Login

फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 15

Katha premachi
फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 15

आधीच्या भागात आपण पाहिले की,

निनादने आनंदी फसवण्यासाठी प्लान तयार केला होता, पण अभिजीतने त्याचाच प्लॅन त्याच्यावरच उलटवला. अभिजीत आणि आनंदी सुखरूप घरी आले, त्यानंतर दोघंही ऑफिसला गेले.ऑफिसमध्ये आनंदीला नवीन मैत्रीण मिळाली. त्या दोघी खूप गप्पा मारायच्या.

आता पुढे,

एक दिवस सकाळी दारावरची बेल वाजली.

"आनंदी बघ ना दूधवाला आला असेल."

"अहो पहाट आहे अजून, इतक्या पहाटे कुठे दूधवाला येतो?"

दोघेही झोपेतच एकमेकांशी बोलत होते, दारावरच्या बेलचा वारंवार आवाज येत होता.

आनंदी झोपेतूनच उठून दार उघडायला गेली. डोळे चोळतच तिने दार उघडला, बघितलं तर तिला समोर निशा उभी दिसली.

तिला आश्चर्य वाटलं, तिने पुन्हा तिचे डोळे चोळले. तिला निशाचा चेहरा दिसला.

"अभिजीत अभिजीत या ना लवकर प्लिज, मला ना आई दिसते इथे, बघा ना."

तिने डोळे चोळतच अभिजीतला आवाज दिला.

"ए झोपू दे ग." असं म्हणून अभिजीतने पांघरून डोक्यावर घेतलं आणि तो झोपला.

\"मला आईच का दिसतीये.\" आनंदी स्वतःशीच पुटपुटली.

"आनंदी मी तुझी आईच आली आहे." निशाने तिच्या डोक्यावर हळूच मारलं.


"आई तू.. आई तू खरच आली आहेस." आनंदीला खूप आनंद झाला आणि तिने उड्या मारतच आईला मिठी मारली.

"आई तू इथे अगं फोन केला नाहीस आणि अशी अचानक आलीस.. बापरे माझा तर विश्वासच बसत नाही आणि हे काय एकटीच आलीस?"


"एकटीच येणार आहे का? मागे बघ."

तिने मागे बघितलं तर विक्रम उभा होता, तिने विक्रमला पण  मिठी मारली.

"बाबा बाबा.. आय मिस यु सो मच बोथ ऑफ यु. थँक यु सो मच. तुम्ही दोघ आत या, बसा. मी अभिजीतला आवाज देते."

ती आत गेली, निशा आणि विक्रम दोघेही हातात बॅग घेऊन आले. निशाने संपूर्ण घरावर नजर फिरवली. दोघेही चारही बाजूने नजर फिरवून सोफ्यावर बसले.

आनंदी आत गेली

"अभिजीत अभिजीत उठाना.. आई आलीय, आई-बाबा आलेत."

"तुझे आई बाबा आलेत पण अशी अचानक?"

"हो मलाही काही कल्पना नव्हती, तिला मला सरप्राईज द्यायचं होतं. चला आता उठा, लवकर फ्रेश होऊन बाहेर या. नाहीतर त्यांना वाटेल की तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच फीलिंग नाही."


"अरे यार आनंदी झोपू दे ना थोडा वेळ. ते आत्ताच आलेत ना बसतील मग थोडा वेळ. ऑलरेडी माझं डोकं दुखतंय."

"अभिजीत उठा प्लिज, प्लिज अभिजीत उठा.."असं म्हणून तिने त्याच्या अंगावरची पांघरून काढली. घडी करून ठेवली आणि ती किचन मध्ये गेली.

किचन मधून ट्रे मध्ये दोन ग्लास पाणी घेतलं आणि हॉलमध्ये गेली.

"आई बाबा पाणी.." तिने दोघांना पाणी दिलं.

"आई तू बस मी पटकन सगळ्यांसाठी कॉफी बनवते.

"अगं अभिजीतराव उठले की नाही."

"आई उठले ते आवरत आहेत, येतीलच आता बाहेर."

आनंदी किचनमध्ये गेली, तिने सगळ्यांसाठी कॉफी बनवली तोवर अभिजीत फ्रेश होऊन आला.

त्याने निशा आणि विक्रमला हाय हॅलो केलं आणि तो किचनमध्ये गेला.


आनंदी किचन मध्ये काही बनवत होती, ह्याने मागेहुन जाऊन तिच्या कमरेत हात घातला.

"अभिजीत काय चाललंय तुमचं आई बाबा आलेत कुणी चुकून किचनमध्ये आले तर."

"तर येऊ दे मला फरक पडत नाही."

"अभिजीत फाजिलपणा बंद करा, जा बरं तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन बसा आणि मी काहीतरी नाश्ता बनवते."

"यार काय फालतू पणा आहे, यायच्या आधी सांगायला हवं होतं ना त्यांना."

"अभिजीत प्लिज ते परमनंटली राहायला नाही आलेत आपल्याकडे, एक-दोन दिवस राहतील आणि निघून जातील. आणि त्यांचा काही त्रास होणार नाही तुम्हाला. प्लिज असा काही विचार करू नका त्यांच्याबद्दल. मला सांगा माझ्या आई बाबाच्या ऐवजी तुमचे आई बाबा असते तर तुम्ही असेच बोलला असतात का?"

"तसं नाही ग पण आता आपल्याला प्रायव्हसी मिळेल का?"

"हो मिळेल."

"कधी?"
"रात्री." असं म्हणून तिने त्याला दूर केलं आणि ती नाश्ता बनवायला लागली.

अभिजीत हॉलमध्ये जाऊन बसला.

"काय म्हणताय मग बाबा सगळं व्यवस्थित ना."

"हो सगळं व्यवस्थित आहे. तुमचं कसंचाललंय?"

"मस्त सगळं छान चाललंय."

"आनंदीने ऑफिस जॉईन केलं का मग?"

"हो केलाय ना येतीये ती ऑफिसमध्ये. पण आता तुम्ही आहात एक दोन दिवस तर ती नाही आली तरी चालेल."

त्यांच्या गप्पा सुरू होत्या तितक्यात आनंदी नाश्ता घेऊन आली. नाश्त्याच्या प्लेटकडे बघून अभिजीतने रागाने आनंदी कडे बघितलं. आनंदीच्या लक्षात आलं पण ती गप्प राहिली. ती आई-बाबांना प्लेटा देऊन आत गेली, तिच्या मागे मागे अभिजीत गेला.

"अनादी काय आहे हे? तुला माहितीये ना मला पोहे आवडत नाही तरी तो पोहे का बनवले."


"अभि प्लिज आजच्या दिवस खाऊन घ्या, आई-बाबांना पोहे खूप आवडतात म्हणून आज पोहे केले प्लिज.."


"नाही मी पोहे खाणार नाही."


"हा कायअट्टाहास आहे, अहो आजचा दिवस मॅनेज करा ना."


"नको तुला माहितीये ना मला पॅटीस आवडतात, सो आज मला पॅटीस बनवून दे तू, बनव लवकर मला ऑफिसला  जायला उशीर होतो."

"तुम्ही आज इतक्या लवकर ऑफिसला जाणार?"

"हो घरात बसूनही काय करू?"

आनंदीला अभिजीतला असं रिऍक्ट  करताना बघून आश्चर्य वाटत होतं. ती त्याच्याकडे आश्चर्याने बघत होती.

"काय झालं अशी का बघतेस माझ्याकडे?"


"मला खूप आश्चर्य वाटतं तुमचं, तुम्ही हो चिडचिड का करत आहात आणि आज काय झालं तुम्हाला."

"हे बघ, म्हणजे मला काही झालं नाहीये मला पॅटीस हवे तू माझ्यासाठी पॅटीस बनव मी तोपर्यंत रेडी होतोय."असं म्हणून तो त्याच्या खोलीत निघून गेला. त्याला असं जाताना बघून निशाच्या लक्षात आलं. ती उठून किचनमध्ये गेली.


"काय आनंदी काय झालंय का अभिजीतराव रागावलेत का तुझ्यावर?"

"नाही ग आई असं काही नाहीये."

"चल आपण नाश्ता करूया."


"आई त्यांना पोहे नाही आवडतं म्हणून त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी बनवते. आधी आपण नाश्ता करून घेऊ."

"अगं नाही नाही आधी तू त्यांच्यासाठी बनव, त्यांना ऑफिसला जायचं असेल ना?"

"हो, मग तू एक काम कर, आधी जाऊन खाऊन घे."

"हो आम्ही बसतो. तू आवरतो तोवर तुझं."

आनंदीने अभिजीतला लागतात तसे पॅटीस बनवून दिले, त्यानंतर अभिजीत फ्रेश झाला आणि तो ऑफिसला निघून गेला. तो गेल्यानंतर आनंदी निवांत निशा जवळ जाऊन बसली.


"काय गं आनंदी अभिजीत रावांचं काही बिनसलं का? थोडे विचित्र वागल्यासारखे वाटले ना?"

"हो ग आश्चर्य तर मलाही वाटलं, या आधी असे कधीच वागले नव्हते ते."

"आम्ही असं न सांगता आलो म्हणून त्यांना राग तर आला नसेल ना."


"नाही मला नाही वाटत, असं नाही."


"असं होऊ शकतं म्हणजे बघ ना तुम्ही दोघे दोघे असतात त्यामुळे तुम्हाला एकमेकांशी सवय झालेली असते. तुम्हाला तुमची प्रायव्हसी असते आणि आता आम्ही आलो आहोत तर तुमची प्रायव्हसी.."


"आई काहीतरी उगाच बोलू नकोस, असं काही नाहीये."

"हे बघ रात्री अभिजीतराव आले ना की तू त्यांच्यासोबत निवांत बोल आणि हो त्यांना जसं हवं ना तसंच कर उगाच त्यांचं मन दुखवू नकोस. ते खुश असले की आपणही खुश असतो माहितीये ना आणि हो संध्याकाळी त्यांच्या आवडीचा काहीतरी बनव."

"ठीक आहे, तू आरामात बस मी माझं काम आवरते."

आनंदीने काम आवरली त्यानंतर तिने अभिजीतला फोन केला.

"अहो तुम्ही घरी जेवायला येणार आहात का?"

"नाही नको आज बरच काम आहे, मी इथेच कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घेईल."

हे ऐकून आनंदी उदास झाली.