पाझर-2

पाझर
आजी विचारात गढलेली असतानाच संदेश आईला म्हणतो,

"चल आई, माझं एक काम आहे बाहेर..मी जाऊन येतो.."

संदेश बाहेर गेला,

काही वेळाने दार ठोठावायचा आवाज आला..

दारावर रक्ताची चाचणी करणाऱ्या मॅडम आल्या होत्या..

"कुणी आहे का घरात?"

"या मॅडम या.." आजीने मॅडमला बसवलं आणि हात पुढे केला..

मॅडम चांगलीच बोलकी होती, त्यामुळे ओळखपाळख नसतांना तिने आजीशी बोलायला सुरुवात केली,

"काय मग मावशी, कधीपासून आहे त्रास.."

"झाले असतील चार वर्षे..आता काय, गोळ्या खायच्या आणि जगायचं.."

"ते तर आहेच म्हणा..आता आधीसारखं कुठे राहिलंय.."

"आधीसारखी आता माणसंही नाहीत आणि निसर्गही नाही.."

तेवढ्यात बाहेर जोरदार पाऊस सुरू होतो, मॅडम नाराजीच्या सुरात म्हणते, "यालाही आत्ताच यायचं होतं.."

"अहो मॅडम, बसा की पाऊस उघडेपर्यंत.. रमा चहा टाक बरं.."

बाहेर पाऊस, वातावरणात थंडावा..त्यामुळे चहाची तल्लफ आलीच होती, मॅडम नाही म्हणू शकली नाही..रमाने पटकन चहा आणून दिला..

"ही माझी सुनबाई.."

"नमस्कार.."

तेवढ्यात आरवचा आवाज आला आणि रमा आत पळाली.

"तर आजी, खरंय तुमचं..आता आधीसारखी माणसंही राहिली नाहीत.."

Tv वर अनेक गुन्ह्यांच्या बातम्या सुरू होत्या, ते पाहुन आजी अजूनच वैतागली..

"पाहिलंस..भलाईचा जमानाच नाही राहिलेला..."

"हो, पण जगात 1 टक्का चांगली माणसं आहेत बरं का, त्यांच्यामुळेच बरं चाललंय जरा.."

"ते तर आहेच."

"तुम्हाला सांगते आजी, आजकाल लग्नातही इतकी फसवणूक होते की काय सांगू..पण मी नशीबवान आहे...माझ्यासाठी एक स्थळ चालून आलेलं..माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये होता तो मुलगा..इतका चांगला होता की वडिलांनी ठरवून टाकलेलं, की यालाच जावई करायचं...पण वडिलांनी जेव्हा त्याला विचारलं सर्व्ह त्याने प्रामाणिकपणे सांगितलं..की माफ करा, मी बाप बनण्यास असमर्थ आहे..माझा विचार करू नका.."

"अगं बाई...खरं बोलायला हिम्मतही लागते बरं.."

"नाहीतर काय, मी त्या मुलाला बघितलं होतं बऱ्याचदा..मला चांगला वाटलेला.. पण वडिलांना त्याने सत्य सांगितलं तेव्हापासून त्याच्याबद्दल आदर अजूनच वाढला..पण आपण शेवटी माणसंच, वास्तववादी विचार करणारे...वडिलांनी विषय तिथेच थांबवला.. आणि मीही.."

"खरंय तुझं.."

तेवढ्यात संदेश आत येतो...

संदेशला बघत मॅडम ताडकन उभी राहते, आजीकडे एकदा बघते..

आजी म्हणाली, "काय झालं मॅडम?"

"अहो हाच तो..याच मुलाबद्दल बोलत होते मी.."

आजीला चक्कर यायचीच बाकी होती, संदेशकडे बघत मॅडम निघून गेली, कदाचित तिला आपण काहीतरी चुकीच्या वेळी चुकीचं बोललो याची जाणीव झालेली..

क्रमशः

🎭 Series Post

View all