परीक्षण (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
परीक्षण

रामा आणि गुंडप्पा लपून बघत होते ती व्यक्ती नक्की कोण आहे. ती व्यक्ती एका कक्षात गेली तसे ते दोघे त्याच्या मागून आत गेले.

‘सगळं चोरी करणार. सगळं घेऊन जाणार.’ तो स्वतःशीच बोलत एका मोठ्या पेटीत सगळं ठेवत होता.

अर्थात हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून योगिंद्र राव होता ज्याला चोरीचा आजार आहे.

“काय करताय महोदय?” रामाने विचारलं.

“चोरी.” तो बोलून गेला.

“काय?” रामाने विचारलं.

“झोपेची चोरी करतोय पण झोप येतच नाहीये.” तो सावरून घेत म्हणाला.

रामाने गुंडप्पाला काढा द्यायला सांगितले आणि तो हळूच त्या पेटी जवळ गेला. त्या पेटीत महालातून चोरलेल्या फुलदाण्या, अत्तर कुपी, शोभेचा हत्ती आणि बरेच सामान होते.

“हे सर्व काय आहे महोदय?” रामाने विचारलं.

“माफ करा. मला माहित आहे हे मी चोरालं आहे पण माझी तशी इच्छा नव्हती. माझ्या डोळ्यांना जे दिसतं ते चोरण्याची इच्छा होते आणि हे आपोआप घडतं. माझा हा आजारच असा आहे की काहीच करता येत नाहीये. यासाठी मी खूप उपाय केले आहेत पण काही फरकच पडत नाहीये. खरंच मला माफ करा.” तो अपराधीपणे म्हणाला.

“ठीक आहे महोदय पण कार्यक्रम होईपर्यंत जरा स्वतःवर ताबा ठेवा. हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे. तो विघ्नहर्ता सर्वकाही नीट करेल. तुम्ही सतत त्या गणरायाचे नामस्मरण करत रहा म्हणजे काही होणार नाही आणि चोरायचे असेल तर तुमच्या सुरांनी सगळ्या प्रेक्षकांची ह्रदये चोरा. एका कलाकाराला त्यापेक्षा मोठे काय मिळणार? या सर्व वस्तूंमध्ये काय ठेवले आहे?” रामा म्हणाला.

“धन्यवाद महोदय.” तो रामाचा हात हातात घेत म्हणाला पण रामाने स्वतःच्या हातातील कडे कसेबसे सांभाळले आणि ते दोघे त्याचा निरोप घेऊन बाहेर आले.

“लामा हा चोली कालू शकतो हा.” गुंडप्पा म्हणाला.

“अरे नाही गुंडप्पे! हा फक्त लहानसहान गोष्टी चोरतो तेही त्याच्या आजारामुळे. याची एवढी मजल नाही की हा चंद्रमणी चोरेल.” रामा म्हणाला.

इथे आचार्य त्या विदेशी गायिका क्लाराच्या कक्षात होता. त्याने तिचे कानातले तिला परत केले.

“ओ थँक्यू हे तुमच्याकडे होते. तुम्ही हे द्यायला इथे आली?” ती म्हणाली.

“तसे तर आम्ही इथे आलो पण तुम्हाला आली आवडत असेल तर हो हे द्यायला आली.” आचार्य म्हणाला.

तिने हात पुढे करून त्याचे आभार मानले आणि आचार्यने देखील लगेच तिला हात मिळवला.

इतक्यात तिला तिथे झुरळ दिसले आणि ती ओरडू लागली.

“कॉक्रोच.” ती किंचाळली.

आचार्यला न समजल्याने त्याने ती बोट दाखवत होती तिथे पाहिले आणि तोही घाबरून उड्या मारू लागला.

दुसरीकडे कोतवाल, धनी आणि मणी चालले होते. कोतवाल काहीतरी सांगत होता पण त्याच्या लक्षात आले आचार्य तिथे नाहीये. त्याला शोधत शोधत ते त्या विदेशी बाईच्या कक्षात आले.

