Login

परफेक्ट चौरस-भाग 3

कौटुंबिक
परफेक्ट चौरस-भाग 3

माईंनी कागद काढून सरीताच्या हातात दिला. तो एक रिपोर्ट होता, डोळ्यांच्या डॉक्टरांनी निदान केले होते, 'ऑक्युलर मेलेनोमा'चे.

सरिता शांतपणे एकेक शब्द वाचत होती.

शंकरबाबा, विजया, मीना उपस्थित सगळेच विचारू लागले की, कसला आहे रिपोर्ट? काय झाले आहे नेमके?

"मीच सांगते सर्वांना," माईंचा धीरगंभीर आवाज घुमला.

"सुरेशला ऑक्युलर मेलेनोमाने ग्रासले आहे. म्हणजे, डोळ्यांचा कॅन्सर, दृष्टी अधू होत होत आंधळेपणा येऊ शकतो, कॅन्सर पसरला असेल तर जीवनही धोक्यात.
उपचार नक्कीच आहेत पण खात्री नाही देऊ शकत असे डॉक्टर म्हणत आहेत. कालच रिपोर्ट हातात पडला आणि आम्ही सुन्न झालो, दिवसभर विचार करून लग्न करायचे नाही हा निर्णय सुरेशने घेतला, जो आमच्याहीदृष्टीने योग्य आहे ."

सरिताला आठवले दोन महिन्यांपासून सुरेशला डोळ्यांचा त्रास होत होता, कधी अंधुक दिसायचे तर कधी डोळे लाल होत होते, शॅडो दिसायच्या. जनरल इन्फेक्शन असेल म्हणून घरगुती उपाय त्याने केले. तात्पुरते बरेही वाटत होते पण अधूनमधून त्रास व्हायचा तेव्हा सरीतानेच हट्ट करून एक आठवड्याआधी त्याला डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेले होते.
काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या ज्या सुरेशने त्रास वाढला म्हणून नाईलाजाने लग्नाच्या दोन दिवस आधी केल्या आणि काल रिपोर्ट आला होता.

सारिताने फोन काढून मेल चेक केले. तिचा मेल आयडी दवाखान्यात नोंदवला होता त्यामुळे तिलाही रिपोर्ट मिळाला होता. रिपोर्ट तोच होता, कदाचित चुकीने दुसऱ्याचा रिपोर्ट आला असेल माईंकडे ही आशा देखील मावळली होती.

"बरे झाले लग्नाच्या आधीच कळले. वाचली सरिता. नाहीतर आयुष्याचे नुकसान झाले असते तिच्या.
देवाचे आभार माना शंकरबाबा, सरिताचे लग्न झाले नाही सुरेशसोबत. आता तुम्ही नाद सोडा सुरेशचा...."आलेली नेतेमंडळी सल्ला देऊ लागले.

माईंना तिथे थांबवेना. त्या निघाल्या तश्या सरीताने त्यांना पुन्हा थांबवले.

"तुमचा निर्णय तर तुम्ही सांगितला माई पण माझा निर्णय तर ऐकून जा. काहीही झाले तरी हे लग्न मी करणारच. सुरेश हाच माझा जीवनसाथी असेल."

"सरिताताई, काय बोलतेस तू? का आयुष्याचं वाटोळं करून घेत आहेस, सोड या लोकांचा नाद, वेड पांघरून पेडगावला गेलेले वाटतात मला तर ह्या माई नि सुरेश देखील...," एका पक्षाचा उदयोन्मुख नेता बोलत होता.

तेवढ्यात कुणीतरी लोकल पत्रकारांना बोलावले होते आणि मग तर त्या नेत्याला जोरच चढला.

"सुरेशच्या वडलांना येत्या निवडणूकीत उभे राहायचे आहे म्हणून मोठेपणा दाखवत आहेत आता. सुरूवातीपासूनच सुरेशचा आजार यांना माहिती होता तरी एका अनाथ मुलीला स्वप्न दाखवले आणि आता आम्ही किती मनाचे मोठे म्हणून लग्न रहित करत आहेत.
लोकांची सिम्पथी मिळवण्यासाठी फक्त.
बरे म्हणून सरिता वाचली. तिच्या भविष्यासाठी आम्ही तिला मदत करू.
योग्य वर शोधून तिचे लग्नही लावून देऊ.
माई आणि सुरेश सारख्या लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, आम्ही त्यासाठी सरिताला मदत करू."

"घाबरू नका सरिता ताई, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत," कार्यकर्ते देखील म्हणाले.

"काढा रे बाहेर या म्हातारीला, घेऊन चला पोलीस स्टेशनवर," माईंकडे ते लोक जाऊ लागले.

हे सगळं असह्य होऊन शेवटी सरिता किंचाळली, "बंद करा हे सगळं तुम्ही आणि कृपया चालते व्हा इथून.
माझ्या आयुष्याचा निर्णय घेणारे तुम्ही कोण आहात? माझ्या आईला वाटेल तसे बोलण्याचा हक्क नाही तुम्हाला."
ती रागाने थरथरत होती.

