Login

पश्चात्ताप

संशयाने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. त्याचा कृतीचा नंतर पश्चात्ताप झाला पण वेळ निघून गेली होती. पश्चात्तापाच्या आगीत होरपळणाऱ्या मिलिंदची कथा
ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५

लघुकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- पश्चात्ताप

"कोठे होतीस तू? दार उघडायला इतका उशीर लागतो का तुला?" दारातून आत येत मिलिंद शिवानीवर खेकसला.

"डोळे लागला होता ओ, उठून उघडायला वेळ तर लागेलच ना." त्याच्या आवाजाने शिवानी घाबरलेली तरीही हिंमत करून म्हणाली.

सटाक ऽऽ तिच्या गालावर त्याची जोरदार चपराक बसली.

"तोंड वर करून काय बोलतेस? मला उलट उत्तर देतेस. रात्रभर काय खड्डे खणायला गेली होतीस का, आता दिवसा झोपा काढायला?" तो एका हाताने तिचे केस ओढत तर दुसऱ्या हाताच्या पंज्यात तिचा जबडा दाबून धरत रागाने म्हणाला.

ती वेदनेने विव्हळत होती. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले.‌ ती तिच्या केसांना त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत कळवळत म्हणाली," अहो, दुखतंय सोडा मला."

पण त्याला तिची दया आली नाही. तिच्या केसांना जोरात हिसडा देत तिला जोरात मागे ढकलले.

"आह, स्स!" तिच्या चेहऱ्यावर वेदना दाटून आली. त्याने तिला ढकलल्याने ती दोन पावलं मागे जात भिंतीला आदळता आदळता राहिली. कसे बसे स्वतःला सावरत हुंदके देत उभी राहिली.

तिला रडताना पाहून तो पुन्हा चिडत म्हणाला," झालं सुरू, जरा काही बोललो की डोळ्यांतून गंगा जमुना वहायला सुरू होते. आता असे पाणी गळत माझ्या डोक्यावर उभा राहशील का? जेवायला वाढ की तेही तयार नाही."

तो तिच्याकडे नजर रोखून बघत होता. तिने डोळ्यांतील अश्रू पुसत होकारार्थी मान डोलावली‌ आणि जेवणाचं ताट व पाण्याचा तांब्या घेऊन आली.

तो हात पाय धुवून येत जेवायला मांडी घालून जमीनीवर बसला. तिने जेवणाचे ताट त्याच्या पुढ्यात सरकवले. जसा त्याने घास तोंडात घातला तसा तोंड वाकडे करत त्याने तो घास थुंकला. ताट तिच्या दिशेने भिरकावत चावताळून तिला म्हणाला," छ्या ! साधं जेवण पण नीट बनवता येत नाही का तुला? कसलं बेचव जेवण बनवलयं? ना तिखट ना मीठ आहे त्यात."

"मी ऽ ऽ मी तर सगळ व्यवस्थित टाकलं होतं." ती घाबरून अडखळत म्हणाली.

"हो, मग मी खोटं बोलतोय का?" तो डोळे मोठे करून तिच्या जवळ जातं म्हणाला.

तिला वाटलं तो तिच्यावर पुन्हा हात उचलणार की काय? म्हणून तिने घाबरून डोळे गच्च मिटून घेत तिच्या चेहऱ्यासमोर हात आडवा धरला होता.

मिलिंद रिक्षा चालवत होता तर शिवानी नर्स होती. तिचा स्वभाव मनमिळाऊ व प्रोफेशनही तसे असल्याने ती सगळ्यांशी हसतखेळत बोलायची हीच गोष्ट त्याला आवडत नव्हती.

मिलिंदचा स्वभाव चिडका, शीघ्र कोपी आणि संशयी होता. त्यामुळे तो नेहमी तिला संयशी नजरेने पाहायचा.

आधी तो एका बॅंकेत क्लर्क म्हणून काम करत होता. तिथेच एकदा शिवानी व त्याची भेट झाली होती. भेटीचे रूपांतर मैत्रीत झाले. तेव्हा तिला तो चांगला वाटला होता. नंतर भेटी वाढू लागल्या. त्यातच प्रेम झाले. तिच्या घरच्यांना तो पसंत नव्हता. पण तिच्यावर त्याचे प्रेम हावी झाले होते. तिने घरच्यांचा विरोध पत्करून त्याच्याशी लग्न केले.

सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. जसे नव्याचे नऊ दिवस संपले तसे मिलिंदने त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. त्याला दारूचेही व्यसन होते. हे तिला लग्नानंतर समजले.

बॅंकेतही नियमित न जाणे, गेला तर दारू पिऊन जाणे यामुळे त्याचे बॅंकेतले काम सुटले.

शिवानीला चांगला पगार होता. काही दिवस घरी राहिल्यावर त्याच्या डोक्यात रिक्षा घेण्याचे खूळ भरले. त्याला रिक्षा चालवायला येत होती. बॅंकेच्या नोकरी आधी तो रिक्षा चालवत होता. नोकरी लागल्यावर त्याने रिक्षा चालवणे बंद केले.

आता नोकरी नाही म्हटल्यावर त्याने रिक्षा चालवणे ठरवले. त्यासाठी त्याने तिच्याकडे रिक्षा घेण्यासाठी तिच्यामागे तगादा लावला. तिनेही तिला तिच्या कामाच्या ठिकाणी तो आणायला, घ्यायला येईल हा विचार करून  काही रक्कम रोख व काही लोन काढून तिने त्याला रिक्षा घेऊन दिली.

सुरवातीला काही दिवस रिक्षा व्यवस्थित चालवली. लोनची रक्कम थोडी फार चुकवली. नंतर पुन्हा पहिल्यासारखे चालू केले. कधी रिक्षा घेऊन जायचा तर घरीच बसून राहायचा. तिला हाॅस्पिटलमध्ये सोडायचे आणायचे काम मात्र व्यवस्थित करायचा. इथेही त्याचा संशय असायचा.

एकदा तिची ड्युटी संपल्यावर ती एका ज्युनिअर डाॅक्टर अमित सोबत हसत बोलत बाहेर येत होती.‌ बोलता बोलता त्या दोघांनी एकमेकांना टाळी देऊन हसले.

तो रिक्षाला टेकून तिची वाट पाहत उभा होता. त्या दोघांना तसे बोलताना पाहून त्याच्या कपाळावरची शीर ताठ झाली. नजर रोखून तो त्या दोघांना पाहत होता.

तिची नजर मिलिंदवर पडताच तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले.

डाॅक्टर अमित तिची नजर कोठे आहे हे पाहून तिला हसत म्हणाला,"अरे, तुझा नवरा आला वाटतं. चल मी ही निघतो. छान वाटले तुझ्याशी बोलून. बाय."

ती मिलिंदकडे पाहत बळेच हसून त्याला तिने निरोप दिला.

जाताना त्याने तिच्या हातात हात मिळवला. हे पाहून तर त्याचे डोके आणखीनच सणकले. तो तिला तिथे काही बोलला नाही ; पण घरी आल्यावर मात्र त्याने तिच्यावर हात उगारत तिला खूप सुनावले.

तिला आता त्याचे वागणे अंगवळणी पडले होते. घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न झाल्याने तिचे माहेर आणि सासर दोन्हीही गमावले होते. त्याच्या स्वभावामुळे ती फारशी कोणाशी बोलत नसायची.‌

एकदा संध्याकाळी तो झिंगत घरी आला. ती काॅलवर कोणाशी तरी हसत बोलत होती. ती कोणाशी बोलते ऐकण्यासाठी तो तिथेच दाराआड लपला.

"अरे, ते घरी नाहीत. काय सांगतोस ! दोन मिनिटांसाठी येतोस. अरे, पण आपण हाॅस्पिटलमध्ये भेटू ना, तेव्हा पाहेन ना. बरं बाबा, ठीक आहे ये तू. मी वाट पाहतेय." तिने हसून काॅल कट केला.

मिलिंद रागाने लाल होत आत येत तिचे दंड जोरात दाबत स्वतःकडे वळवले आणि तिच्या कानाखाली सनकन ठेवून देत तिला म्हणाला,"मी घरी नसताना तुझी ही थेर चालू असतात काय ? कोण होता तो? का भेटायचे आहे त्याला तुला? "

त्याने इतक्या जोराने तिला मारले होते की तिच्या ओठांतून रक्त येत होते.

ती गालावर हात ठेवत त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागली,"अहो, अमितचा काॅल होता. तुम्ही घरी नाही म्हणून त्याला येऊ नको म्हणून सांगत होते. तो माझा .." ती पुढे काही बोलणार तोच तो तिला पुन्हा मारत दात आवळत  म्हणाला,"तो तुझा यार आहे, हो ना."

तिचाही संयम सुटला. तिच्या सहनशक्तीचा अंत झाला. त्याने पुन्हा तिला मारण्यासाठी उचलणारा हात हवेत धरून ती त्याला झिडकारत म्हणाली, "बास्स! खूप झालं आता ; पण आता नाही सहन करणार. तुम्हाला समजण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हाला खूप चढली आहे.‌ उतरल्यावर बोलू."

ती त्याला क्राॅस करून जाऊ लागली तोच त्याने तिला रागात धुसफूसत तिला जोरात ढकलले. त्याने इतक्या जोराने तिला ढकलले की तिचे डोके भिंतीला आदळल्याने ते फुटले. ती जोरात ओरडून खाली कोसळली आणि जागीच मृत पावली.

तिला तसे पाहून तो तिच्याजवळ जाऊन तिच्या गालावर थोपटत तिला उठवू लागला," ए उठ. नाटकं करू नकोस."

ती कधीच उठणार नाही हे कळल्यावर मात्र त्याची नशा झटक्यात उतरून गेली आणि त्याची पाचावर धारण बसली. कपाळावर घामाचे दवबिंदू जमा झाले.

तेवढ्यात दार ठोठावल्याचा आवाज आला.
तो कसाबसा सावरत अर्धवट दार उघडून बाहेर पाहिले.

हसतमुखाने अमित दारात उभा होता. तो त्याला म्हणाला," माफ करा, दाजी. मी तुम्हाला न विचारतो घरी आलो. ताई म्हणाली होती नको येऊ. पण दोन दिवसांनी माझे लग्न आहे. तर मला तिची करवलीची साडी आणि तुमच्यासाठी हे कपडे द्यायचे होते म्हणून आलो. कुठे आहे ती? तिला बोलावता का?"

तो दारातून वाकून बघण्याचा प्रयत्न करत होता.

त्याचे बोलणे ऐकून मिलिंदला बोलावे तेच कळेना.

ती दिसणार नाही अशा रितीने तो बाहेर येत दार पुढे ओढून घेत म्हणाला, "काय ? तू तिला ताई म्हणालास? " मिलिंद मनात अपराधीपणा दाटून आला.

"हो, ती मला लहान भाऊ मानते आणि मी तिच्यात माझी मोठी बहीण पाहतो. काय झालं, दाजी? ती बरी आहे ना." अमित घाबरून म्हणाला.

"माझ्याकडून चूक झाली, अमित. मी तुमच्या बहीण भावाच्या पवित्र नात्यावर संशय घेतला. संशयात मी एवढा बुडून गेलो की तिचं काहीच ऐकून घेतले नाही. आणि मी.." बोलता बोलता थांबून तो तोंड ओंजळीत घेऊन ढसाढसा रडू लागला.

त्याचे बोलणे ऐकून अमितने धावत आत येऊन पाहिले तर शिवानी रक्ताच्या थारोळ्यात पडली दिसली. त्याने तिला तपासून पाहिले तर ती आधीच गतप्राण झाली होती.

अमित रडत तिच्या अंगावर आणलेली साडी पांघरूण निघून गेला.

नंतर मिलिंद स्वतःच पोलीसांना शरण गेला. आता तो रोज पश्चात्ताच्या अग्नीत जळतोय.

समाप्त -

संशय आणि व्यसन खूप वाईट. संशयाने सगळ काही उध्वस्त होतं. इतकं की पश्चात्तापलाही वेळ मिळत नाही.

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यातील पात्र, स्थळ काल्पनिक आहेत. याचा जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0