पाझर-3 अंतिम

पाझर
आजी संदेशकडे बघू लागली, त्याने मान खाली घातली होती. पण आता आईला सगळं सांगणं भागच होतं..

संदेश आईच्या पायाशी बसला, रमाही तिथे आली..संदेश बोलू लागला..

"हो आई, हे खरं आहे..मी बाप बनू शकत नाही. मागे झालेला अपघात आणि त्यावर सुरू असलेले उपचार. त्या दरम्यान मला डॉक्टरने तसं सांगितलं होतं. माझ्यामुळे कुणा बाईचं आयुष्य खराब व्हायला नको म्हणून मी लग्नाला नकार देत राहिलो...

पण एक दिवस,

पुलावरून जात असताना मला तिथे रमा दिसली, पुलाच्या दांड्यावरून नदीत उडी मारण्याच्या बेतात होती..मी पटकन धावून गेलो, तिला वाचवलं आणि असं स्वतःला संपवण्याचं कारण विचारलं..

तिने सांगितलं,

कॉलेजमध्ये एका मुलाशी प्रेम केलं, त्याने माझा गैरफायदा घेतला..मी प्रेग्नन्ट राहिले..आता तो मुलगा फरार आहे, मी आई वडिलांना काय तोंड दाखवू? कुठे जाऊ?काय करू?

माझ्या डोक्यात विचार आला, हिला माझी आणि मला हिची साथ गरजेची आहे..मला मूल मिळेल आणि हिला तिच्या मुलाला बापाचं नाव..मी तिला तात्काळ लग्नाची मागणी घातली आणि लग्नाची घाई केली..

"पोरा, म्हणजे हे पोर तुझं नाही??"

"असं कसं म्हणतेस आई? रक्ताचं नसलं तरी मायेचं नातं आहे..आरवला पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हाच मी बाप झालो..."

रमा आसवं गाळत होती, तिच्या कृत्याच्या पश्चाताप तर तिला होताच पण आता हे सत्य समोर आल्यावर तिचं काय होणार याचीही चिंता तिला सतावू लागली..

आईला कळेना..मुलाच्या चांगुपणाला दाद द्यावी की हा आपला रक्ताचा नातू नाही म्हणून त्याचा धिक्कार करावा..

दोन दिवस असेच उलटले, आजी आरवला रागापोटी लांबच ठेवत होती..

एके दिवशी रमा तुळशीला पाणी घालत होती, आरव आत झोपला होता तो अचानक उठला...रमाला आवाज गेला नाही..आजीचा जीव कासावीस होत होता, पण पाय तिकडे वळत नव्हते..

आरवने मोठी किंकाळी फोडली तेव्हा मात्र आजीला पाझर फुटला..आजी चटकन आरवकडे गेली, त्याला कवेत घेऊन कुरवाळू लागली..एवढ्यात रमा आणि संदेश तिथे पोचले..

आजी डोळ्यात आसवं आणत म्हणाली,

"यापुढे कधीही हा विषय काढायचा नाही, आरव माझाच नातू आहे आणि तो कायम राहणार..."

असं म्हणत आजी त्याचे मुके घेऊ लागली, आजीने आपल्याला जवळ घेतलं बघून त्या निरागस जीवालाही आनंद झाला, त्याने आपली मिठी अजूनच घट्ट केली...

आणि त्या दिवसानंतर आजीची माया कधीच आटली नाही...

समाप्त

🎭 Series Post

View all