Login

पावलांची सरगम...भाग 4 अंतिम

Pawalanchi Sargam
पावलांची सरगम...भाग 4 अंतिम

सौम्या काही दिवस राहिली पावलांची सरगममध्येच. ती सईच्या मदतीने फाऊंडेशनचं काम पाहू लागली. ऋषभ सुरुवातीला थोडा दुरावा ठेवत होता, पण सौम्याच्या डोळ्यांतली खंत, त्यातला आपलेपणा आणि मीराशी जुळलेलं तिचं नातं हळूहळू ऋषभच्या काळजाला पिघलवत होतं.

एका संध्याकाळी, सई झोपलेली, स्वर तिच्या कुशीत आणि मीरा पुस्तक वाचत होती...
ऋषभ आणि सौम्या बाल्कनीत बसले होते.

सौम्या म्हणाली,
“दादा, तू गेलास तेव्हा माझं वय फक्त १० होतं. मी खूप रडले. मला तू हवा होतास दादा पण पप्पा-मम्मीने तुझं नावसुद्धा काढायला बंदी घातली.
तू गेल्यावर मला उमजलं… घर म्हणजे नुसत्या भिंती होत्या ना त्यात प्रेम होतं ना आपुलकी.."

ऋषभकडून शब्द फुटत नव्हते.
डोळ्यांत पाणी, आवाज भरून आला होता.

“माफ कर... पण कधी वाटलं नाही की परत वळावं... कारण वाटलं, तुम्ही माझ्याशिवाय चांगले आहात... पण मी मात्र अधूरा होतो.”

सौम्या पुढे सरकली, त्याचा हात हातात घेत म्हणाली,
“तू मला भेटलास, तेवढंच पुरेसं आहे.”

सौम्याच्या आग्रहाने एक दिवस ऋषभची आई सरोज देशमुख आणि वडील अरुण देशमुख फाऊंडेशनमध्ये आले.
त्यांनी प्रवेश केल्यावर संपूर्ण “पावलांची सरगम” स्तब्ध झाली होती.
सई, स्वरला उराशी धरून उभी होती. मीरा तिच्या मागे दडलेली ऋषभ समोर होता.

आईचं पहिलं वाक्यच पुरेसं होतं.
“ऋषभ, जे तू आम्हाला शिकवलं आहेस, ते आम्ही पैशांनी कधीच दिलं नसतं. आम्हाला तुझं प्रेम खूप उशिरा कळल… पण अजून उशीर झालाय असं वाटत नाही.”

ऋषभ धावत गेला आणि आईला बिलगला.
ते दृश्य पाहून सईच्या डोळ्यांतून आसवांचा धबधबा वाहू लागला.

‘देशमुख फाऊंडेशन’ — नवीन रूप, नवी दिशा

पावलांची सरगम आता केवळ कॉफीशॉप वा पुस्तकांचा कोपरा राहिला नव्हता.
देशमुख कुटुंबाच्या एकतेने आणि सईच्या स्वप्नांनी मिळून एक नवीन संस्था उभी राहिली.

“पावलांची सरगम – देशमुख फाउंडेशन ऑफ भावनात्मक शिक्षण आणि पालकत्व”


इथे केवळ अनाथ मुलांचं संगोपन नव्हे, तर समाजातील भावनिक पातळीवर उपेक्षित व्यक्तींसाठी सल्ला, आधार, शिक्षण आणि प्रेम देण्याची सुरुवात झाली.

फाऊंडेशनच्या नवीन शाखेच्या उद्घाटनाच्या दिवशी, सई स्टेजवर उभी होती. तिच्या डावीकडे स्वर, उजवीकडे मीरा, ऋषभ आणि सौम्या मागे.

सई म्हणाली,
“कधी वाटलं नव्हतं की कॉफीशॉप उघडताना आम्ही एक घर, एक संस्था आणि एक मूल्य निर्माण करू.
आज या व्यासपीठावर उभं राहून मी इतकंच सांगू इच्छिते.

"प्रेम म्हणजे रक्ताचं नातं नाही, तर साथ देणाऱ्या प्रत्येक स्पर्शातलं सत्त्व असतं.
पावलांना जर सुर गवसला, तर जगातली प्रत्येक पायवाट सुंदर गाणं होते... आणि त्या गाण्याचं नाव आहे — 'पावलांची सरगम.' ”

पावलांची सरगम – देशमुख फाउंडेशन आता शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गाजू लागलं होतं. शाळांमध्ये, कॉलेजमध्ये आणि अगदी वृद्धाश्रमांमध्येही फाऊंडेशनचे स्वयंसेवक "भावनांचं शिक्षण" पोहोचवत होते.

ऋषभ आणि सईने आपली भूमिका संस्थापक म्हणून पूर्ण केली होती… पण आई-बाबा म्हणून अजून त्यांचा प्रवास सुरूच होता.


एके रविवारी,
फाऊंडेशनच्या अंगणात एक मोठं व्यासपीठ सजवलं गेलं होतं. आज मीरा आणि स्वरचा "स्वप्नमंच" कार्यक्रम होता.
मीरा आता किशोरी झाली होती – ती सुंदर कवयित्री बनली होती. स्वर अवघा आठ वर्षांचा पण गाण्यात पारंगत.

ते दोघं स्टेजवर आले.

मीरा म्हणाली,
“आई म्हणते, भावनांना शब्द द्यायचे नाहीत, त्यांना आवाज द्यायचा... म्हणून आम्ही आज आमचं गीत सादर करतोय.”

स्वर गायला..मीरा त्याला स्वर देत होती.

"आईच्या कुशीत गवसलेली गाणी,
बाबाच्या स्पर्शातून उमटलेले सूर,
प्रेम हे रक्तात नसतं,
ते विश्वासाच्या पावलांत असतं..."

श्रोत्यांच्या डोळ्यांत पाणी, मनात शांतता आणि चेहऱ्यावर स्मित होतं.

पावसाने चिंब झालेली संध्याकाळ होती.

ऋषभ आणि सई आपल्या फाऊंडेशनच्या गच्चीवर हातात हात घालून बसले होते.
त्यांच्याभोवती — एक हसतं फाउंडेशन, आत्मविश्वासाने वाढणारी मीरा आणि स्वर आणि मागे उरलेली ती wish jar, जिथे अजूनही कुणीतरी रोज एक "आशेची चिठ्ठी" टाकायचा...

सई म्हणाली,
“आपण काहीच जास्त केलं नाही, फक्त प्रेम दिलं.”

ऋषभ हसून म्हणाला,
“पण त्या प्रेमाने एका पावलालाही सूर दिला... आणि तीच आपली सरगम.”

त्याची शेवटची ओळ होती..

"कधी एकटे असलेल्या पावलांनी,
जेव्हा साथ दिली,
तेव्हा त्या चालत्या पावलांनीच
आयुष्याचं गाणं लिहिलं
आणि ते गाणं अजूनही वाजतं आहे
पावलांची सरगम म्हणून…"

समाप्त:
ऋतुजा वैरागडकर

धन्यवाद ही संपूर्ण कथा मनापासून वाचल्याबद्दल.
ही केवळ एक प्रेमकथा नव्हती — ही होती साथ, समर्पण, समाजकार्य आणि भावनिक उन्नतीची कथा.


🎭 Series Post

View all