"काय माहिती आहे तुम्हाला माझ्याबद्दल नेते साहेब? समोरच्याला दोष देणारे तुम्ही स्वतः कसे आहात? तुम्हीच पुढची निवडणूक डोक्यात ठेवून आश्रमात आलात, याआधी कधी वाटले इथे यावे, इथल्या अडचणी सोडवाव्यात. नाही ना, आणि वाटणारही कसे म्हणा, समाजकारणाचा बुरखा पांघरलेले स्वार्थी राजकारणी आहात तुम्ही. माईंच्या हेतूवर संशय घेतला ना तुम्ही, हे बघा मग...."

तिने तिच्या डाव्या हातावरची शाल बाजूला केली. तिचा डावा हात थिटा होता. सगळे राजकारणी बघतच राहिले.

"माझा तर फक्त हात थिटा आहे, तुमचे तर विचार थिटे आहेत. माझ्या या उणिवेसहित माईंनी माझ्यावर प्रेम केले, मला स्वीकारले.
तुमच्यासारखे नाही, वाहत्या गंगेत हात धुवायला आलेले तुम्ही, खबरदार यापुढे माझ्या माईंबाबत, माझ्या कुटुंबाबाबत एक शब्दही उच्चरला तर. निघा येथून ताबडतोब," दरवाज्याकडे बोट दाखवत सरीताने त्यांना बाहेर काढले.

"माई, हेच ओळखलंत का तुम्ही मला. हाच विश्वास तुमचा? समजा लग्नानंतर असे काही झाले असते तर? किंवा सुरेश ऐवजी मला काही झाले असते तर? हाच निर्णय राहिला असता का तुमचा? तुमच्या कुटुंबाचा भाग राहिले नसते का मी?"

"नाही बेटा, पण तुझं अख्खं आयुष्य आहे तुझ्यासमोर आणि सुरेश कितपत साथ देऊ शकेल याची खात्री नाही गं पोरी," त्यांना पुन्हा गदगदून येऊ लागले.

"माई, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला जवळ घेऊन मायेने चेहऱ्यावर हात फिरवलात, तो मायेचा स्पर्श. अप्पानी आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवला तो आपुलकीचा, विश्वासाचा स्पर्श आणि सुरेशला अंगठी घालतानाचा प्रेमाचा, भक्कम आधाराचा आश्वासक स्पर्श, यांना कसे काढून टाकू माझ्या जीवनातून, सांगा ना."

" तुम्हाला मी मनापासून माझे कुटुंब मानले आहे. सुरेशला देखील आपल्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे. मी त्याची काळजी घेईन, योग्य उपचारासाठी साथ देईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपण सुरेशला ठीक करू शकू माई."

"कुठून आणले इतके धैर्य पोरी," तिच्या डोक्यावर हात ठेवत माई पुन्हा मुसमुसू लागल्या.

"माई, शांत व्हा बरे आधी. तुम्ही इतक्या धीराच्या आणि आज काय झाले तुम्हाला? 6 महिन्यात नाते कसे जपायचे हे तुमच्याकडूनच शिकले मी. परिवारातील सगळी नाती तुम्ही किती हळुवारपणे जपता ते बघितलंय मी आणि अंगिकरलंय देखील.
आणि कुटुंबाच्या चौकटीची एक बाजू कमकुवत होत असेल तर बाकी बाजुंनी तिला सावरायचं की पडू द्यायचं? सांगा ना. तुम्ही मला तुमच्या परिवाराचा हिस्सा समजत नाही का? का मला दूर करताय?," सरिता माईंना समजावत होती.

"माझं ठरलं आहे, मी माझ्या कुटुंबाला सोडून पळ काढणार नाही. मी सुरेशसोबत लग्न करणार म्हणजे करणारच," सरिता ठामपणे उद्गारली.

"पण सुरेशने प्रण घेतला आहे इथे न येण्याचा. तो नाही येणार सरिता, "इति माई.

"बस इतकेच ना," सरिता हसत म्हणाली.
"तो नाही येणार तर मी तिकडे येते. त्याचा प्रण नाही मोडणार."

"सरिता.....," माईंना काय बोलावे कळत नव्हते.

"हो माई, चला, लग्नगाठच बांधायची तर इथे काय नि तिथे तुमच्या घरी काय. सुरेशला मी समजावेन सुद्धा आणि तुमच्या घरची सून म्हणून गृहप्रवेश करणार सुद्धा."

माईंना घेऊन सरिता आत्मविश्वासाने निघाली.

शंकरबाबा पाणावलेल्या डोळ्याने कृतार्थ होऊन म्हणाले, "कुटुंबाचे दोन आधारस्तंभ चालले बघा. या दोन भक्कम बाजू आता कुटुंबाचा चौरस पूर्ण करणार, परफेक्ट करणार."

समाप्त।

©® डॉ समृद्धी अनंत रायबागकर, अमरावती

#अष्टपैलूस्पर्धा2025

🎭 Series Post

View all