“काय झालं गुरुजी?” मणीने विचारलं.

“मु… मू….” आचार्य अडखळत बोलत होता.

“काय गुरुजी?” धनी ने विचारलं.

“मुर्खांनो! झुरळ! हाकला त्याला.” तो म्हणाला.

ते झुरळ पाहून हे तिघेही घाबरले. ते झुरळ आचार्यच्या धोतरात शिरले. त्याने कसेबसे ते झटकून बाहेर काढले आणि ते झुरळ बाहेर गेले. तो उड्या मारता मारता पलंगावर चढला होता तो खाली उतरला आणि तिलाही अगदी हात देऊन खाली उतरवले.

“तुम्हाला अश्या कोणत्या किड्याने पुन्हा त्रास दिला तर आमची आठवण काढा. आम्ही येऊ तुमच्या रक्षणासाठी. रक्ताचे पाट वाहतील इथे. ते झुरळ जसे घाबरून पळून गेले तसेच सगळ्यांना घालवू.” आचार्य म्हणाला.

“आम्हाला घाबरून पळाले.” धनी म्हणाला.

“आम्हाला.” आचार्य म्हणाला.

“हो हो आमच्या गुरुजींना. ते एवढेसे फडतूस झुरळ घाबरून पळाले.” धनी म्हणाला.

“जरा जास्तच झालंय नंतर बघतो.” तो त्याच्याकडे रागाने बघत म्हणाला.

“थँक्यू. तुम्ही खूप चांगले आहात टाटाचार्य!” ती म्हणाली.

“तथाचार्य!” त्याने त्याचे नीट नाव तिला सांगितले.

तरीही तिला ते बोलता येईना.

“काही हरकत नाही तुमच्या मधुर वाणीत टाटाचार्य सुद्धा ऐकायला वाईट वाटत नाहीये.” तो म्हणाला.

“तुम्ही माझे एक काम कराल प्लीज?” तिने विचारलं.

“काय काम आहे? आज्ञा असावी.” तो म्हणाला.

तिने त्याला जवळ बोलावले आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितले.

“तुमची पादुका आम्ही कुठून आणणार?” तो म्हणाला.

“पादुका नाही. माय शु!” ती म्हणाली.

“अच्छा माय शु.” आचार्य म्हणाला.

“माझ्या एक शु लॉस्ट झालाय. दॅट इज लकी वन. प्लीज आणून द्या.” ती एक पाय दाखवत म्हणाली.

“अच्छा तुमच्या एका पायातील बूट हरवला आहे? आम्ही देतो आणून. समजा आणलाच.” आचार्य म्हणाला.

“कोणाला समजायला नको म्हणून तुम्हाला कानात सांगितले पण तुम्ही सर्व पब्लिक केले.” ती म्हणाली.

“अरे यांचं सोडा. हे लोक तेच बघतात जे मी दाखवतो आणि तेच ऐकतात जे माझी इच्छा असेल.” आचार्य म्हणाला.

ती त्याला पुन्हा थँक्यू म्हणाली.

“चला आचार्य! उशीर होतोय.” कोतवाल म्हणाला आणि ते सर्वजण बाहेर पडले. त्यांना बाहेर पडताना रामा आणि गुंडप्पाने पाहिले. ते लोक जाईपर्यंत ते दोघे आडोश्याला लपले होते आणि तिथून गेल्यावर त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते.

‘आचार्य आत्ता यावेळी तेही त्यांच्या सगळ्या भ्रष्ट मंडळींसोबत?’ रामा स्वतःशीच म्हणाला.

“लामा आत्ता आचाल्य का आले असतील?” गुंडप्पाने विचारलं.

“मीही तोच विचार करतोय.” रामा म्हणाला.

इतक्यात मागून क्लारा आली.

“हे हँडसम! मला भेटायला आलास ना?” तिने विचारलं.

“हो देवी.” रामा म्हणाला.

“आत ये.” ती म्हणाली.

दोघे तिच्या मागून आत गेले.

“तुम्हाला हा काढा द्यायला आलो आहे आणि इथे काही त्रास नाही ना? काही कमीजास्त नाही ना? हेही विचारायला आलो होतो.” रामा म्हणाला.

गुंडप्पाने तिच्यासाठी काढा दिला आणि ती बोलू लागली; “एक दोन चोटी मोटी प्रॉब्लेम आहे.”

“काय देवी?” रामाने विचारलं.

“इथले फूड स्पायसी आहे.” ती म्हणाली.

रामाला ते न कळल्याने त्याने काय म्हणून विचारले.

“स्पायसी. तिखट.” ती म्हणाली.

“अच्छा. अजून?” त्याने विचारलं.

“कर्टन माझ्या नाईट ड्रेस सोबत मॅच होत नाही अँड मिरर क्लीन नाहीये. बस हेच दोन तीन प्रॉब्लेम आहेत.” ती म्हणाली.

“ठीक आहे देवी आपण तुमचा कक्षच बदलू.” रामा म्हणाला.

“नाइस आयडिया. जस्ट रीमेंबर विंडो ईस्ट साईडला अँड डोअर वेस्टला पाहिजे.” ती म्हणाली.

“पाहिजे हा गुंडप्पे. लक्षात ठेव.” रामा म्हणाला.

“समजलं ना?” तिने विचारलं.

तो हो हो करत बाहेर पडला.

“काय वाटतंय रामा ही चोरी करेल का?” बंधूने विचारलं.

“अजिबात वाटत नाहीये बंधू. हिला स्वतःतून वेळ मिळेल तेव्हा ही चोरीचा विचार करेल ना.” रामा म्हणाला.

“लामा मला नाही वाटत ही चोली कलेल.” गुंडप्पा म्हणाला.

“अरे व्वा गुंडप्पे! तुझंही डोकं चालायला लागलं की. चल आता आधी सोमनाथच्या कक्षात जाऊ.” रामा म्हणाला.

ते दोघे तिथे गेले. एका खुर्चीत सोमनाथ आणि त्याच्यासमोर रामा आणि गुंडप्पा बसले होते.

“आता कसं वाटतंय तुम्हाला?” रामाने विचारलं.

“कसं वाटणार? जी माया, जी झोप उघड्या आकाशाखाली आणि जमिनीवर लागते त्याची सर या राजेशाही पलंगाला काय? पण असो! थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे. एकदा मी ही प्रतियोगिता जिंकलो की सगळ्या गरिबांचे कल्याण करीन.” तो म्हणाला.

“छान छान. हे घ्या आम्ही तुमच्यासाठी काढा घेऊन आलोय. हा काढा प्या म्हणजे तुम्हाला बरे वाटेल.” रामा म्हणाला.

गुंडप्पाने लगेच पेल्यात तो काढला. त्याने काढा घेतला आणि दोघे तिथून निघाले.

“एक मिनिट थांबा.” त्याने मागून हाक मारली.

रामा आणि गुंडप्पा तिथेच थांबले.

“हे घ्या हे माझे नाही. कदाचित बाहेरच्या कोणाचीतरी असेल.” तो रामाच्या हातात एक अंगठी देत म्हणाला.

“अले लामा ही तुदी लग्नातली अंगती आहे ना.” गुंडप्पा म्हणाला.

“हो ही माझीच आहे.” रामा म्हणाला आणि त्याने ती बोटात घातली. त्याला धन्यवाद देऊन ते दोघे बाहेर पडले.

“लामा काय तुला लग्नातली अंगति सांबालता येत नाही?” गुंडप्पाने विचारलं.

“अरे मी ती मुद्दाम तिथे ठेवली होती. सोमनाथ गरीब आहे पण त्याला फक्त श्रीमंतांचा राग आहे. मला वाटत नाही हा चोरी करेल.” रामा म्हणाला.

“लामा पण आचाल्य एवल्या लातली का आले असतील?” गुंडप्पाने पुन्हा विचारलं.

