जलद कथामालिका लेखन स्पर्धा.
विषय - नातीगोती.
पाश.. नात्यांचा!
भाग -दोन.
सहा महिने ट्रेनिंग आणि त्यानंतर हातात सात हजाराचा जॉब. खेड्यात राहणाऱ्या माधुरीला हा एवढ्या पगाराचा जॉबदेखील खूप काही मिळाल्यासारखा होता. स्वतःच्या कष्टाचा पैसा असणार होता तो. त्यामुळे ती खूष होती. आईच्या मागे लागून तिने इथे यायचा निर्णय घेतला होता. विलासरावाच्या मागे पुढारलेपणाचा बिरुद लागले होते म्हणून त्यांनीही लेकीला होकार दिला. आपल्या आईवडिलांच्या होकारामुळे मधू एकदम सातव्या आसमानात होती.
विलासरावांनी होकार दिला, त्याबद्दल त्यांचे कारण वेगळे होते. गावात त्यांच्या पुढारलेपणाचे कौतुक होणार होते आणि पोरगी चार पैसे कमावती असली तर तिला लग्नासाठी चांगले स्थळ चालून येईल असा एक छुपा विश्वासही होता.
इकडे माधुरी होस्टेलवर बऱ्यापैकी रमली. सोबत सगळ्या समवयस्क मुली, काही घरून पहिल्यांदा बाहेर पडलेल्या. सगळ्यांशी ती जुळवून घेत होती. चैताली, तिच्यासोबत इथे आलेली तिच्याहून जवळपास वर्षभराने मोठी असलेली ती माधुरीची चांगली मैत्रिण झाली होती.
इथे येऊन दोन महिन्यांचा काळ लोटला होता. आल्यापासून एकदाही तिची पाळी आली नव्हती म्हणून मग रूममेट असलेली चैताली तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली.
"चैतू, अगं मला सवय आहे. खूपदा दोन तीन महिने गॅप पडत असते. तू उगाच मागे लागली आहेस." रिसेप्शनवर नाव सांगता सांगता ती चैतालीला म्हणाली.
"मधू, बरं नसतं गं हे. पीसीओ की काय म्हणतात बघ, तसे आहे बहुतेक. लग्न झाले की मुलबाळ व्हायला प्रॉब्लेम होतो. माझ्या आत्याच्या मुलीला व्हायचं असं. सासूने लय तगादा लावला होता मग. म्हणून म्हणते उपचार करून घेणे केव्हाही चांगले." चैताली तिला समजावत होती.
"किती महिन्यांनी पाळी लांबली आहे?" केबिनमध्ये गेल्यावर डॉक्टर शलाकाने विचारलेल्या प्रश्नाने माधुरी देखील विचारात पडली. मागची पाळी केव्हा आली होती हे तिला नीटसे आठवत नव्हते.
"बहुतेक तीन चार महिने झाले असावेत." विचार करून ती उत्तरली.
"तुला नेहमी असा प्रॉब्लेम होतो?" डॉक्टर.
"हो, म्हणजे कधीकधी पाळी दर महिन्याला येते तर कधी दोन महिन्यानंतरही होते. पण मॅडम या वेळी जरा जास्तच उशीर झालाय." माधुरी.
"मग या वेळी इतका वेळ का थांबलीस? असे तीन तीन महिने पाळी आली नाही की वाट नसते गं बघायची. डॉक्टरांकडे जाऊन मेडिसिन घेऊन घ्यायची. नाहीतर मग पुन्हा हार्मोनल लोचा सुरू होतो."
डॉक्टरांच्या बोलण्यावर तिने केवळ स्मित केले. पाळीचा आजार एवढया गांभीर्याने घ्यायचा असतो हेच मुळात तिला माहित नव्हते.
"बरं,ये. झोप इथे. मी तुला तपासून बघते." डॉक्टर शलाकाने तिला तपासणी टेबलवर झोपवून चैतालीला बाहेर थांबण्याचा इशारा केला.
तिला तपासताना पाळी न येण्याचे कारण काहीतरी वेगळे आहे हे त्यांना जाणवले होते.
"शेवटची पाळी केव्हा आली हे खरंच तुला आठवत नाहीये का गं?" आपल्या मृदू आवाजात प्रश्न विचारल्यावर शलाकाला माधुरीकडून केवळ नकारघंटाच ऐकायला मिळाली.
"कुणी बॉयफ्रेंड वगैरे आहे?" शलाकाने पुढचा प्रश्न केला. माधुरीने त्यावरदेखील नकार दिला.
"मधू, हे बघ मला पाळी न येण्याचं कारण वेगळं वाटत आहे. आपण एक युरीन टेस्ट करून बघूया. " शलाकाच्या बोलण्यावर काही न कळून तिने दुजोरा दिला.
इकडे पाळी न येण्याचे शलाकाला जे कारण वाटत होते तेच खरे होते. किटवर दोन लाईन स्पष्ट दिसत होत्या.
"या दोन लाईनचा अर्थ तुला कळतो? आतातरी सांग काय प्रकरण आहे?" शलाका तिच्या डोळ्यात बघत म्हणाली.
दोन वर्षापासून माझे प्रेमप्रकरण सुरू आहे. घरी माहिती नाहीये. जवळपास पाच महिन्यापूर्वी आमच्यात संबंध आले होते.. एकदाच." डोळ्यात पाणी घेऊन माधुरी बोलत होती.
"तुझी प्रेग्नन्सी पण पाच महिन्याची आहे. अशी गं कशी तू बेजबाबदार पणे वागलीस? काय करणार आहेस आता?" शलाका.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
काय असेल माधुरीचे उत्तर? वाचा पुढील भागात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा