Login

कथा-परीस स्पर्श भाग ३ अंतिम

A Story About Student
कथा-परीस स्पर्श भाग 3 अंतिम


दीपक खूप घाबरला. त्याने मुख्याध्यापकांचे पाय धरले. तो खूप गयावया करू लागला. सर! यापुढे मी असे करणार नाही वगैरे म्हणत रडू लागला. त्याच्या वर्ग शिक्षिका म्हणाल्या, हा असा व्रात्य, खोड्या करणारा मुलगा माझ्या वर्गात नकोय. इतर विद्यार्थ्यांवर याचा वाईट परिणाम होईल. इतर शिक्षक सुद्धा दीपक च्या बाबतीत फार कठोर झाले होते. मुख्याध्यापकांनी ही बाब संयमाने घेण्याचे ठरविले. त्यांनी दीपक व चंदनला वर्गात पाठविले.

सर्व शिक्षकांना आपल्या सोबत कार्यालयात बसायला सांगितले. त्यांनी बोलायला सुरुवात केली.
माझ्या सहकारी मित्र मंडळींनो! 'हे बघा, आपल्याला हे विद्यार्थी घडवायचे आहेत. बिघडवायचे नाहीत. आपली ही शाळा म्हणजे हॉकीचा खेळ आहे. यातला चेंडू सर्वांनी मिळून एकाच गोलात टोलवायचा असतो. आपण जर या विद्यार्थ्यांना क्षमा केली नाही, तर हे, ज्वालामुखी बनून समाजाची राख करतील'.
हे बघा, "प्रेमाने जग जिंकता येते".'आपण दीपकला एक संधी देऊया'.
'पण सर, हा असा बेशिस्त मुलगा पुढे शिस्तीने वागेल असं वाटते का तुम्हाला'? वर्ग शिक्षिका म्हणाल्या. तसा सर्वांनी मॅडमच्या बोलण्याला दुजोरा दिला. बघू पुढे! त्याला एक संधी देणं आवश्यक आहे.
मुख्याध्यापकांनी विचार केला, यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल...

चला तर मंडळी! जाऊ या आपापल्या वर्गात. असे म्हणून मुख्याध्यापक आपल्या खुर्चीतून उठले. तसे सर्व शिक्षक आपापसांत कुजबूजत वर्गात निघाले...

'काय मग दीपक, कसा आहेस'?'तुझ्या मॅडमचा राग गेला की नाही अजून? चल माझ्यासोबत. आपण कार्यालयात बोलूया'. सर! मी फार मोठ्या चुका केल्यात आजपर्यंत. आता माझ्याशी कोणीही बोलायला तयार नाहीत.
'तुला पश्चात्ताप होत आहे तर' !चला, "हेही नसे थोडके" 'तुला चांगलं वागण्यासाठी एक संधी मी देत आहे. बघ, तुला या संधीचं सोनं करता येतं का!'
बरं, मी काय म्हणतो दीपक! 'तू उद्यापासून बाहेरच्या बोर्डवर दररोज एक सुविचार लिहायचा'. मुख्याध्यापकांनी त्याला सूचना केली. 'सुविचार सर्व वर्गांच्या पाठ्य पुस्तकांमधून गोळा कर. हा तुझा रोजचा उपक्रम.

'हो सर!मला चित्र सुद्धा छान काढता येतात. मी फळ्यावर छानसे चित्र काढू का?'
मुख्याध्यापकांना माहीत होते, हा बऱ्याच ठिकाणी कोणत्याही वर्गात जाऊन एखाद्या विद्यार्थ्याचे किंवा शिक्षकाचे व्यंगचित्र काढायचा. त्यासाठी त्याला छड्या सुद्धा खाव्या लागल्या होत्या.
'हो तर! तुझी ही कला आम्हाला माहित आहेच की!' दीपक ने मान खाली घातली.
बरं ,कर सुरुवात उद्यापासून... दीपकला खूप आनंद झाला.

आज गांधी जयंती! शाळेतील सर्व मुलांनी कार्यालयाच्या फलका समोर महात्मा गांधींचे चित्र पाहण्यासाठी गर्दी केली. त्याखाली लिहिलेल्या सुबक अक्षरातील सूविचाराने विद्यार्थी भारावून गेले. गांधी जयंतीच्या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी हॉलमध्ये गोळा झालेत.
महात्मा गांधींच्या चरित्रावर शिक्षक व काही विद्यार्थ्यांची भाषणे झालीत. अध्यक्षीय भाषणास मुख्याध्यापक उभे राहिले. व त्यांनी बोलायला सुरुवात केली.
बरं का मुलांनो! आज दर्शनी भागावर च्या फलकावर जे चित्र काढले आहे, ते तुम्हाला आवडले का? कोणी काढले असेल हे चित्र? संपूर्ण हॉल दीपकच्या नावाने दणाणून गेला.
मुलांनो बघा !'आपण दीपकला अत्यंत व्रात्य, खोड्या काढणारा म्हणून हिणवले होते .पण आपल्या शिक्षकांनी त्याला संधी दिली. आणि त्याने बघा संधीच सोनं केलं'.

दीपकला स्वतःतील कला कशी व्यक्त करायची, हे ठाऊक नव्हतं." लहान वयात व्यक्त होण्यासाठीचे सर्वात उत्तम माध्यम म्हणजे चित्रकला." "याचं कारण म्हणजे चित्र काढणाऱ्याच्या च्या भावना त्या चित्रात दडलेल्या असतात". 'दीपकला मोकळं करणं गरजेचं होतं'... असे म्हणून दीपकला सर्वांसमोर उभे करून मुख्याध्यापकांनी त्याचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.
दीपक ने सर्व शिक्षकांना चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला.

आज दीपक ने यशाची उत्तुंग भरारी घेऊन चित्रकलेच्या क्षेत्रात दर्जेदार चित्र काढून चांगले नाव कमाविले. मुख्याध्यापकांचा ",परीस स्पर्श" त्याला झाला नसता, तर आज समाजात एका बेजबाबदार नागरिकाची भर पडली असती.


समाप्त
छाया राऊत बर्वे अमरावती
८३९००८६९१७
0