“तेच तर कळत नाहीये गुंडप्पे. शोधावं लागेल. आधी राहिलेलं काम करू चल.” रामा म्हणाला.

इथे दुसरीकडे आचार्य आणि बाकी मंडळी महालात फिरत होते.

“आचार्य! आता काय करायचं?” कोतवालने विचारलं.

“तिचा बूट शोधायचा.” आचार्य म्हणाला.

“गुरुजी विसरलात ना? त्या सुंदरीने काय जादू केली आहे काय माहित! आपण इथे चंद्रमणी चोरी करण्यासाठी योजना तयार करायला आलोय ना.” मणी म्हणाला.

आचार्यच्या डोक्यात तर आता ती क्लारा घर करून होती. तर इथे दुसरीकडे रामाला देखील तोच प्रश्न होता. ते दोघे आता पाचव्या आणि शेवटच्या अतिथीच्या कक्षात म्हणजेच रूपा देवीच्या कक्षात गेले.

ती खिडकी जवळ उभी होती आणि खिडकीत एक माकड आले होते त्याला खायला देत होती. ते माकड गेल्यावर ती मागे वळली.

“तुम्हाला प्राणी आवडतात वाटतं.” रामा म्हणाला.

“आम्हाला सगळेच जीवजंतू आवडतात.” ती म्हणाली.

“मग माणसे आवडत नाहीत का?” रामाने विचारलं.

“माणसे कधी आणि केव्हा सरड्यासारखे रंग बदलतील, कधी विंचवासारखे दंश करतील याची शाश्वती नसते.” ती म्हणाली.

“बरोबर आहे तुमचे देवी.” रामा म्हणाला.

“तुम्ही ज्ञानी आहात त्यामुळे फक्त मला दाखवायला तुम्ही सहमत होणार नाही.” ती म्हणाली.

“बरोबर आहे देवी. माणसापेक्षा प्राणीच चांगले. निदान त्यांचे स्वरूप बघून त्यांची तीव्रता आपल्याला माहीत असते.” रामा म्हणाला.

“खरंच तुम्ही विद्वान आणि ज्ञानी पंडित आहात.” ती म्हणाली.

“धन्यवाद.” रामा म्हणाला.

“बरं यावेळी कसे येणे केले?” तिने विचारलं.

“आज सगळ्या पाहुण्यांचा इथे महालात पहिलाच दिवस आहे म्हणून स्वतः विचारायला आलोय कोणाला काही हवे नको ते आणि हा काढा पण आणला आहे. हा प्या बरे वाटेल.” रामा म्हणाला.

गुंडप्पाने तिला लगेच काढा दिला.

“चला आता येतो. काही हवे असल्यास निःसंकोचपणे सांगा.” तो म्हणाला आणि ते दोघे बाहेर आले.

“तुला काय वाटतंय रामा ही इतकी सुंदर मुलगी चंद्रमणी चोरी करेल का?” बंधूने विचारलं.

“मला तर दाट संशय हिच्यावरच आहे बंधू. मला नेहमी वाटतं ही बोलते एक आणि हिच्या मनात काहीतरी वेगळं असतं. ती बोलताना कधीच नजरेला नजर मिळवून बोलत नाही आणि असे तेच लोक करतात ज्याच्या मनात एक आणि ओठात एक असते.” रामा म्हणाला.

“तू जरा जास्तच विचार करतोयस रामा. इतकी सुंदर आणि नारी आहे ती.” रामा म्हणाला.

“नारी शक्तीला कमी लेखू नकोस बंधू. ही अशी माणसे असतात जी बोलतात एक आणि करतात एक तीच धोकादायक असतात. त्यात हिचं नाव देखील रूपा देवी आहे.” रामा म्हणाला.

“लामा कोणाशी बोलतोय? हे बंधू कोण?” गुंडप्पाने विचारलं.

“कोणाशी नाही स्वतःशीच.” रामा म्हणाला.

“तुला वेल लागलं आहे.” तो म्हणाला.

“अच्छा ठीक आहे चल आता जाऊया.” रामा म्हणाला.

क्रमशः….

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all