पाठीराखा भाग 3 अंतिम
मागील भागात आपण पाहिले की स्वातीचा घटस्फोट,शिक्षण आणि नोकरी सगळीकडे शांताराम तिच्या पाठीशी उभा होता. आता पाहूया पुढे.
" सुभद्रा राखीला मह्यारी न्हाय जाणार व्हय?" रखमाने लांबूनच हाक मारली.
" जाईल की उद्या जवळच तर हाय माझं माह्यार." सुभद्राने उत्तर दिले.
" कुणाला फशीवती, स्वाती यायची वाट बघत बसली ना?" रखमा खोचकपणे म्हणाली.
" वन्स वर्ष झालं घरी आल्या न्हाय. उद्या त्या येणार आन मी घरी नसल तर कस वाटल त्यांना?" सुभद्रा ठासून म्हणाली.
" तुला वाटतं का ती यील? आता कशाला फिरकल हीत. ती जाणार त्या सचिन सोबत लगीन करून." रखमा परत हळूच म्हणाली.
" रखमा,उगा काहीबाही बोलू नग. देवानं त्वांड दिलं तर चांगल बोलावं." सुभद्रा चिडली.
" समद गाव हेच बोलतंय. शांत्याला त्याची बहीण आता परत भेटायला येत नसती."
रखमा नथीचा आकडा उडवत म्हणाली.
रखमा नथीचा आकडा उडवत म्हणाली.
सुभद्रा नाही म्हंटले तरी बैचेन झाली. खरच स्वाती नाही आली तर? तिला हा विचारही सहन होत नव्हता. तिची दोन्ही मुले सकाळपासून आत्या कधी येणार असे विचारत होती. सुभद्राने दिवसभर वाट बघितली. शेवटची एस. टी. गेली आणि आज स्वाती येणार नाही हे स्पष्ट झाले.
" वन्स नोकरी आन पैका बघून बदलल्या अस्त्याल तर?" सुभद्रा सहज बोलून गेली.
" सुभे आपल काम आपण केलं. आता तिला यायचं असल तर यील ती."
शांताराम आपण शांत असल्याचे भासवत असला तरी तो खूप अस्वस्थ होता. दुसरा दिवस उगवला. घरोघरी रक्षाबंधन सुरू झाले. शहरातली बहीण पोस्टाने राखी पाठवून द्यायची. स्वाती मात्र मोठ्या प्रेमाने सण साजरा करत असे.
" सुभे,तू ये जाऊन माह्यारी. म्या थांबतो हीत." शांताराम म्हणाला.
" आव दादा येणार हाय सांच्याला. म्या आधीच निरोप दिला व्हता." सुभद्रा स्वयंपाक करत होती.
शांताराम सकाळासून दहा वेळा स्टँडवर जाऊन आला. स्वाती काही आली नव्हती. संध्याकाळी शेवटची सातची एस. टी. येऊन गेली.
"धनी,आता काय वन्स येत न्हाय. थोरल्या वन्सनी पाठवली ती राखी चिमणी बांधलं तुमच्या हातात."
सुभद्रा आपले मन घट्ट करत म्हणाली.
शेवटी शांताराम तयार झाला. बाहेर अंधार पडला होता. तसाच तो त्याच्या मनात देखील दाटून आला होता.
चिमणी ताट घेऊन आली. शांतारामने हात पुढे केला आणि आवाज आला.
" चिमणे,चिमणे लवकर बाहेर ये."
"स्वाती आत्या!"
चिमणी धावतच बाहेर गेली.
"स्वाती आत्या!"
चिमणी धावतच बाहेर गेली.
बाहेर घामाने भिजलेली स्वाती आणि तिच्यासोबत एक देखणा पोरगा होता.
" स्वाती एस. टी. कवाच गेली. कशी आलीस?" शांताराम म्हणाला.
" चालत आले."
स्वाती आत आली.
स्वाती आत आली.
तिच्या हातात दहा बारा पिशव्या होत्या.
" दादा हा सचिन. तूझ्या कानावर वर्षभर काहीबाही आले असेलच." स्वाती म्हणाली.
" स्वाती,तुझ्या आयुष्याचं भल व्हणार आसंल तर म्या कायम पाठीशी हाय."
शांताराम असे म्हणाला आणि. स्वाती त्याला मिठी मारून रडू लागली.
"दादा,आमच्या घरून लग्नाला परवानगी घेऊनच आलो आहे. मी स्वातीला सुखी ठेवीन शब्द देतो."
सचिन हात जोडून म्हणाला.
" सुभद्रा अग साखर ठेव देवा फूड."
शांताराम आनंदाने म्हणाला.
" वहिनी हे पेढे घे. देवापुढे ठेव आणि पोरांना दे. ही पिशवी घे. तुझे राखी बांधायचे बाकी आहे. दादा येत असतील ना?"
स्वातीने पिशवी हातात दिली.
त्यातील भारी लुगडे बघून सुभद्रा म्हणाली," वन्स येवढं भारी लुगड कशाला आणल?"
स्वाती तिच्याजवळ गेली.
" माझ्या शिक्षणासाठी गळ्यातली पोत दिलीस वहिनी. त्यापुढे हे काहीच नाही. पोत यावेळी नाही आणता आली. पण तुझ्या आवडत्या जोंधळ्याच्या कुड्या आणल्यात."
स्वातीने आणखी एक डबी हातात दिली.
" दादा हे तुझ्यासाठी. आणखी एक चिमणी आणि सुहास दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी आता माझी."
स्वाती डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली.
" स्वाती,पोरी आता लगीन ठरल नव्हं. आमचं आमी बघू. तू सुखी रहा." शांताराम म्हणाला.
" दादा माझ्या पाठीशी पाठीराखा म्हणून उभा राहिलास. आता तुझी पाठराखण करायची माझी पाळी. मी सचिनला आधीच सगळे सांगितले आहे. माझ्या पगारावर आधी ह्या घराचा हक्क असेल. तुला आणि वहिनीला सुखात ठेवायचं आहे मला. हीच आज माझी ओवाळणी असेल."
स्वाती असे म्हणताच सुभद्रा आणि शांताराम पुढे झाले. त्यांनी प्रेमाने स्वातीला जवळ घेतले.
आला राखीचा ग सण
वाट माह्याराची चाला.
काय सांगू ग बायांनो
काढा बंधूची आलाबाला.
बंधू माझा ग देखणा.
सर्जा मोठ्या ग मानाचा.
जसा जनीच्या पाठीला
हरी उभा पंढरीचा.
सुभद्रा एकेक ओवी गात होती आणि आनंदाश्रू वाहून एक सुंदर रक्षाबंधन साजरे होत होते.
©® प्रशांत कुंजीर.