Login

पावसाचे आणि प्रेमाचे मिलन

प्रेम खरं असेल तर ते उशिरा का होईना पण मिळतच
पावसाचे आणि प्रेमाचे मिलन.

"आई ऽऽऽ मी येते गं... मला शाळेत जायला उशीर होतोय." अन्वी म्हणाली आणि तिच्या आईचं काही ऐकून घ्यायच्या आधीच ती पटपट घराबाहेर पण गेली. ती शाळेत शिक्षिका होती.

शाळेत आल्या आल्या ती अद्वैत सरांना म्हणजेच तिच्या मित्राला शोधत होती.त्यांची मैत्री हळूहळू आता प्रेमात बदलू पाहत होती, पण एकही पुढाकार घेत नव्हते. अद्वैत सर तिला प्रयोगशाळेत दिसले मग ती लगेच तिकडे गेली.

"अद्वैत सर, पुन्हा प्रयोगशाळेत पाणी सांडलंय ना?"
अन्वी म्हणाली आणि हात कमरेवर ठेवून त्याच्याकडे बघू लागली.

"हो ना... आज परत माझ्याकडून पाणी सांडले, माझ्या पटकन लक्षातच आलं नाही." अद्वैतने हसत उत्तर दिले.

"असंही कोणत्या गोष्टी तुमच्या लवकर लक्षात येतात." अन्वी नाराज होऊन म्हणाली.

"तसं तर बरंच काही लक्षात येतंय, पण फक्त सांगायची वेळ कधी येतेय ते बघतोय." अद्वैत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तसं अन्वीचा चेहरा लाजून गुलाबी झाला आणि तिने विषय बदलला.

"असं गोड बोलून सांडलेलं पाणी साफ होणार नाही सर, ते आपल्यालाच साफ करायला लागणार आहे." असे बोलून ती खाली वाकली आणि टेबलवर सांडलेलं पाणी पुसायला लागली. अद्वैत शांतपणे तिच्याकडे पाहत होता. बाहेर ढग जमले होते, पावसाचा मंद सुगंध हवेत भरत होता.

"तुम्हाला पाऊस आवडतो का?" अद्वैतने तिला विचारलं.

"खूप आवडतो! पावसाचा प्रत्येक थेंब म्हणजे एक नवं गीत वाटतं मला." अन्वी हसत म्हणाली.

"मग आज गाणं ऐकायचं का?" अद्वैत म्हणाला आणि त्याने खिडकी उघडली, आणि पावसाचे थेंब आत आले. दोघं काही क्षण शांत बसले. त्यानंतर अन्वीच बोलू लागली.

"गावातल्या या शाळेत इतकी शांतता आहे की, माणूस त्या शांततेच्या प्रेमात पडतो." अन्वी म्हणाली. त्यावर अद्वैत हसला.

"कदाचित म्हणूनच मी इथे आलोय." अद्वैत हसतच म्हणाला. त्यानंतर दोघंही थोडा वेळ शांतपणे बाहेरचा पाऊस बघत मस्त मोबाईल वर गाणं ऐकत होते. त्यानंतर दोघंही आपापल्या वर्गात मुलांना शिकवायला गेले.

अन्वीला अद्वैत खुप आवडत होता पण त्याच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा काही ठावठिकाणा तिला लागत नव्हता.

एक दिवस दोघेही शाळा सुटल्यावर रस्त्याने चालत होते. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मग दोघंही एकाच झाडाखाली थांबले.

"तुम्हाला थंडी वाजतेय का?" अद्वैतने विचारलं.
"थंडीपेक्षा हे पावसाचे थेंब जास्त गार वाटतायत... पण मला पाऊस खुप आवडतो त्यामुळे त्यातलं उबदारपण काही वेगळंच आहे." अन्वी म्हणाली.

"ते उबदारपण कदाचित माझ्या नजरेतून आलं असेल." अद्वैत हळू आवाजात म्हणाला.

"सर, तुम्ही ना… नेहमी काहीतरी वेगळंच बोलता." अन्वी म्हणाली.

"कारण तुम्ही साधं बोलायला जागाच ठेवत नाही अन्वी."
त्याच्या त्या वाक्यावर ती लाजून गप्प झाली. पाऊस ओसरत होता, पण त्यांच्या मनातला पाऊस मात्र सुरूच होता.

थोड्या वेळाने पाऊस पडायचा पुर्ण थांबला मग ते दोघेही आपापल्या घरी गेले.

पुढे काही महिन्यांनी अन्वीला बदलीचं पत्र आलं, पुण्यातल्या मोठ्या शाळेत तिची बदली झाली. ते बघून ती निःशब्द होती. डोळ्यासमोर अद्वैतचा चेहरा येताच तिचे डोळे पाणावले. पण आता बदली झाली आहे तर जावं लागणारच होतं म्हणून तिने स्वतःला कसं बसं सावरलं.

शेवटच्या दिवशी शाळेतली सगळी मुलं तिच्या भोवती जमली होती. अद्वैत दाराशी उभा होता, हातात काहीतरी घेऊन. तिची त्याच्याकडे नजर जाताच तो पुढे आला.

"हे तुमच्यासाठी." अद्वैत म्हणाला तेव्हा तिने त्याच्या हातात पाहिलं तर एक छोटं रोप होतं.

"हे झाड जसजसं वाढेल, तसतसं माझं प्रेम तुम्हाला आठवत राहील." तो हळू आवाजात म्हणाला. आज पहिल्यांदा त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे तिचे डोळे पाणावले.

"आणि जर हे झाड कोमेजलं तर?" तिने हसत विचारलं. पण डोळ्यातून अश्रू ओघळलेच.

"मग समजा की मी तुमच्याशिवाय कोमेजलो." अद्वैत म्हणाला. त्यावर ती काहीच बोलू शकली नाही. डोळ्यांतून अश्रूंचे थेंब गळत होते. त्याचंही मन पावसासारखं भरून आलं.

"तुम्ही पुण्यात जाऊन विसराल मला." अद्वैत म्हणाला.

"नाही सर, पावसाला आठवण करून द्यायची गरज नसते तो नेहमीच येतो." अन्वी म्हणाली आणि जड पावलांनी तिथून बाहेर पडली. जाताना ती खुप उदास होती. आपलं प्रेम आता आपल्याला मिळणारच नाही असे तिला वाटत होते. ती तिथून दुसऱ्या दिवशीच पुण्याला निघून गेली.

एक वर्षानंतर......

पुण्यातल्या तिच्या खिडकीबाहेर एक झाड उभं होतं.
त्या झाडावर आज पहिलं फुल उमटलं होतं. अन्वीने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब गळू लागले. त्याचवेळी बाहेर पावसाची सर आली आणि दारातून एक आवाज तिच्या कानात घुमला.

"माझं आणि पावसावरचं प्रेम अजून जिवंत आहे..." तो आवाज कानावर पडताच तिने दारात पाहिलं तर दारात अद्वैत उभा होता. त्याला बघून ती खुप खुश झाली. आज त्याचीही बदली पुण्यात झाली आणि तो तिच्याकडे आला. शेवटी त्यांचं प्रेम त्यांना मिळालं.