गेली अनेक वर्ष तो सकाळी उठल्यावर तिला पाठमोरीच पाहत होता. आता असं झालं होतं की अनेक वर्ष पाठमोरी पाहून ती त्याला तशीच जास्त देखणी दिसू लागली होती. तिचा कमनीय बांधा, कमरेवर रूळत असलेली लांब केसांची एक वेणी. तिच्या शरीराची एका लयीत होणारी हालचाल खूप मनमोहक असायची. सकाळी लवकर उठून स्वतःचं आवरून ती किचनच्या ओट्यापाशी त्याच्यासाठी आणि घरातल्या इतर सर्वांसाठी गरमागरम पोळ्या बनवत असायची. पोळ्या करतानाची तिची हालचाल खरोखर लक्ष वेधून घ्यायची. तिचा तो पोळपाट लाटणं आणि तवा यांच्याशी समन्वय साधण्याचा प्रयत्न खूप कौतुकास्पद होता. अगदी सुंदर गोल वर्तुळाकार पातळ पोळी लाटून झाली की तवा तापलाय की नाही याचा अंदाज घेऊन पोळी तव्यावर टाकायची आणि काहीही उलथणं न घेता ती फिरवत फिरवत शेकवायची. मध्येच त्याच्यावर थोडंसं तेल लावायची. असं करत असताना पोळपाटावर तिची दुसरी पोळी लाटणं चालूच असायचं. तव्यावरची पहिली पोळी खाली उतरवली की अजिबात वेळ न दवडता दुसरी पोळी तव्यावर जायची. तीचं काळ काम वेगाचे गणित काही कधी चुकलंच नाही. अगदीच कधी तिची तब्येत खूपच बरी नसेल त्यावेळी ती हे काम करत नव्हती.
रोज सकाळी जवळजवळ चाळीस पोळ्या ती ज्या वेगाने बनवायची ते पाहून व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनी तिच्याकडून धडे गिरवावे असं वाटत होतं. मनात विचार येत होते कधीतरी कंटाळा येतच असेल तिलाही. कधी तिलाही वाटत असेल की अशी गरमागरम पोळी आपल्याला कोणीतरी द्यावी. त्याच्यासकट सगळेजण अशी गरम पोळी खाताना तिचं तोंड भरून कौतुक करत होते. परंतु कोणाला तरी असं कधी वाटलं का की इतका वेळ उभे राहून तिचे पाय दुखत असतील, गॅस जवळ उभं राहून तीला गरम होत असेल.
मंडळी तसं काही नाही. ती त्यांच्यातलीच एक होती ना.
सगळ्यांनी तिला परोपरीने सांगून झालं होतं की पोळ्यांसाठी बाई ठेवूया. बाहेरून पोळ्या विकत आणूया. पण छे! तिचं आपलं एकच. एवढ्या सकाळी कोण बाई येणार आणि विकतच्या पोळ्या गरम असताना चांगल्या लागतात नंतर त्या वातड होतात. आपल्यासारख्यांच्या कित्येकांच्या घरात अजूनही एखादी स्त्री अशी आहे म्हणूनच आज आपल्याला गरम पोळी मिळते. किती जणांना लहानपणापासून चहात पोळी खायची सवय असते. त्या सर्वांचे तिला रोज किती आशीर्वाद, कौतुकाचे बोल ऐकायला मिळत असतात. आज आपल्या अवतीभवती अनेक स्त्रिया अशाही आहेत की ज्या रोज सकाळी लवकर उठून चारशे पाचशे पोळ्या करून गरजूंना विकत असतात. त्यांनाही सगळ्यांचा दुवा मिळत असतोच.