Login

पातळ भाजी भाग 1

Patal Bhaji
पातळ भाजी
भाग 1

रोहित नाराज होता ,आजही त्याच्या मनासारखी भाजी नाही हे पाहून जेवणाच्या ताटाकडे बघून म्हणाला...
"आई काय हे ग रोज ,तुला माहीत आहे मला पातळ भाजी हवी असते.."

आई सुनेकडे बघत म्हणाली ,"म्हणाले होते ना मी तुला..."

"दादा काय हे अरे तुझी बायको का मुद्दाम करते हे.." रोहित

सगळे आता तिच्या कडे बघू लागले ,रागात आणि ती शांत चोरून उभी होती..तिला टेन्शन आले होते..नवीन सून असल्याने घरातील पद्धती सावरून घेता घेता पुरती धांदल उडाली होती..

नाही धांदल उडवली होती ,तिला समजून घेणे तर दूरच पण जो तो फक्त तिची परीक्षा बघत होता..

चूक होण्याची वाट बघत होता...चूक होताच तिला जणू आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून सूनवत होता..

"तुला हळूहळू जमेल म्हणत म्हणत आता दीड महिना होऊन गेलाय प्राची ,आता कधी सुधारणार तुझी माहेरची पद्धत..." नवरा ही बोलून गेला

ती काही बाजू मांडणार इतक्यात कॉलेजमध्ये जाणारी ननंद ही पुढे आली

"वहिनी घे ना समजून आपल्या घरातील चाली रिती ,पद्धती आणि स्वयंपाक..."

"तिला खूप वेळ लागणार असेल तर तुम्ही माय लेकी मदत करत जा जरा..." सासरे म्हणाले

"तुम्ही बोलला नाहीत तरी चालेल,अश्याने ती लाडात यायची..." सासू म्हणाली

सुनेला आज कळले की ह्या घरात थोडी फार जे कोणी बाजू घेऊन बोलू शकतात ते फक्त सासरे आहेत ,पण त्यांची ही काही चलती नाही.

तिने सगळे पाहिले होते एक दीड महिन्यात..नवरा बाजू घेतो पण एकांतात..बाकी सगळे जसे बोलतील तसा तो ही सगळ्यांना साथ देऊन बोलतो.. आपलाच म्हणवणारा आपली टीच भर ही बाजू संभाळत नाही..

"चला आता उचला ह्या कोरड्या कोरड्या भाज्या..आणि त्या रोट्या सारख्या चपात्या... कुठे ही सालस पणा नाही दिसला ,जरा ही स्वयंपाक नाही शिकल्या...आणि काय तर ती उत्तम गृहिणी होऊ शकते आमची लेक..." सासू लेकाला हिनवून म्हणाली

प्राची आत उभी होती ,पडलेले सगळे भांडे घासत सगळे ऐकत होती...तिने हे बोलणे ऐकले आणि तिचे हात गळाले... हात थरथर कापत होते.. पोटात गोळा आला...

शेवटी परके घरच हे...सासरी सुख दुर्लभ म्हणत होती आई तेव्हा समजले नाही ,ना तिला सजून घेतले होते..कोणी आपले नसते...सगळे एकी करून असतात...स्वतःचे ते गुणगाण करत..पण सून किती ही गुणाची असली तरी तिला सुखाने जगू द्यायचे नाही जणू ठरवलेले असते

"झाले असतील भांडे तर जरा दळण करायला घे..आणि तांदूळ ही निवड... मी पडते जरा खूप दमले आहे आज.." सासू

"हो आई करते सगळे पण मी थोडा आराम करूनच हे करेन म्हणते.."

"म्हणते वगैरे काही नाही, संध्याकाळी हळदी कुंकू आहे बायका येतील ,मग परत तुझी पळापळ होईल...ते ही सगळे तुलाच करायचे आहे..." सासू खमकावून म्हणाली

तिला आता खूप थकवा लागला होता ,पाय गळून गेले होते मन ही उदास होते..डोळ्या समोर अंधेरी येत होती...ह्या घरात आपली किंमत फक्त कामवाली अशी असेल हे वाटलं नव्हतं...प्रणाली तिची मैत्रीण ,ती सासरी नांदायला गेली तेव्हा ती म्हणत सासरी तिला उठता बसता नवीन काम लावले जाते...आणि त्यात नाही ही म्हणता येत नाही..आरामाची सोय नाही...आपल्या खोलती पडू जाऊन म्हंटले की सासू ननंद दोघी ही मुद्दाम तिच्या खोलीत जाऊन पडत...तिच्या माहेर कडून जो ac ,मोठा बेड दिला तो त्यांना खूप आवडतं..कारण त्यांच्या रूम मध्ये हे असे आराम दायक काही ही नव्हते..

