वाट प्रेमाची -२
काही दिवसांनी गावच्या सरपंचाकडून स्वप्निलला समजलं की आराध्याचा नवरा तिला सोडून गेला होता. लग्नानंतर काही वर्षांनी तो मोठ्या शहरात गेला आणि तिथे जाऊन दुसरं लग्न केलं. त्याने आराध्याला आणि त्यांच्या लहान मुलीला पूर्णपणे सोडून दिलं. या कटू सत्याचा सामना करत, आराध्या आपल्या मुलीला घेऊन गावात परत आली आणि जिवनाच्या लढाईला स्वतःच्या हिमतीवर सामोरी जाऊ लागली. आपल्या आणि मुलीच्या उदरनिर्वाहासाठी ती गावातील शाळेत मदतनीस म्हणून काम करू लागली. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ती कधीच कोणासमोर गयावया करत नव्हती, कोणाकडून सहानुभूती मिळवण्याचा तिचा स्वभाव नव्हता. ती स्वतःच्या हिमतीवर जगत होती.
स्वप्निलला तिच्या धैर्याचं आणि आत्मसन्मानाचं खूप कौतुक वाटलं, पण तिच्या डोळ्यांतील खोल गेलेल्या वेदनेची छाया मात्र त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने जाणलं की ती कितीही सक्षम असली तरी तिच्या मनात खोल कुठेतरी एक दाह तळमळत होता.
हळूहळू, शाळेत भेटता-भेटता, दोघांमध्ये संवाद वाढू लागला. सुरुवातीला औपचारिक बोलणं असायचं—शाळेच्या कामांपुरतं. स्वप्निल तिच्या मुलीला शिकवत असे, आणि आराध्या तेव्हा तिथेच उपस्थित असायची. तिच्या मुलीच्या शिक्षणाबद्दल ती फार जागरूक होती, त्यामुळे तिचं शाळेत वारंवार येणं स्वाभाविक होतं. मात्र, हळूहळू त्यांच्या गप्पांचा ओघ वाढत गेला. आराध्याने स्वप्निलच्या विचारसरणीचा, त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा अनुभव घेतला आणि तिच्या मनात त्याच्याविषयी एक आकर्षण निर्माण होऊ लागलं. त्याचं विचारमंथन, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याची संवेदनशीलता—या सगळ्यामुळे ती त्याच्याशी अधिक मोकळी होऊ लागली.
स्वप्निललाही तिच्यात असलेलं गूढ अधिकाधिक समजून घ्यावंसं वाटू लागलं. तिच्या मनातील जखमा जाणून घ्यायच्या होत्या, तिच्या वेदनेच्या खोलात डोकावायचं होतं. आणि या प्रवासात, नकळतच, त्यांच्या मनात काहीतरी नवीन उमलू लागलं होतं—एक नाजूक, अव्यक्त भावना…
त्या दोघांच्या आयुष्याच्या पटावर, न दिसणाऱ्या पण जाणवणाऱ्या नव्या रंगांनी हळूहळू विस्तार घ्यायला सुरुवात केली होती…
एके दिवशी, गावात वार्षिक जत्रेचा उत्सव उफाळून आला होता. जत्रेच्या गजबजाटात आनंदी हास्याचे आवाज मिसळले होते, रंगीबेरंगी रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता, आणि हवेत ताज्या पक्वान्नांचा मोहक सुगंध दरवळत होता. सर्वत्र चैतन्याचे वातावरण होते.
या गोंगाटापासून थोडा लांब, एका शांत कोपऱ्यात, आराध्या आणि स्वप्निल दोघं निवांत बसले होते. संध्याकाळच्या गार वाऱ्याने त्या क्षणांना आणखी सुखद बनवले होते. आराध्या आतून अस्वस्थ होती. मनात अनेक प्रश्न होते, अनेक विचार होते, जे तिला आतून पोखरत होते. आज मात्र तिने पहिल्यांदाच आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून द्यायचे ठरवले.
ती हळुवार आवाजात म्हणाली, "कधी कधी असं वाटतं, जर आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करता आलं असतं, तर किती बरं झालं असतं! पूर्वी घडलेल्या काही गोष्टींना बदलता आलं असतं, काही चुका सुधारता आल्या असत्या. सगळं पुन्हा नव्याने घडवता आलं असतं."
स्वप्निल तिच्या शब्दांमागील भावनिक ओढ ओळखत होता. काही क्षण तो शांत राहिला. तिच्या डोळ्यातील वेदना त्याने स्पष्टपणे पाहिल्या. जणू त्याला तिच्या मनाचा वेध घेता येत होता.
हळूहळू तो मंद स्वरात बोलू लागला, "कोण म्हणतं की आयुष्य पुन्हा सुरू करता येत नाही? ते आपल्याला नेहमी नवी संधी देत असतं. फक्त आपण त्या संधींना स्वीकारायची तयारी ठेवायला हवी. ज्या गोष्टी मागे राहिल्या, त्या बदलता येणार नाहीत, पण पुढचं आयुष्य आपण नव्याने घडवू शकतो. स्वतःला पुन्हा उभारू शकतो."
स्वप्निलच्या या शब्दांनी आराध्याच्या मनात एक वेगळीच भावना उमटली. तिच्या हृदयावरच्या जुन्या जखमा जणू हळूहळू भरू लागल्या होत्या. त्याच्या प्रत्येक शब्दाने तिच्या मनात एक नवी उमेद जागी होत होती. जणू तिच्यासमोर नवी पहाट उगवत होती, जिथे आयुष्याला नव्या दृष्टीने पाहण्याची संधी होती.
सौ. जान्हवी साळवे (मुंबई)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा