Login

पाठराखीण..

खंबीरपणे नवऱ्याच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या तिची कथा.
चॅम्पियन ट्रॉफी 2025

पाठराखीण

"मिरे! औंदा सोयाबीन गेली की बघ पाडव्याला डोरलं करू बघ." किसना हिरव्यागार रानाकडे बघत मीराला सांगत होता. वाऱ्यासोबत  डोलणार, डोळ्यात न मावणार सोयाबीनच पीक बघून मीराच  काळीज सुपाएवढं झालं. ती खुशीतच नवऱ्याला बोलली. "डोरल्याचा राहू द्या माय, ते काय उसावर बी करता येईन, पण ती संजाच्या अकॅडमीची फी भरून टाका बरं, पैसे आले की लगीच." "व्हय गं, खरंच बोलायला लागलीस बघ तू, पोराला लई याड लागलय भरतीच." किसना कौतुकाने बोलला.
"आव,त्याच्या वयाच्या दुसऱ्या पोरापरीस ते बरय की. संज्या पोलीस झाला की आपलं दिवसच बदलून जातील बघा."
मीरा बोलली. दोघे कितीतरी वेळ त्या हिरव्यागार रानाकडे बघून भविष्याचे स्वप्न रंगवत होते. आभाळ दाटून आलं तसं किसनाने गाडी जुंपली. अनं दोघं घराकडे निघाले.