तेव्हा प्राची म्हणतं, मी असते तर दोघींना सरळ म्हणाले असते उठा तुमच्या बेड मध्ये जा...

प्रणाली म्हणत कळेल तुला ही कळेल...मग मला ही म्हणशील सासरी सुख नसते...

आणि आज तेच तिच्यासोबत होत होते पण एक शब्द ही ती बोलून दाखवत नव्हती...आई आई असते आणि आज कळते सासू सासुच...

आपल्याला अति काम पडत असेल तेव्हा आई म्हणत जा जरा वेळ आराम कर ,करते मी बाकीचे काम...पण सासू नाही म्हणाली कधी असे ,चुकून ही नाही...हो हे शब्द बोलल्या होत्या पण मला उद्देशून नाही तर त्यांच्या मुलीला खूप काम पडले होते तेव्हा...पण त्या नंतर त्या प्राचीला येऊन म्हणाल्या...इथून पुढे माझ्या मुलीला सासरी जाईपर्यंत तू किंवा कोणी काही काम लावायचे नाही...तुझे घर आहे हे, तर तूच सगळा पुढाकार घ्यायला हवा..! तू सगळा भार घेशील अशी अपेक्षा आहे हो..

"मी तेव्हा कशी धाकड होते ,कोणाचे काही ऐकून घेत नव्हते, कोणाच्या ही धाकाला जुमानत नव्हते..आणि आज मीच धाकात हळूहळू मुरत आहे..." स्वतःलाच बोलली

सासू आणि ननंद लगेच तिच्या पुढे तिळाचे ताट ठेवून निघून गेल्या..

ती बघतच होती

ती लगेच काही बोलणार इतक्यात ,ननंद तोऱ्यात आली म्हणाली ,"तीळ निवडून ठेवा वहिनी ,आम्ही जरा पार्लर मध्ये जाऊन येतो..."


ती तिचा ही धाक अंगीकार होती जणू...तसे ती लगेच हो म्हणाली..

"तिला सांग तू ही आवरून घे ,मग वेळ मिळणार नाही.." सासूने लेकीला सांगितले

"वहिनी तुम्ही ही आवरून घ्या...परत तुम्ही नेहमीची कारण नका सांगू वेळ मिळाला नाही म्हणून...उगाच लोकांना वाटायचे नवीन सुनेकडून सगळे काम करून घेतले की काय दिवसभर.."


ती लगेच म्हणाली , "मी हे सगळे आवरले आहे तर मी ही येऊ का तुमच्या सोबत ताई ?"


"अहो तुम्हाला काय गरज आहे,तश्याच खूप सुंदर तर आहात... आणि हो मी आणि आई आमच्या मेकप चे पैसे भरू शकते, तुमचे कोण भरणार..? ननंद


तिला आता तर हे ऐकून मेल्या हून मेल्या सारखे झाले होते...इतके दिवस आपण ह्या घरासाठी सगळे पैसे उडवत बसलो ,ते बाबांनी दिलेले पैसे ही घरात लागले तसे देऊन मोकळे झालो ,तेव्हा कसलाच हिशोब नाही ठेवला...

"तिला म्हणायचे होते आवरून घे म्हणजे तुझे आवरून घे असे नव्हते माझे म्हणणे...घर दार अंगण आवरून घे असे होते...तू ही मुर्खच निघालीस..." सासू लेकीला म्हणाली

प्राची आईच्या आठवणीत आता एकटीच स्वयंपाक घरात उभी राहून रडत होती...आठवले आई कितीदा म्हणायची तू छान दिसलीस की मला छान वाटते...तू छान दिसलीस की मला समाधान वाटते...थकलेली दिसली तर मन तुटते..जर सासरी असे झाले तर मला खूप दुःख होईल...शक्यतो मला सांगत जा तुझे दुःख..मन हलके होईल...मार्ग नसला तरी उभारी येईल.

"आई तू हवी होतीस ग, का लग्न करून द्यायची घाई केलीस ग.."

इतक्यात भाजत ठेवलेले तीळ जळाले होते..आता काय होईल...रडण्याचा नादात हे काय होऊन बसले तिच्या कडून..