"कशाला इतका उटारेटा करायचा? सरळ सरळ एकीकडे भाजी आणि दुसरीकडे भाकरी थापून मोकळं व्हायचं तर..कशाला या इडल्या अन डोश्याचा घाट घालत बसलीस.."
थोरल्या जाउबाई धाकल्या जावेवर खेकसत होत्या, धाकलीला मात्र हौसच भारी,
"ताई मी करेन सगळं.."
"हो तुलाच करावं लागेल, मी नाही रिकामी दोन-दोन तास शेगडीजवळ उभं राहायला.."
थोरलीने आवाज चढवला आणि निघून गेली. धाकलीने धास्तीच घेतली. थोरल्या जाउबाई म्हणजे अवघड प्रकरण दिसतंय..
धाकली लग्न करून नुकतीच सासरी आलेली. अंगात उत्साह, सासरच्या लोकांना खुश करण्यासाठी आटापिटा.. म्हणूनच आज सर्वांना माझ्या हातचे डोसे खाऊ घालेन असं तिने ठरवलं आणि कामाला लागली. एरवी थोरल्या जाउबाई मदत करत, अर्धा स्वयंपाक उरकत त्यामुळे फारसं काम नसायचं, पण आज त्यांनी हात काढून घेतल्याने सगळं धाकलीच्या अंगावर पडलं.
सात वाजले आणि सासूबाईंनी जेवायला मागितलं, त्यांच्या गोळ्या असल्याने त्या लवकर जेवत. धाकलीने तवा गरम करत ठेवला, एकामागून एक तीन डोसे सासूबाईंनी मटकवले. दहा मिनिटांनी पुतण्या ओम खायला मागू लागला, त्याला दोन डोसे लावले. आता सर्वजण आठला जेवायला बसतील तेव्हा पुन्हा टाकू म्हणत धाकलीने जरा बसून घेतलं. काही मिनिटांनी तिचे मिस्टर आले आणि वासाने त्यांची भूक चाळवली गेली. त्यांना परत गरम गरम डोसे टाकले. असं करत आठ वाजून गेले, थोरल्या जाउबाई आणि सासरे जेवायला बसले तसं त्यांना गरम गरम डोसे टाकत गेली. बराच वेळ हाच कार्यक्रम सुरू होता, शेवटी नऊ वाजता तिने तिच्यासाठी डोसे टाकले आणि जेवायला बसली. जाम भूक लागली होती, तोंडात एक घास टाकत नाही तोच थोरले दिर आले आणि जेवायला बसले.
धाकली हातातला घास खाली टाकणार तोच थोरल्या जाउबाईंनी आवाज चढवला.
"जेवताना कशाला उठतेस? मी टाकते डोसे.."
जाउबाईंनी नवऱ्याला वाढलं आणि धाकलीलाही गरमागरम करून वाढले. एकीकडे डोसे करत होत्या आणि दुसरीकडे ओटा आवरून घेत होत्या.
थोरल्या जाउबाई कठोर वाटत होत्या पण त्यांच्या कृतीतून एकेक गोष्टी उलगडत होत्या. धाकली बराच वेळपासून शेगडीजवळ असल्याने ती दमली आहे हे त्यांच्या नजरेतून सुटलं नव्हतं, म्हणून ओटा आवरायचं काम स्वतःकडे घेतलं.
जेवण झालं आणि धाकलीने भांडी घासायला घेतली,तसं त्या पुन्हा बरसल्या,
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा