कंटाळा केला आहे का? तुला आई नाहीये तरी आपल्या घरात ती एकमेव स्त्री असून नोकरी आणि घर ह्याचा समतोल साधते. कधी तिचे कौतुक करायचे सोडून चुका काढशील तर त्याच तुला दिसतील. त्यादिवशी ऑफिसचे टेन्शन तू घरी घेवून आलास आणि त्याचा राग तिच्यावर काढलास. हे मला पटले नाही. त्यानंतर तू तर माफी पण मागितली नाहीस. ही तुझी दुसरी चूक. पूर्ण घर एक स्त्री बांधून ठेवते असे म्हणतात पण थोडे फार काम आपण पण केले तर ते चांगलेच असते."

पुढे ते म्हणाले, "तुझी आई गृहिणी होती सर्व नीट करत होती. आपले नातेवाईक सारखे घरी यायचे. ती कधीच काही बोलायची नाही. जमेल तसे मी पण मदत करायचो परंतु नंतर तिला डोकेदुखीचा आजार जडला आणि तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पुढे जेव्हा ब्रेन ट्यूमर शेवटच्या स्टेजला गेला असे समजले तेव्हा हातात काहीच राहिले नाही. माझेही तिच्या तब्बेतीकडे दुर्लक्ष झाले. मनात गोष्टी साठवून ठेवून तिची तब्येतीची झालेली हेळसांड ह्यामुळे ती आपल्याला कायमची सोडून गेली. जोडीदार जेव्हा सोबत नसतो ना बाळा, तेव्हा जगायची इच्छा राहत नाही पण तू आणि तुझा लहान भाऊ ह्यामुळे मी आजपर्यंत जिवंत आहे." कातर झालेल्या आवाजात ते म्हणाले.

"मला माफ करा. मी इथून पुढे असे नाही वागणार." त्याला ही आपल्या बडीच्या डोळ्यांत अश्रू पाहून रडायला आले.

त्याच दिवशी रात्री ऋतुराजने मनवाची माफी मागून आपली चूक सुधारली तसेच तिनेही मनात काही न ठेवता त्याला माफ केले.

दुसऱ्या दिवशीच एक मावशी त्यांनी कामाला ठेवली त्यामुळे मनवाचा बराचसा वेळ वाचत होता. चपात्या आता गोल करायला पहिले ऋतुराज शिकला आणि तेव्हा त्याला समजले की परफेक्शनिस्ट असणे हा आग्रह नेहमी करणे बरोबर नसतो.

वेळेत ऋतुराजच्या वडिलांनी आपल्या मुलाला समजावले तसेच मनवानेही गोष्टी जास्त ताणल्या नाहीत. परिपूर्णता नात्यात असण्याचा हट्ट केला असता तर आंबट-गोड  नात्यातील चवीचा आस्वाद न घेता फक्त गोडच चवीवर समाधान मानावे लागले असते.

समाप्त.

कथा आवडली असेल तर तुमची कॉमेंट्स मार्फत प्रतिक्रिया नक्की द्या.

© विद्या कुंभार

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all