परिसस्पर्श.
भाग -दोन.
"आई पण तू मला निशूसारखं मोठया शाळेत का नाही पाठवत? माझी शाळा किती छोटी आहे माहितीय का?" आपले गाल फुगवत ती म्हणाली.
"मनू शाळा लहान असली तर काय झाले? तुझे टीचर किती छान शिकवतात. तुझ्याकडून चांगला अभ्यास करवून घेतात. तुला तर आत्ताच किती पाढे पाठ झाले आहेत." शकू तिला सांगत होती. मनूचं काही समाधान होईना.
"आई आपण गरीब आहोत म्हणून छोटया शाळेत टाकलं नं मला?" ती आईच्या डोळ्यात बघत म्हणाली.
शकूची भांडी विसळून झाली होती. आपले हात कोरडे करून मनूच्या गळ्यात तिने ते गुंफले.
"मनू, आपण गरीब आहोत. पण तो काही गुन्हा किंवा चूक नव्हे. आपण आपल्या कष्टाची भाकरी खातो. कुणापुढं हात नाही ना पसरत. माणसाने श्रीमंत नसावं पण स्वाभिमानी असावं. कुणाचे मिंधे होवू नये."
"म्हणजे गं?" न समजून मनू.
"म्हणजे..? बघ, तुला काही हवं असेल नी तुझ्याजवळ पैसे नाहीत म्हणून तुला ती वस्तू नाही मिळाली. पण तुला आवडली म्हणून कुणी तुला फुकट देवू केली तर घेशील तू?"
"छे गं. मी नाही घेणार. मी आधी खुप पैसे जमा करणार नी मगच घेणार." ती आपले डोके हलवत म्हणाली.
"त्यालाच म्हणतात स्वाभिमान." शकू तिची पापी घेत म्हणाली.
कामं आटोपली तशी दोघी मायलेकी घरी निघाल्या.
"अगं मनू, हे फ्रॉक बघ. माझ्या भाचीचे आहेत. तिला छोटे होतात म्हणून तुझ्यासाठी आणलेत. घेवून जा गं." शलाका म्हणाली.
"नाही मॅडम. माझ्याकडे पैसे आले की घेईन मी." ती बाहेर पळाली.
"शकू खुपच मानी आहे गं तुझी लेक." शलाका शकुकडे बघून म्हणाली.
"म्हणूनच तर तिचं नाव मानिनी ठेवलंय ना मॅडम मी. आणि असं तिला सगळं फुकट मिळत गेलं तर पैशांचं मोल नाही कळणार तिला." शकूच्या चेहऱ्यावर स्वाभिमानाचे तेज झळकत होते.
मनू.. मानिनी! मोठया विचाराने शकूने तिचे नाव ठेवले होते. नावाप्रमाणेच लेक मानी व्हावी असं तिला वाटायचं. घरात अठराविश्व दारिद्र्य. त्यात नवऱ्याने दोन वर्षांपूर्वी ऍक्सीडेन्टमध्ये आपला एक पाय गमावला. सोबत म्हातारे सासुसासरे. पण त्याही परिस्थितीत ती ताठ मानेने जगत होती. आणि तेच संस्कार आपल्या चिमण्या मानिनीवर देखील करीत होती.
तिच्या संस्काराच्या बाळकडूने छोटी मनू वाढत होती. रोजची शाळा, घरी आईला मदत ह्यात तिचा वेळ निघून जाई.
शकूचं म्हणणं एकच, 'तू शिक. खूप मोठी हो.'
"मोठी म्हणजे किती मोठी होवू गं?" चिमणी मनू तिला विचारायची.
"एवढी मोठी हो की दुसऱ्यांना तुझ्याकडे बघताना नजर वर करून बघावं लागेल." शकू तिला तिच्या भाषेत सांगत होती.
मनू पटकन स्टूलवर उभी झाली. "आई बघ माझ्याकडे. एवढी मोठी होवू?" तिने अबोधपणे विचारले.
"हो. ह्यापेक्षा आणखी उंच हो. फक्त शरीराने नाही तर तुझ्या कर्तृत्वाने मोठी हो. अशी कुणीतरी मोठी हो की मला गर्वाने मान वर करून तुझ्याकडे बघता आले पाहिजे." तिला स्टूलवरून खाली घेत तिची पापी घेत शकू उत्तरली.
******
मनू मोठी होत होती. आता तिलाही हळूहळू आईच्या बोलण्याचा अर्थ कळायला लागला होता. आई सोबतीला होतीच. आता शिकून आई म्हणते तशी खूप मोठे व्हायचे. हे एकच ध्येय तिने पुढे ठेवले होते.
शकूच्या साथीने पूर्ण होईल का मनूचे ध्येय की नियतीच्या मनात दुसरेच काही असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
फोटो गुगल साभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा