Login

परिसस्पर्श

The Touch Of Magical Stone Changes Everything Into Gold, What Happens When We Get Such Personalities In Our Life

परीस स्पर्श!


परीस याबद्दल आपण नक्कीच ऐकलेच असेलच!
परीसाचा उल्लेख आपल्याला आपल्या पौराणिक कथांमध्ये नक्कीच मिळाला आहे. परीस एक असा दगड आहे जो लोखंडाला स्पर्श करताच त्याचे रूपांतर सोन्यात करतो. परिस मिळवण्यासाठी अनेक युद्धेसुद्धा झाली आहेत कारण प्रत्येकाला आपली सत्ता प्रभुत्व मिळवण्यासाठी श्रेष्ठत्व महत्वाचे आहे आणि प्रत्येक युगात लोकांच्या मनातले श्रेष्ठत्व हे प्रामुख्याने असलेल्या धनसंपत्तीला दिले गेले. मग ज्याच्या कडे जास्ती सोने, ज्याच्याकडे जास्त स्वरूपात धन तो श्रेष्ठ.

अमरावती जवळील "चिखलदरा" येथील एक कथा खूप प्रचलित आहे. चिखलदरा येथे गोंड राजा चे राज्य होते आणि त्याचा जो किल्ला होता त्याचे नाव "गाविलगढ".
त्याच्याकडे हा परीस होता असे म्हणतात आणि ज्यावेळी त्याचा पाडाव झाला तेव्हा त्याने हा परीस त्याच्या जलकुंडात फेकले का तर ते शत्रूला मिळू नये हा उद्देश.
खूप शोध घेतला गेला,अगदी हत्ती पाण्यात उतरवले, सैनिक शोध घेत होते पण ते काही मिळाले नाही...
त्यात एका हत्तीचे लोखंडी साखळदंड अचानक पाण्यात असताना सोन्याचे झाले पण त्या नंतरही ते परीस काही मिळले नाही.

हा परीस दगडच असेल का? की आणखी कोणत्या रुपात सुद्धा ते कार्यरत असेल?

परीस म्हणजे काय? की जे स्पर्शून गेल्यावर ज्याला ते स्पर्शीले -

त्याचे उज्वल होणे!
त्याला जिवंतपणा येणे!
त्याची प्रेम ही भावना उमलणे!
स्वतःबद्दल विश्वास निर्माण होणे!
जगण्याचा आनंद कळणे!
जगणे याचा अर्थ अनुभवणे!
स्वतःची ओळख होणे!
त्या अज्ञातशक्तींबद्दल विश्वास सशक्त होणे
ज्याला उद्दिष्ट सापडणे!
त्याला योग्य मार्ग मिळणे!

हा परीस स्पर्श खूप वेगळा आहे. कोणाला व्यक्ती रूपाने आयुष्यात मिळतो तर कोणाला त्या व्यक्तीने स्वतःमध्ये सामावून घेण्याने मिळतो. पण तो स्पर्श तुम्हाला आतून बाहेरून संपूर्ण बदलून टाकतो मी तर म्हणेन घडवतो मग तुमचे वय काहीही का असेना त्याला बंधन नाही.

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे नक्कीच आहेत,कुठे कमी तर कुठे प्रचंड जास्ती. विधिलिखित म्हणून आपण त्याला लेबल लावतो पण जर हे विधिलिखित आहे तर यावर त्याच विधात्याने काही ना काही पर्याय पण ठरवले आहेत. आपल्याला त्याबद्दल प्रत्यक्षात घडल्यानंतर ते कळते तोवर ते अदृष्य रूपाने काम करत असते.

अचानक पणे नवीन कोणी आयुष्यात येते तर जे आधीच आयुष्यात आहे त्याच्याबद्दल आपल्याला वेगळी अनुभूती होते. ती अनुभूती खूप काही नवीन शिकवण देते आणि त्याच बरोबर नवीन संकल्पना निर्माण करते. मग हा मनाला,आयुष्याला होणारा परीस स्पर्श नाही का?
जो स्पर्श प्रेम देतो,घडवतो, आपल्याला काही बनवतो तो परीस स्पर्शच!

आख्यायिका खूप ऐकल्या त्या परिस दगडाबद्दल पण जे प्रत्यक्षात आपल्या जवळ असते जे आपल्याला सोन्यापेक्षा मौल्यवान असे बनवते, ती अनुभूती देते ते सोन्यात बदलणाऱ्या परीस दगडापेक्षा अजून वेगळे ते काय!

प्रत्यक्षात एका व्यक्तीचा सहवास सुद्धा खूप काही घडवून आणतो. सहवासाचा स्पर्श हे खूप वेगवेगळे असतात पण त्यातला जो मनाला भावतो ,जो मनाला आदर्श वाटतो, मनाला आधार देतो , मनाला सुरक्षित भाव निर्माण करतो खंबीर बनवतो तो स्पर्श हा आपला वाटतो. तो स्पर्श हा बाहेरून आणि आतून दोन्ही अनुषंगाने पूर्णत्वास नेतो तोच हा परीस स्पर्श!

हा स्पर्श हा कोणत्याही पैसे, सोने,नाणे,चांदी,हिरामोती यापेक्षा कमी नाही. वस्तुनिष्ठ गोष्टी या बाह्य स्वरूपात आनंद देतात पण हा परीस स्पर्श हा आतमधून मनाच्या खोलीतून आपल्याला आनंद देतो.

अचानक एकट्यात काहीतरी आठवून गालावर आणि ओठावर येणारे गोड हसू हे त्या स्पर्शाचेच रूप.
कोणी कितीही सोबत असेल पण त्या स्पेसिफिक व्यक्तीने सोबत नसल्याची सतत उणीव हा सुद्धा त्या परीस स्पर्शाचेच भाव.

जो संकटातून मार्ग दाखवून पुढे जाण्याची टाकत निर्माण करतो तो हाच परीस स्पर्श.

ज्या एकाच्या जिंकण्यासाठी आपले सगळे पणाला लाव असे मनाला सांगतो आणि अगदी सहज पणे ते कृतीत घडते तो हाच परीस स्पर्श.

संपूर्ण जग उभे ठाकले तरी आपल्या ध्येयाने पछाडलेले मन तसूभरही हळू देत नाही तो हाच परीस स्पर्श.

ज्याच्या अस्तित्वाने एकाच ठिकाणी मन एकचित्त होते तिथेच हा परिस स्पर्श वास करतो.

जर असा परीसस्पर्श आपल्याला लाभला तर आप्पे आयुष्य हे नक्की बदलून जाते...नाही का?