दोघं गावात पोहोचतात न पोहोचतात तोच मोठ्या मोठ्या ढगगर्जना होऊन पाऊस पडायला लागला. मीराने पटकन घरात जाऊन चूल पेटवली अन स्वयंपाकाला लागली. रात्र चढता चढता पावसाचा जोर चांगलाच वाढला होता.
"लईच पाऊस पडायलाय ग." किसना मीरा कडे बघून बोलला, पण अनामिक भीती दाटून आली होती त्याच्या मनात.
"आव उघडलं की,सकाळच्याला, जाऊ द्या तुम्ही नका लय विचार करू झोपा आता." मीरा किसनाला धीर देत म्हणाली. किसना खाटेवर पडला पण त्याच्या काय डोळ्याला डोळा लागत नव्हता. खरंतर यावर्षी पाऊस तसा कमीच पडला. आणि जरा उशिराच पडला. शेतकऱ्यांनी कशातरी बिना भरोशी पेरण्या करून घेतल्या होत्या. पण नंतर चांगला पाऊस पडल्यामुळे पीक दणाणून आलं होतं. पण आता सप्टेंबर महिना, या दिवसांमध्ये इतका पाऊस पडणं नक्कीच चांगलं नव्हतं. घरकुल योजनेला तीनदा नाव देऊन सुद्धा घरकुल काय भेटलं नाही. जुनं घर पडायला आलं म्हणून गेल्या वर्षीच किस्नान नवीन रूम बांधली होती. तेव्हा पैसे कमी पडले म्हणून  मीराने तिच्या गळ्यातलं डोरलं मोडलं. आता यंदा चांगली सोयाबीन झाली की दोन वाट्या आणि चार का होईना पण मनी करायचे असं किसनाच्या मनाने घेतलं होतं. संजय आणि विजय दोघेही पोरं शिकायला बाहेर.त्यांच्याही शिक्षणाचा खर्च भागवायचा. कॉलेजला जाणाऱ्या संजयने पोलीस भरती करायची आहे, असं सांगितल्यामुळे ते अकॅडमीची फी भरणं पण गरजेचं होतं.
बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा जसा जसा जोर वाढत होता तसं तसं काळजीची जागा आता भीतीने घेतली होती. सकाळ झाली तरी अंधारून आलेलं होतं. धो धो पाऊस कोसळत होता. किस्नान चूळ भरली मीरानं त्याला चहाचा कप दिला.
दिवसभर दोघेपण पाऊस थांबायची वाट बघत होते. पण पावसाचा जोर वाढतच होता. चार वाजता किसनाच्या मोबाईलवर संजयचा म्हणजे त्याच्या मुलाचा फोन आला.
"आबा, अहो आपल्या नदीला लय पूर आलाय. वरून बंधाऱ्यातून पण पाणी सोडलय म्हण.तुम्ही काय रानात जाऊ नका."
"अर न्हाय बाबा, समदीकड निस्ता चिकुल झालाय तो रानात जाऊन काय करणार. तुम्ही कुठ बाहेर निघू नको पावसापाण्याचा."
संजय सोबत जुजबी बोलून  किसनाने फोन ठेवला. लाईट तर कालपासून गायब होती. त्यामुळे मोबाईल मध्ये चार्जिंग पण कमी होती. रात्र झाली तरी पावसाचा जोर काही कमी झाला नव्हता. आता मात्र किसनाच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं. मीरा त्याला धीर देत होती. दोघ असंच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले. डोळ्यातली झोप तर कधीच उडून गेली होती. सकाळी सकाळी गावात पाणी भरायला सुरुवात झाली होती. नदीला महापूर आलेला.  पोलीस,अग्निशामक दल गावामध्ये आलं होतं. प्रत्येकाला सुरक्षित दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची सोय केली होती. पाण्याची पातळी वरचेवर वाढत होती. गरजेपुरतं सामान घेऊन गुराढोरासहित लोकांना बाहेर काढल जाऊ लागलं.
सर्वांची सोय उंचावरच्या दुसऱ्या गावात धर्म शाळेवर केली होती. अनेक समाजसेवक येऊन अन्न कपडे अन गरजेपुरतं सामान देऊन जात होते.
पण किसनाच्या डोळ्यासमोर वाऱ्यावर डोलणार सोयाबीनच पीक येत होतं.
आठ दहा दिवसानंतर, पाऊस थांबून सर्व पाणी ओसरून गेलं तेव्हा सगळे पुन्हा आपल्या गावी परतले. घरादारांमध्ये पाणी जाऊन सामानच नुकसान झालं होतं. मीरा घरामध्ये जाऊन भिजलेला संसार सावरू लागली. अनं किसनाची पावलं पिलारीकडे वळली. अतिवृष्टीने  सगळं पीक जळून गेलं होतं. किसनाचा मन भरून आलं अवसान गेल्यासारख धपकन खाली बसला.
म्हणतात ना, बापासमोर  पोटच्या लेकाला अग्नी द्यायची वेळ येऊ नये, आणि शेतकऱ्यासमोर त्याचं पीक जळून जाऊ नये. हे दुःख पचवणं खूप अवघड असतं.
मिरेच डोरलं, संजयची अकॅडमी, खातबियाणे घ्यायला केलेली उसनवारी, सगळ्याची आकडेमोड डोळ्यासमोर यायला लागली.
' सरकारच्या तुटपुंज्य मदतीने काय होणार असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं' त्याच्या मनात विचार चमकून गेला. इतक्यात त्याच्या खांद्यावर हात पडला. मागं वळून बघितलं तर मीरा उभी होती.
"असा विचार बी चुकून मनात आणायचा नाही." मीरा किसना कडे बघत बोलली. किसनाने चमकून मीराकडे बघितलं. नकळत दोन थेंब डोळ्यातून गालावर ओघळलेच.
"जरा समोर बघा की." मीरा एक ठिकाणी बोट दाखवत किसनाला बोलली. किसनाने बघितलं, पावसात पडलेलं घरटं चिमणा-चिमणीने बांधायला घेतलं होतं. ते बघताना किसनाला त्याची चूक कळली. निसर्गाची आपत्ती कोणाला चुकलीय.
"या मुक्या पाखरांना बी जगण्याचं गणित कळलय बगा, अव समदं मोडून पडलं तरी पुना नव्याने उभ करू की, म्या हाय की सोबतीला तुमच्या." ती हसत बोलली.

किसनान मीराकडे बघितलं, जणू साक्षात त्याची पाठराखीण पुढे उभी होती. धीराने निष्ठेने तिच्या महादेवाला घोर तपश्चर्येने मिळवणारी ती ब्रह्मचारीनी सती आणि धीराने कठीण परिस्थितीमध्ये तिच्या महादेवाच्या पाठीशी उभी राहणारी किसनाची मीरा दोन्ही कुठेतरी सारख्याच आहेत बर का..

0