#कौटुंबिककथा#स्पर्धा
परफेक्ट चौरस-भाग 1
"किती वाट पाहू
नको दूर राहू
तू ये ना सख्या रे
जीवनगीत सुरांत गाऊ।"
"वाहवा, वाहवा, क्या बात है मॅडम, हाय, आप तो लैला होगयी, मजनू के प्यार मे दिवानी..." विजया सरिताला चिडवत होती.
सरिता डायरीत कवितेच्या ओळी लिहीत असताना विजया हळूच मागे येऊन कधी उभी राहिली व तिने कधी ओळी वाचल्या सरिताला कळले देखील नव्हते.
"विजया, थांब तू आता...," सरिता विजयाच्या मागे पळू लागली.
"पल पल पल पल हर पल हर पल, कैसे कटेगा पल हर पल ...., म्हणत विजया तिला अजूनच चिडवू लागली."
सरीताच्या गाली गुलाब फुलले होते, दोघी रूममेट्स गळ्यात गळे घालून हसायला लागल्या.
"मी तुझ्यासाठी खूप खुश आहे सरू," सरिताचे गालगुच्चे घेत विजया म्हणाली.
"विजू, मला तर अजूनही सगळे स्वप्नवतच वाटते आहे गं. खरंच नशीबवान आहे मी, पण थोडी भीतीही वाटते गं. जमेल ना मला त्या कुटुंबाचा हिस्सा व्हायला, सगळ्यांना प्रेम, आपुलकी मी जबाबदारपणे देऊ शकेल ना, कुटुंबाचा परफेक्ट चौरस करू शकेल ना....."
"अरे, हो हो हो, होणाऱ्या मिसेस सरिता सुरेश देशमुख, जरा दम घ्या, किती ते प्रश्न छोट्याश्या डोक्यात. इतका विचार करशील तर केस कमी होतील बरे डोक्यावरचे आणि मग सुरेशराव गात राहतील, 'देवा मला का दिली बायको अशी'..."
विजया पुन्हा सरिताला चिडवायला लागली.
सरिताला सगळं सुखावत होतं. मैत्रिणींचं चिडवणं, सुरेशरावांचे फोन कॉल्स, कधीतरी बाहेर भेटणे, ते मंतरलेले क्षण...किती साठवू हृदयात असे तिला झालेले.
सरिताला सगळं सुखावत होतं. मैत्रिणींचं चिडवणं, सुरेशरावांचे फोन कॉल्स, कधीतरी बाहेर भेटणे, ते मंतरलेले क्षण...किती साठवू हृदयात असे तिला झालेले.
लहानपणापासून तिने ज्या आदर्श कुटुंबाची स्वप्ने बघितली होती ती आता पूर्ण होणार होती. माई, अप्पा आणि सुरेश...तिचं होणारं कुटुंब. तिचं जग, तिचं सर्वस्व.
सुखी आयुष्याची स्वप्न रंगवत सुखाच्या हिंदोळ्यावर सरिता झुलत होती, खूप आनंदात होती. सुरेशसोबत लवकरच विवाहबंधनात ती अडकणार होती.
सुरेश सोबत संसार थाटण्यासाठी ती जेवढी उत्सुक होती तेवढंच आकर्षण तिला माई आणि अप्पांच्या सहवासाचं होतं. माझं घर, माझं कुटुंब सध्या तिच्या बोलण्यात हाच टॉपिक असायचा.
सरिता आणि सुरेशचं अरेंज मॅरेज. माई आणि अप्पा यांनी तिला सून म्हणून पसंत केलेली आणि गेल्या सहा महिन्यात ती त्यांच्या आपुलकीच्या, प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघाली होती.
माईंशी तर गुळपीठ जमलं होतं तिचं.
सरिता एका प्रायमरी शाळेत शिक्षिका होती. शाळेतली तिची एक सहकारी मैत्रीण होती तिला खूप सासुरवास होता. सतत सासूबद्दल वाईट बोलायची ती.
सरिता एका प्रायमरी शाळेत शिक्षिका होती. शाळेतली तिची एक सहकारी मैत्रीण होती तिला खूप सासुरवास होता. सतत सासूबद्दल वाईट बोलायची ती.
"सरिता, बघ हं बाई, सुरुवातीपासूनच जशास तसे वागायचे सासूसोबत. नाहीतर माझ्यासारखी गत होईल तुझी."
"हो तर, माझ्या माई खूप चांगल्या वागतात माझ्याशी, त्यामुळे मी पण जशाच तसे वागेल," सरिता हसतच म्हणाली.
"अगं माझी भोळी सांब, इतकं साधं असून चालणार नाही तुला आता. सासू म्हणजे असा प्राणी की ज्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात, अनुभवाचे बोल आहेत माझे. लग्नाआधी सगळ्या सासवा गोडचं वागतात, नंतर दिसतो त्यांचा खरा रंग."
"काहीही हं मीना, उगाच काहीतरी अवडंबर करते तू," इति सरिता.
"ठीक आहे, माझं काम मी केलं, पुढे तू आणि तुझं नशीब..." मीना म्हणाली.
सरिताचा फोन वाजला.
"हा, हॅलो माई, कश्या आहात?, शाळा सुटली की फोन करणारच होते तुम्हाला."
"सरिता, शाळा सुटली की घरीच ये इकडे. घराला रंग द्यायचं ठरवतो आहोत तर तूच निवड रंग," माई उत्साहात होत्या.
"अहो माई, मी कशाला? सुरेश सांगतील तो रंग चालेल की मला. माझी एकटीची थोडीच रूम असणार आहे."
"अगं, फक्त तुमची खोली नाही, पूर्ण घरालाच तुझ्या आवडीने सजवायचं आहे, तू लग्न करून येशील तेव्हा आता हे घर तुझं जास्त असणार आहे."
"माई,...," सरिताला काय बोलावे कळत नव्हते. तिचं मत आतापासूनच सासरी महत्त्वाचे आहे हे बघून ती प्रचंड सुखावली होती.
तसेही माईंनी पहिल्याच भेटीत सांगितले होते की सरिता सून म्हणून नाही तर लेक म्हणून त्यांचं कुटंब पूर्ण करणार आहे.
"लेकीची मला फार हौस होती सरिता, ती तुझ्या रूपाने मी पूर्ण करणार बघ, आपल्या कुटुंबाचा परफेक्ट चौरस पूर्ण होणार," माईंच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता.
पण कधीतरी मीनाचे बोलणे सरिताला आठवायचे आणि एक अनामिक हुरहूर मनात दाटून यायची.
"माई लग्नानंतर बदलणार तर नाहीत ना? त्यांना आई व्हायचे आहे पण मला त्यांची लेक बनणे जमेल ना?..." असे प्रश्न तिच्या मनात दाटायचे पण माईंचा प्रेमळ आवाज पुन्हा ऐकला की प्रश्न मनात विरून जायचे.
आत्मविश्वासाने कुटुंबाचा परफेक्ट चौरस पूर्ण करायचाच हे सरीताने पक्के ठरवले होते.
आणि त्यांच्या लग्नाचा दिवस उजाडला. पण......
क्रमशः
(काय घडले लग्नाच्या दिवशी ? सरिता कुटुंब परफेक्ट करण्यात यशस्वी होईल का? माईंचा स्वभाव बदलेल का? पुढील भागात अवश्य वाचा)
©® डॉ समृद्धी अनंत रायबागकर, अमरावती
#अष्टपैलूस्पर्धा2025
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा