Login

फिटे अंधाराचे जाळे : भाग २

एका स्त्रीच्या स्वाभिमानी लढ्याची कथा

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद लेखन


"आई मला पटतयं पण आमच्या नात्यात वेगळं होणं हाच एकमेव उपाय आहे. आम्ही दोघेही एकत्र राहत होतो पण केवळ शरीर त्या घरात कैद होती आम्ही मनाने मात्र एकमेकांपासून कधीचं दुरावलो गेलो आहोत.

नाही आई मला ते सगळे शक्य नाही आता. इतके वर्ष मी सगळे सहन करत गेले तू म्हणतं होती म्हणून पण आता यापुढे या नात्याची जबाबदारी मला सांभाळून घेणे शक्य नाही.

आई तुचं म्हणतेस ना संसार हा दोघांचा असतो मगं दोघांनाही मनमोकळेपणाने जगता यायला हवं. माझ्या आणि निशांतच्या नात्यात फक्त निशांत मनमोकळेपणाने जगत होता बाकी मी मात्र कैद झालेली त्या पिंजर्‍यात.

काही करायचे म्हटले की निशांतला विचारायचे, कुठल्याही निर्णयाचे स्वातंत्र्य नाही किंबहुना तिथे मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे हे देखील मी विसरून गेले होते गं आई.
नातं हे असं असायला हवं जिथं एकमेकांची ओढ हवी किंवा त्या नात्यात काही बंधने असली तरीही ते नातं हवंहवंसं वाटायला हवं. निशांत आणि माझ्या लग्नात सुरूवातीला सगळे ठीक होते पण नंतर नंतर मला जाणवायला लागलं की नातं जपताना, निशांतचा विचार करता करता मी संसारात कुठेतरी माझं  ' मीपण' हरवून बसले होते.

घुसमट व्हायला लागलेली माझी. निशांतचे सगळे ऐकूनही त्याची नाराजी असायची सतत. तुला मी सांगायचे वरवर पण खरं सांगू आई रोज भांडणे सुरू झाली आणि त्रास व्हायचा त्या भांडणाचा प्रचंड. सुरूवातीला मी माघार घेत गेले पण नंतर निशांतने मात्र मला गृहीत धरायला सुरूवात केली. मला वाटायचं आपलाच नवरा आहे, प्रेम आहे जाऊ दे कुठे एवढ्याशा भांडणांना धरून ठेवायचे म्हणून मी दरवेळी सोडून द्यायला लागले. निशांतला माहीत होते जणू की, मी करून करून कायं करणार? माहेर म्हटलं तरी मला एकट्या तुझ्याशिवाय कोणाचा आधार नाही म्हणून मगं त्याने नंतर हात उगारायला ही मागेपुढे पाहिले नाही.

बस्स त्या दिवशीच ठरवले मी वेगळे व्हायचे नात्यातून.. माझ्यासाठी सोप्पा नव्हता गं निर्णय.. खूप प्रेम आहे माझं निशांतवर.. " अंजलीला अचानक भूतकाळातील आठवणींनी गच्च मिठी मारली तसे तिला हुंदका अनावर झाला. ती हमसून हमसून रडायला लागली. आईने अंजलीला तिच्या कुशीत घेतले आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.