चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद लेखन
जलद लेखन
" अंजली मला ठाऊक आहे बाळा सगळे. तू काही अविचारपणे निर्णय घेणार नाहीस पण मी गेल्यावर उद्या तुझे कसे होईल याचीच काळजी लागून राहिली आहे मला. तुझं आयुष्य तू एकटीने कसं काढणार? " आईने तिची काळजी बोलून दाखवली.
" आई अगं तू आहेस ना सोबत आत्ता मग बाकी गोष्टी नको बोलूयात आणि मला सध्यातरी पुढचा विचार नाही करायचा. आई मी खूप म्हणजे खूप विचार केला. आपला समाज, आपले नातेवाईक सगळे कायं कायं बोलतील सगळे माहित होते पण मला त्या पिंजर्यात असे स्वतःला बांधून ठेवणे जमणार नाही आता इथून पुढे तरी. खूप विचार करून मी हा निर्णय घेतला आहे आणि मी स्वतःला मुक्त करत आहे आणि निशांतला सुद्धा आमच्या नात्यातून.
आई मला खात्री आहे गं निशांत नक्की सुखी राहील कारण जर माझे जसे त्याच्यावर प्रेम आहे तसेच त्याचेही असते तर त्याने कमीत कमी एकदातरी माझ्याशी बोलायचा प्रयत्न नक्कीच केला असता पण या एवढ्या दिवसांत त्याचा एक फोनही नाही आणि मेसेज सुद्धा नाही. आई नातं दोघांच आहे मग मला जितकं नातं जपायला हवं असं वाटतं तसच त्यालाही वाटायला हवं ना?
तूच लहानपणी म्हणायची 'टाळी एका हाताने वाजत नाही ', इथेही तेच झालं आहे मी माझा एक हात पुढे करतेय पण निशांतचा टाळी देण्यासाठी हात पुढे आलाच नाही कधी म्हणून मी आता माझाच हात मागे घ्यायचे ठरवले.
आई हे बघं आयुष्यभर एखाद्या नात्यात घुसमट होऊन राहण्यापेक्षा स्वाभिमानाने एकटीने आयुष्य जगणे कधीही चांगले. मला माहित आहे माझे निशांतवर प्रेम आहे त्यामुळेच त्याच्याशिवाय मी कशी राहू शकेन असं वाटतयं तुला पण तू काळजी नको करू माझी.
आई मी सज्ञान आहे माझे पोट भरता येईल इतके नक्कीच कमावू शकते मी तेवढं सक्षम तू मला बनवलं आहेस. आता कुठे आयुष्याची खरी सुरूवात होत आहे आई.
आता हे संपूर्ण आकाश मला आता खुणावू पाहतेय. मला नवे पंख पसरवू दे माझे. आता तू मला भावांत, कुठल्याही विचारांत अडकवू नकोस.. आई मला मुक्त होऊ दे. आत्ता कुठे माझ्या आयुष्यातील हे अंधाराचे जाळे दूर होऊ पाहंत आहे मला माझ्या मोकळ्या आकाशाला कवेत घेऊ दे. ", एवढे बोलून अंजली घरातून बाहेर पडली
आज ती मुक्त होणार होती. अंधार सारून तिचे आकाश आज मोकळे होणार होते.
©®ऋतुजा कुलकर्णी ✍️
*समाप्त*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा