पाझर-1

पाझर
"लांब हो माझ्यापासून.." आजी तिच्या चार वर्षाच्या नातवाला दूर करत होती, आजीचं हे वेगळंच रूप बघून लेकरू रडायला लागलं. आजवर तळतावरच्या फोडाप्रमाणे जपणारी आपली आजी आपल्याशी असं का वागत असेल हा प्रश्न त्या निरागस मनाला पडला..

त्याची आई धावतच तिथे आली आणि त्याला घेऊन उदास मनाने आत गेली..

कारण प्रसंगच तसा घडला होता..

****
दोन दिवसांपूर्वी...

"आई तुम्हाला डॉक्टरने शुगर टेस्ट करायला लावली आहे, एक बाई घरी येऊन रक्त घेऊन जाईल.."

"बरं होईल बाई...नाहीतर इतक्या लांब ती चाचणी करायला जाणं मला झेपलं नसतं.."

"म्हणूनच त्या मॅडमला मी घरी बोलावलं आहे.."

तेवढ्यात आरवचा रडायचा आवाज येतो, आजीचाचा जीव वरखाली होतो..आरवला थोडं जरी रडताना पाहिलं तरी आजीचा जीव कासावीस व्हायचा..

"अगं का रडतोय तो??"

"काही नाही ओ.. कंटाळा आला असेल त्याला खेळून.. झोप आली की असाच रडतो."

"ते काही नाही..त्याला भूक लागली असेल..जा बघ बरं.."

"तो खेळतोय त्याच्या बाबांसोबत...आणि आत्ताच तर जेवलाय.."

आजीला राहवलं नाही, आजी चटकन उठून आरवला पाहायला गेली, आरव वडिलांशी खेळत होता..त्याचं रडणंही थांबलं होतं.. तेवढ्यात संदेश आईला म्हणाला,

"आई तुझं काही कळतच नाही...टेस्ट करायला जायचं म्हटलं तर धाप लागते, पण आरवचा आवाज आला की धावायला होतं तुला.."

"अरे नातवंड म्हणजे दुधावरची साय...त्यांच्यात सगळा जीव अटकतो.."

"असं होय.." संदेश कौतुकाने आईकडे बघत होता. काही क्षण विचार करताच त्याचं मन दुःखी झालं, मौन बाळगत त्याने आपलं दुःखं लपवलं..."

आजी संदेशला म्हणाली,

"काय रे काय झालं??"

"काही नाही, तुझं नातवावरचं प्रेम पाहून भरून आलं.."

"लग्न करायला किती आढेवेढे घेत होतास... शेवटी घाईघाईत का होईना तुला सुबुद्धी आली.."

संदेशची बायको रमा सगळं ऐकत होती. तिची नजर कायम खाली असायची, सासूबाईंना नेहमी आश्चर्य वाटायचं...आजकालच्या मुली इतक्या वाचाळ आणि बिनधास्त असताना ही मुलगी शहरातील असून, मोठ्या घरातली असून इतकी लाजाळू, कायम आज्ञापालन करणारी आणि कसलीही अपेक्षा ठेवणारी कशी?

कदाचित म्हणूनच संदेशने तिला निवडलं असेल...

आजी विचारात गढून गेली होती..

क्रमशः

🎭 Series Post

View all