पत्रलेखन
प्रिय नवरोबाराव,
नाकावरच्या रागाला औषध काय
गालांवरच्या फुग्यांचे म्हणणे तरी काय....
किती ती चिडचिड अन किती तो त्रागा.. ओळखू आलं सगळं काल video call वर. सोबत या म्हटलं तर नाही, माझं ऐकायचच नाही अशी शपथ घेतली होती जणू सप्तपदीवेळी.
खरच तुझ्यापासून दूर राहायची सवयच नाही. (एकेरीच बोलणार मी. मनातली इच्छा इथे नाही पूर्ण करायची तर कुठे???)
किती पटापट दिवस जातात ना. दिवस काय इथे तर वर्षं कशी गेली ते नाही कळलं. अस वाटतं की कालच लग्न झालं आपलं, अन माप ओलांडून मी या घरात आले. अनोळखी, परक परक वाटणार घर कधी माझं, आपलस झालं मलासुद्धा नाही कळलं. प्रत्येक वेळी तू दिलेली साथ मोलाची होती ,अजूनही आहेच.
मी नोकरी करेन म्हटलं तेव्हा घरात जणू बंड पुकरल्यासारखच वातावरण झालं होतं. पण तू पाठीशी उभा राहिलास अन सगळं जुळून आलं बघ. आयुष्यात कितीतरी चढ उतार आले पण तुझ्यामुळे ते अगदी सहज पार झाले. हसणं, रडणं, रुसणं-फुगणं, मनवण यात ही 32 वर्षं कशी गेली ते समजलच नाही.
आपल्याला मुलं झाली, अन तुझ्यातल्या या बापावर मी पुन्हा नव्याने प्रेम करू लागले. तुला आठवतं चिनू लहान होती अगदी छोटं बाळ त्यावेळेला ती रडायला लागली की तू तिला पटकन उचलून घ्यायचास, तिचं रडणं नाही थांबलं तुझ्याकडून तर देवाशी किती भांडायचास ," बाळ लहानाच मोठं करणं जस आई वडील दोघांच कर्तव्य मग दूध पाजायला आईच का?" खरच तुझं हे निरागस रूप पाहुन डोळे अन मन भरून यायचं. बाळांना न्हाऊ-माखू घालणं, शी-शू चे कपडे बदलणं, खाऊ-पिऊ घालणं या सगळ्या गोष्टींमध्ये तू आवडीने भाग घायचास. मुलांबरोबर आपणही पुन्हा लहान झालो अन त्यांच्यासोबत वाढता वाढता कधी म्हातारे झालो ते पण नाही कळलं. तू सोबत नाहीस इथे पण तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण आठवत राहतो.
खरचं देवाचे मानावे तेवढे आभार कमीच, तुला माझ्या आयुष्यात नवरा म्हणून पाठवल्या बद्दल. मनातल्या सगळ्या गोष्टी किती सहज मी share करू शकते तुझ्यासोबत. माझी चिडचिड, राग सगळं कसं सहन करतोस एवढया वर्षांपासून.नवरा बायकोच्या नात्यापेक्षा हे निखळ मैत्रीच नात खरच खूप सुखावून जातं.
बाकी इकडे सगळं मस्त आहे. आपल्या चिनूची पोर खरंच खूपच गोड आहे. म्हणतात ना की दुधापेक्षा त्यावरच्या सायीवरच जास्त जीव असतो तसच झालंय बघ माझं तर. चिनू पण आठवण काढतेय तुझी. तिच्यासाठी तरी ये एकदा.
32 वर्ष झाली लग्नाला अन तब्बल दोन महिने झाले तुला न भेटून. चल म्हटलं सोबत USA ला तर नाही. अरे आपल्याच लेकीचं बाळंतपण. काय तर म्हणे की एवढ लाखाच तिकीट काढेपर्यंत तेवढे पैसे बाळाच्या नावे गुंतवणार. कितीबरे दुसऱ्याचा विचार करायचा. अजूनही तसाच आहेस तू. 32 वर्षांपूर्वी होता अगदी तसाच. सतत मन मारून जगणारा.
ते काही नाही , तू येणार आहेस म्हणजे येणारच आहेस.
तुला आठवतं लग्न झाल्यावर आपण फिरायला जाणार होतो. मग तू म्हणाला होतास की जॉब नवीन आहे आता सुट्या नाही मिळणार ,आपण नंतर जाऊ. नंतर मग माझी नवीन नोकरी, मग घर घेतलं तर त्याच कर्ज, नंतर तर बाळ झालं . मग चिनू मोठी झाल्यावर जाऊ म्हणालास. मग निकू झाला. पुन्हा मग चिनू-निकूच्या शाळा , कॉलेज, ट्युशन, परीक्षा, सहली.. आपल्याला वेळच नाही. मग चिनूच लग्न, तुझी रिटायरमेंट मग माझी रिटायरमेंट. मग निकुच लग्न. फिरणं मागेच राहून गेलं. दुःख नाही त्याचं. पण मनातली इच्छा होती कधीतरीची.
म्हणूनच म्हणतेय आता तरी ये. मग आपण जाताना सोबत जाऊ विमानाने वापस.
मनसोक्त फिरायचय तुझ्यासोबत, नातीसोबत खेळायचं आहे, इकडे बर्फ पडतो( हो स्नो फॉल म्हणतात त्याला माहितीये मला) तुझा हात हातात घेऊन तो पाहायचा आहे एकदा, कोण्या एकेकाळी धो-धो पडणारा पाऊस पहिला होता .
सोबत तुझं तिकीट सुद्धा mail केलं आहे. त्यामुळं चुपचाप बॅग भर अन निघून ये. नेहमीप्रमाणेच पत्राच उत्तर देणार नाहीस हे माहिती आहे. वाट पाहतेय तुझी.
कळावे, लोभ असावा.
तुझीच
बायको
ता. क. : स्वयंपाकवाल्या नलूबाईंशी का भांडला होतास? हो मीच फोन केला होता त्यांना. किती वर्षांपासून आहेत त्या आपल्याकडे. मी काही त्यांना कामावरून काढणार नाही. तुला जे खायच असेल ते त्यांना सांगत जा त्या बनवून देतील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा