Login

पाठलाग भाग 1

Gosht Nyayachi
नटलेली, सजलेली कावेरी आपल्या नवऱ्यासह दारात आली. 
"या घरात मुलगी द्यायला हिचा बाप तयार कसा झाला म्हणते मी?" कावेरीला पाहून आजूबाजूच्या बायका आपापसांत बोलू लागल्या. 

"कदाचित हिला माहीत नसेल यांचा इतिहास." एक बाई मोठ्या आवाजात म्हणाली.

"जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे म्हणा? आपण भलं नि आपलं काम भलं." असे म्हणत या साऱ्या बायका आत निघून गेल्या.

छानसा उखाणा घेऊन, कावेरी माप ओलांडून आत आली.

"या सुनबाई, आत या." नंदिनी बाईंनी आपल्या सुनेचे स्वागत केले.

"शारदे, काय म्हणत होत्या गं त्या बायका?" नंदिनी बाई हळू आवाजात आपल्या मुलीला म्हणाल्या.
"काही नाही गं, आपल्या दिवाकरचे चांगले झालेले त्यांना बघवत नाही." शारदा आपले डोळे मोठे करत म्हणाली.

"हम्म्म.. चला लक्ष्मीपूजन व्हायचे आहे अजून. सुनबाई आवरून घ्या लगेच." नंदिनी बाई पुढची तयारी करायला आत गेल्या.

काही वेळातच कावेरी आवरून बाहेर आली. तोपर्यंत गुरुजींनी पूजेची सारी तयारी केली होती. दिवाकर आणि कावेरी सर्वांना नमस्कार करून पाटावर बसले आणि पूजा सुरू झाली.
"चला यमुनाबाई, आपल्या यजमानांच्या हाताला हात लावा." गुरुजी म्हणाले आणि कावेरी कावरी- बावरी होऊन तशीच बसून राहिली.

"गुरुजी, अहो कावेरी नाव आहे वहिनींचं." शारदा पुढे होत म्हणाली.

"असं होय? माफ करा. नाही म्हटलं तरी त्या थेट यमुनाबाईंसारख्या दिसतात." गुरुजी गडबडीने म्हणाले आणि त्यांनी पूजा सुरू केली. 

पूजेची सांगता झाली, तसे गुरुजी म्हणाले, "देशमुखांच्या घराण्यात सत्यनारायण करण्याची प्रथा नाही, तर पती-पत्नी आपले वैवाहिक जीवन सुरू करू शकतात."
---------------------------

जेवणं झाली आणि शारदा आणि नंदिनी बाईंनी दिवाकरची खोली सजवली. 
"वहिनी, हा दुधाचा पेला घेऊन आत जा आणि काही अडचण आली तर आम्हाला हाक मार बरं." शारदा डोळा मारत कावेरीला म्हणाली.

"शारदे, आगाऊपणा नको हा." नंदिनी बाईंनी कावेरीला खोलीत पाठवले आणि दरवाजा बंद करून घेतला. नंदिनी आत येऊन पलंगाच्या कडेवर अवघडून बसली. 
"अशा अवघडून नका बसू. हे घर तुमचेच आहे." दिवाकरने तिच्या हातातला पेला घेऊन बाजूला ठेवून दिला आणि पलंगावरून उठून त्याने खिडक्या उघडल्या. 

"अजूनही तुम्ही तशाच? या इकडे." दिवाकरने कावेरीचा हात धरला. तशी ती बावरली.

"बसा बघू नीट आणि घाबरायला काय झाले इतके? तुमच्या इच्छेविरुद्ध इथे काहीही घडणार नाही." 
आपल्या नवऱ्याचे म्हणणे ऐकून कावेरीने लाजून मान खाली घातली. दिवाकर तिला कितीतरी वेळ नुसताच न्याहाळत राहिला. बोलके डोळे, चाफेकाळी नाक, अरुंद जिवणी पाहून त्याचे भान हरपले.
अंबाड्यात बांधलेले तिचे केस दिवाकरने सोडवले. तिचे हात हातात घेऊन तो म्हणाला, "यमुना, माझी यमुना..ये इकडे. अशी दूर का?" दिवाकर अचानक कावेरीच्या जवळ आला. कावेरी भेदरून त्याच्या मिठीत विसावली.

"यमुने, अगं अशी काय करतेस? एरवी माझ्या मिठीत विरघळून जाणारी तू..अशी घाबरून का गेलीस? तुझा प्रतिसाद मला खूप आनंद देतो, हे माहिती आहे ना तुला?" दिवाकर मंद आवाजात म्हणाला.

"मी.. कावेरी. यमुना नाही." कावेरी स्वतःला दिवाकरच्या मिठीतून सोडवून घेत म्हणाली.
तसा दिवाकर भानावर आला आणि त्याने बाजूला होत पलंगावर स्वतःला झोकून दिले.

अशा परिस्थितीत कावेरीला काय करावे हे कळेना.

"अहो." चुकले माझे. इकडे बघा." कावेरीच्या हाकेला दिवाकरने कोणताच प्रतिसाद दिला नाही.
तशी ती रडवेली झाली. आपले काय चुकले? हेच तिला कळेना. दिवाकरच्या बाजूला ती तशीच पडून राहिली.

\"या यमुना कोण? आणि आपल्यापासून सगळेच काहीतरी लपवू पाहत आहेत. मगाशी गुरुजींनी हेच नाव घेतले. नक्की भानगड आहे तरी काय?\" विचार करता करता कावेरीचा डोळा लागला.

क्रमशः

ही यमुना कोण? तिचा या वाड्याशी, इथल्या लोकांशी काय संबंध? तिचे नाव सगळे का लपवत आहेत? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा.